Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

जीवन दर्शन
नेम धरावा निकट
ज्ञानेश्वरीचे निष्ठावान अभ्यासक कारखानीस गुरुदेव रानडय़ांना म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरीत मायावाद आहे, की विवर्तवाद आहे, की अजातवाद आहे?’ यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘गणपतराव, हा कडबा

 

कशाला चघळता? ज्ञानेश्वरीत एकच आहे. भक्ती! ‘‘तरी झडझडौनि वाहिला निघ। इथे भक्तिचिये वाटे लाग। जिया पावसी अव्यंग। निजधाम माझे।।’’ या एका ओवीत ज्ञानेश्वरीचे सार आहे. तेच गुरुदेव रानडय़ांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. गुरुदेवांच्या साधनमार्गातील नीतिविषयक विचार भक्तीभोवती केंद्रित होतात. भक्ती वाढवितो तो सद्गुण. भक्ती मारतो तो दुर्गुण. सुळावर चढणारा मन्सूर ‘मी देवाघरच्या पायऱ्या चढत आहे,’ असे पुकारतो. येशू ख्रिस्ताने हेच सांगितले. भक्ती हा सर्व संतांनी जीवनाचा गाभा मानला. लौकिकातले सारे व्यवहार एका भक्तीतून आले, की तीच देवपूजा असते. तुकाराम ‘देवाच्या संबंधे विश्वचि सोइरे’ असे सांगतात. पावसाच्या धारा आकाशातून सरळ पृथ्वीवर येतात, तशी भक्ती असावी. कबीर सांगतात, देवासाठी फकिरी पत्करली पाहिजे. भक्ती घाईत होत नाही. कबीर सांगतात, ‘साहेब मिलै सबुरी में’. ही सबुरी भक्ती देते. भक्तीत बुद्धी, भावना, इच्छाशक्ती या समप्रमाणात एकत्र येतात. गुरुदेव रानडय़ांच्या मते, भक्तीत थोडा रजोगुण मिसळला की भक्ती कृतिशील होते. याला तुलसीदास ‘रामभरोसे’ म्हणतात. भक्ती निर्भय करते. संतांची भक्ती अशी जरतारी असते. संत कोण? यावर गुरुदेव रानडे म्हणतात, ‘ज्याच्याकडे पाहिले असता देवाकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत.’ कबीर सांगतात, ‘जा के दरसन साहब दरसै’ भक्ती हा असा नेम होतो. तेथे भगवंतांचे अधिष्ठान असते. गुरुदेवांचे गुरू भाऊसाहेब उमदीकर होते. एकदा निंबळहून मुंबईस जाताना एका भक्ताला गुरुदेवांचा निरोप घेणे जमले नाही. म्हणून गुरुदेवांना मुंबईहून भक्ताने क्षमापत्र धाडले. त्याला उत्तरात गुरुदेव म्हणाले, ‘तुमचा नेम हीच भेट असे समजावे. नेम उत्तम केल्यानंतर भेट झाली अथवा न झाली याला महत्त्व नाही. नेम हीच खरी आराधना.’ समर्थ रामदास सांगतात, ‘मागील उजळणी पुढे पाठ। नेम धरावा निकट ।।’
यशवंत पाठक

