Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

सावरकरांचे स्मारकही उपेक्षित आणि दुर्लक्षित!
अनिरुद्ध भातखंडे

पनवेल - देशाच्या स्वातंत्र्यप्रश्नप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरून सर्वस्वाचा त्याग करणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर! त्रिखंडात गाजलेल्या सावरकरांच्या ऐतिहासिक समुद्र उडीचा शतक महोत्सवी वर्षारंभ आजपासून सुरू होत आहे. ब्रिटिश पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी सावरकरांनी ८ जुलै १९१० रोजी ती साहसी उडी घेतली. त्यानंतरचा इतिहास सर्वज्ञात आहे; परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी दोन जन्मठेपा भोगणाऱ्या या सुपुत्राची स्वातंत्र्योत्तर काळातही उपेक्षाच झाली. त्यानंतर आजवर सतत चुकीचा इतिहास शिकविला गेल्याने सावरकरांच्या पुतळ्यांची, स्मारकांचीही सरकारदरबारी उपेक्षाच होत आहे. पनवेलमधील त्यांचा दुर्लक्षित पुतळा हे याचे उत्तम उदाहरण आहे.

 


पनवेलमधील बल्लाळेश्वर मंदिरासमोर असणाऱ्या सावरकरांच्या स्मारकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याची घोषणा पनवेल नगर परिषदेतर्फे ३१ मे रोजी करण्यात आली. या घोषणेला सव्वा महिना उलटल्यानंतरही त्याबाबत काहीच हालचाली नाहीत. या पुतळ्याजवळ कोठेही सावरकरांचा नामोल्लेख नाही. त्या परिसरातील चौकाला ‘सावरकर चौक’ असे संबोधले जात असूनही कोठेही तसा फलक नाही. तसेच या पुतळ्याच्या आवारात सावरकरांचे तत्त्वज्ञान, चरित्र समजू शकेल असा स्तंभ नाही, आदी गोष्टी ‘वृत्तान्त’ने चार महिन्यांपूर्वी प्रकाशात आणल्या होत्या. पालिकेतर्फे सावरकरांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही, यावरही ‘वृत्तान्त’मध्ये आक्षेप घेण्यात आला होता. या लेखातून प्रेरणा घेऊन ‘वेद प्रतिष्ठान’ या संस्थेच्या तरुणांनी सावरकर स्मारकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याची परवानगी पालिकेकडे मागितली. त्यासाठी येणाऱ्या खर्चासाठी ‘केशवस्मृती पतपेढी’चे प्रश्नयोजकत्वही मिळविले. त्यानंतर ३१ मे रोजी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात ही योजना नागरिकांसमोर मांडण्यात आली. त्यावेळी उपस्थित असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी आणि अन्य पक्षाच्याही नगरसेवकांनी एकमुखाने या योजनेला मंजुरी दिली; परंतु त्यानंतर आजपर्यंत याबाबतीत काहीच पावले उचलली न गेल्याने सावरकरप्रेमी नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. सावरकरांच्या त्या ऐतिहासिक समुद्र उडीच्या शतक महोत्सवी वर्षारंभाचा मुहूर्त साधून या स्मारकाचे उद्घाटन व्हायला हवे होते; परंतु सत्तेसाठी झगडणाऱ्या राजकारण्यांना सावरकर महत्त्वाचे वाटत नसावेत, अशी जळजळीत प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी पालिका बजेटमध्ये एक कोटी रुपये मंजूर करते आणि सावरकर स्मारकासाठी मात्र एक लाख रुपये एका पतसंस्थेकडून घेण्याची वेळ येते. राष्ट्रपुरुषांमध्ये असा भेदभाव नेमका कशासाठी केला जातो, असा थेट प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सावरकर स्मारकाची उपेक्षा पालिका थांबवेल का?

माशांच्या संवर्धनासाठी प्रशिक्षण
पनवेल - मुंबईतील तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रातर्फे ‘निमखाऱ्या पाण्यातील खेकडा आणि जिताडा माशांचे संवर्धन’ या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये या माशांचे संवर्धन, त्यांचे आजार, जीवशास्त्र, खाद्य व्यवस्थापन, बीज उपलब्धता याबाबतीत प्रश्नत्यक्षिकांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी- संचालक, तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मुंबई- दूरध्वनी क्र. २६५१६८१६ अथवा प्रश्न. वर्तक-९८२१९०५३५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
पनवेल - रायगड जिल्हा रस्सीखेच असोसिएशनतर्फे यंदा तिसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय महिला निवड चाचणी आणि अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खांदा कॉलनी येथील महात्मा विद्यालयात ११ जुलै रोजी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीवरून १८ आणि १९ जुलै रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठीच्या संघाची निवड होणार आहे. सबज्युनियर, ज्युनियर आणि सीनियर अशा तीन गटांमध्ये केवळ मुलींसाठीच ही स्पर्धा होणार आहे. संपर्क- ९९६७३३०६९५.

स्लॅब कोसळून चार जण जखमी
बेलापूर - सानपाडा सेक्टर-८ येथे गटारावरील स्लॅब कोसळून तीन व्यक्तींसह एक चार वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. सिडकोने काही वर्षांपूर्वी हा नोड विकसित केला आहे. येथील रस्ते व गटारे सिडकोने बांधली आहेत. संतोष पवार, बबन कांबळे, शिवाजी घुगे व विशाल कांबळे (४) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. रविवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी पदपथावरून चालण्याचा प्रकार या रहिवाशांना चांगलाच महागात पडला. सेक्टर-८ येथील नवरत्न सोसायटीच्या जवळील गटाराचे काम सिडकोने केले आहे. या कोसळलेल्या स्लॅबचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते, असा आरोप शिवसेना विभागप्रमुख घन:श्याम पाटे यांनी केला आहे. अशाच प्रकारची घटना गेल्यावर्षीही घडली होती, मात्र सुदैवाने त्यात कोणतीही हानी झाली नाही. रविवारी झालेल्या दुर्घटनेत या स्लॅबवर असलेल्या एमएसईबीचे दोन मिनी पिलरही गटारात कोसळले व विद्युत वाहिन्या उघडय़ा पडल्या. तब्बल १० मीटर स्लॅब खचला आहे. या स्लॅबवर दोन फुटांची भर टाकण्यात आल्याने तो खचल्याचे बोलले जाते.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
बेलापूर - येथील विद्या प्रसारक हायस्कूलचा दहावीच्या परीक्षेत ८३.७२ टक्के निकाल लागला. सुप्रिया नवनाथ वाघमोडे, फिरोज हच्छन अन्सारी आणि निशा उत्तम थोरात यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.