कुतूहल
रेडिओ खगोलशास्त्र

रेडिओ खगोलशास्त्र कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे?
रेडिओलहरींची तरंगलांबी साधारण मिलिमीटर ते किलोमीटर या दरम्यान असते. आकाशस्थ वस्तूंकडून येणाऱ्या या रेडिओलहरींपैकी बहुतांशी लहरी वातावरण पार करून पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकतात. या लहरींचा वेध रेडिओ दुर्बिणीद्वारे घेतला जातो. आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल जान्स्की याने इ.स. १९३१ मध्ये लावला असला, तरी खऱ्या अर्थाने रेडिओ खगोलशास्त्राचा विकास दुसऱ्या महायुद्धानंतर झाला. याला महायुद्धाच्या काळात विकसित झालेले रडारचे तंत्रज्ञान कारणीभूत ठरले. जॉड्रेल बँक (इंग्लंड) तसेच अरेसिबो (प्युटरे रिको) येथील इ.स. १९५०-६०च्या सुमारास बांधलेल्या महाकाय रेडिओ दुर्बिणीपासून हे तंत्रज्ञान आता व्हेरी लार्ज अ‍ॅरे (अमेरिका) व जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (भारत) या अत्याधुनिक संकुलापर्यंत विकसित झाले आहे.
रेडिओ खगोलशास्त्राद्वारे अनेक महत्त्वाचे शोध लागले आहेत. यातील एक महत्त्वाचा शोध स्पंदकांचा. इ.स. १९६७ साली इंग्लंडमधील मलार्ड रेडिओ वेधशाळेतील संशोधकांना एक अज्ञात स्रोताकडून अत्यंत नियमित कालावधीचे रेडिओ संदेश येताना आढळले. ही रेडिओस्पंदने न्यूट्रॉन ताऱ्यांकडून येत असून, अशा अनेक स्पंदकांचा आता शोध लागला आहे. यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे शौरी तारकासमूहातील न्यूट्रॉन ताऱ्यांच्या जोडीचा. या जोडीकडून येणाऱ्या रेडिओलहरींच्या स्वरूपातील बदलावरून आईन्स्टाईनच्या व्यापक सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताला पुष्टी मिळाली. याखेरीज आकाशगंगेचे केंद्र अतिनवताऱ्यांचे अवशेष, काही दीर्घिका, क्वेसार इत्यादींकडून येणाऱ्या रेडिओलहरीही शोधल्या गेल्या आहेत. हायड्रोजनच्या अणूंकडून उत्सर्जित होणाऱ्या २१ सेंटिमीटर तरंगलांबीच्या प्रारणांच्या अभ्यासातून आकाशगंगेचा सर्पिलाकृती आकार निश्चित झाला. या तरंगलांबीवरून मोजलेल्या हायड्रोजनच्या अणूंच्या गतीवरून कृष्णपदार्थाच्या अस्तित्वाविषयी अप्रत्यक्ष पुरावा मिळाला. विश्वनिर्मितीच्या महास्फोटाच्या सिद्धान्ताला बळकटी देणाऱ्या सूक्ष्मतरंगाच्या प्रारणांचा शोधही रेडिओ खगोलशास्त्रातलाच.
वर्षां चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
गो. नी. दांडेकर
गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ गो.नी.दा. अर्थात आप्पा या नावाने महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या दुर्गव्यासंगीचा जन्म ८ जुलै १९१६ रोजी विदर्भातील परतवाडा येथे झाला. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आप्पांनी ३३ कादंबऱ्या, ६ प्रवासवर्णने, ११ धार्मिक व पौराणिक ग्रंथ, नाटके तसेच मुलांसाठी गोष्टीही लिहिल्या आहेत. १९८१च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. समर्थ रामदासस्वामींचा पगडा असलेले आप्पा वयाच्या तेराव्या वर्षीच घरातून पळाले. पायाला अक्षरश: भिंगरी लावून त्यांनी दुर्गभ्रमंती केली. त्यांच्यामुळेच ‘दुर्गसाहित्य’ हा नवा प्रकार मराठी साहित्यात अवतरला. ‘बया, दार उघड’, ‘हर हर महादेव’, ‘झुंजारमाची’, ‘हे तो श्रींची इच्छा’ या त्यांच्या कादंबऱ्या आपल्याला शिवकाळात घेऊन जातात. याशिवाय भाक्रा-नांगल धरणांवर आधारित ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’, ‘आनंदभुवन’ ही सामाजिक विषयांवर तर ‘मोगरा फुलला’, ‘दास डोंगरी राहातो ’ यातून संतांची कामगिरी विशद केली. जवळ जवळ पाच दशके सहय़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून फिरून २५० किल्ल्यांचा इतिहास आप्पांनी जिवंत केला. त्याचबरोबर ऐतिहासिक वस्तू गोळा करण्याचा छंदही जोपासला. १ जून १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. ल्ल संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
कष्टपुष्ट भूत
कार्तिक अगदी गरीब होता. आपल्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही. कायम दु:ख आणि दारिद्रय़च आपल्या वाटय़ाला आले आहे, याचे त्याला फार वाईट वाटे. एके दिवशी कार्तिक फारच वैतागला. हे आजूबाजूचे शहर, लोक, बागा, दुकाने, हॉटेल्स, मला काही म्हणजे काहीसुद्धा पाहायचे नाही. तो शहर सोडून दाट अरण्यात गेला. इथेच अन्नपाण्यावाचून आपण मरून गेलो तरी चालेल, पण शहरात जाऊन लाजिरवाणे, दरिद्री जगणे आता बस्स झाले, असे त्याला वाटले. अरण्यात एका विशाल वृक्षाखाली तो खिन्नपणे बसला होता. दिवस मावळला. अंधारून आले. त्या भव्य वृक्षाच्या घनदाट पानांमधून एक जांभळट सोनेरी रंगाचे भूत खाली उतरले आणि त्याच्यासमोर उभे राहिले. कार्तिकने विचार केला, की या भुताने आपल्याला मारून टाकले तर सुटेन एकदाचा. तो डोळे मिटून भुताने हल्ला करण्याची वाट पाहात राहिला. पण त्याला भुताचा आवाज आला, ‘कार्तिका, मी कष्टाळू भूत आहे. काम सांग आणि मला गुंतवून ठेव. कार्तिकने विचारले, ‘तुझं नाव काय?’ ‘कष्टपुष्ट’ भूत म्हणाले, ‘धष्टपुष्ट?’ कार्तिकने विचारले, तसे भूत रागावून म्हणाले, ‘नाही रे, मी कष्ट करतो आणि तब्येत कमावतो म्हणून कष्टपुष्ट.’ कार्तिकला काही कळले नाही. तो म्हणाला, ‘बरं बरं’. भूत म्हणाले, ‘काम सांग आणि मला गुंतवून ठेव. ज्या क्षणी काम संपेल त्या क्षणी मी तुला खाईन.’ कार्तिक आनंदाने म्हणाला, ‘अरे, खूप कामे आहेत. हे अरण्य साफ कर. इथं शहर वसव.’ ‘झाले, शहर’ भूत म्हणाले. ‘माझ्यासाठी शहरात राजवाडा बांध.’ ‘झाला बांधून.’ ‘पैसे आण.’ ‘आणले..’ मग मात्र कार्तिक घाबरला. त्याला वाटले होते एवढे करायला खूप काळ जाईल. तोपर्यंत आपण मजेत जगू. भूत गुरगुरले. ‘काम सांग, नाही तर खातो तुला.’ कार्तिकने खूप विचार केला. त्याच्या लक्षात आले, की कितीही काम असले तरी ते शेवटी संपते. उगीच आपण रडायचो की आयुष्यात काही घडत नाही. दु:ख, दारिद्रय़च आपल्याला मिळाले आहे. सगळे मानण्यावर आहे. त्याला शक्कल सुचली. तो भुताला म्हणाला, ‘आता माझ्या मोत्या कुत्र्याला शोध आणि त्याचे शेपूट सरळ कर.’ भुताने मोत्याचे शेपूट सरळ केले, पण शेपूट सोडल्यावर झालं पुन्हा वाकडं. भुताने खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. शेवटी भूत कंटाळले. म्हणाले, ‘मला हे काम नको. माझे शब्द परत घेतो. हवं असल्यास तुला जे दिलंय तेही तूच घे, पण मला आता हे काम करायचे नाही. तू जिंकलास. आपले आयुष्य बदलणे आपल्या हातात असते. कष्ट आणि कल्पकता या दोन गोष्टी जवळ असल्या की आयुष्य बदलायला, अधिक चांगले व्हायला वेळ लागत नाही.
आजचा संकल्प - माझी एखादी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी धडपडेन.
ज्ञानदा नाईक

dnyanadanaik@hotmail.com