Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पाऊस आला तरी पूररेषा आखणीबाबत प्रशासकीय यंत्रणांची टोलवाटोलवीच!
अनिकेत साठे / नाशिक

 

शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषा आखणीचे अंतिम टप्प्यात आलेले काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देणाऱ्या पाटबंधारे विभागाने आता पावसाळा जसा पुढे सरकत आहे, तसा सोयीस्कररीत्या ‘बॅकफूट’ जाण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते. या प्रक्रियेतील विविध टप्पे पार पडल्यानंतर मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना अर्थात सीडीओने पूर पातळीच्या अभ्यासाची माहिती सादर न केल्यामुळे हे काम रखडले असल्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे. दुसरीकडे पूर रेषा प्रत्यक्ष जागेवर स्थापित करण्यासाठी जोपर्यंत शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही, तो पर्यंत या कामाचे भवितव्य अधांतरी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिणामी, या वर्षीही नाशिककरांना नदीकाठावरील धोकादायक क्षेत्राचे अवलोकन करता येणार किंवा नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
सलग चार ते पाच वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेल्या गोदावरी, वालदेवी, दारणा, नासर्डी, वाघाडी या नद्यांच्या पूर रेषा आखणीचा विषय गतवेळचा अनुभव लक्षात घेता, यंदा पावसाचे आगमन होण्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाने जय्यत तयारी केली असल्याचे प्रारंभी सांगण्यात आले. तथापि, मे मध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलेले काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. महापालिकेच्या असहकाराच्या धोरणामुळे आधीच अनेक वर्षे रखडलेल्या पूर रेषा आखणीच्या कामात पाटबंधारे विभागही पुन्हा तोच कित्ता गिरवत असल्याची नागरिकांची भावना बनू लागली आहे. गेल्या वर्षी महापुराचा तडाखा बसल्यानंतर पूर रेषा आखणीचे महत्व सर्वाच्या लक्षात आले होते. शासन व नागरिकांचा दबाव लक्षात घेवून महापालिकेने ५० लाखाचा निधी त्यासाठी पाटबंधारे विभागाच्या स्वाधीन केला होता. तेव्हापासून या कामाने वेग पकडला खरा, पण अंतिम टप्प्यात त्याला करकचून ‘ब्रेक’ लागल्याचे दिसत आहे. पूर रेषेचे काम पूर्णत्वास जावे याकरिता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत बैठक घेऊन या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. महापालिकेकडून निधी प्राप्त झाल्यावर आतापर्यंत पालिका हद्दीतील गोदावरी १९.३० किलोमीटर, नासर्डी १६.७०, वालदेवी १८.४०, वाघाडी ९.८० तर दारणा ४.६० किलोमीटर अंतराच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच विशिष्ट अंतरावर दोन्ही तीरांवरील तलांक घेणे, जमिनी पातळीचे मोजमाप करून नकाशे बनविण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. नकाशे पूर्ण झाल्यावर प्रत्येक किलोमीटरसाठी डबलफ्लाय लेव्हलने तात्पुरते स्थिरचिन्हे करणे, संपूर्ण क्षेत्राचे गाव नकाशे प्राप्त करून संगणकावर उपरोक्त तलांक चिन्हांकित केले जातील. त्यानंतर धरण संहितेच्या निकषानुसार निषिद्ध व नियंत्रण क्षेत्रासाठी पूर विसर्ग ठरवून निळी व लाल रेषा प्रत्यक्ष जागेवर दगडाने स्थापित केली जाणार आहे. हे काम जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात पूर्ण होणार असल्याचे पाटबंधारे विभागाने यापूर्वी स्पष्ट केले होते. या प्रक्रियेत नद्यांमधील विसर्ग अर्थात महत्तम पूर पातळीच्या अभ्यासाचे काम मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडे सोपविण्यात आले. या संस्थेकडून अद्याप विसर्गाची आकडेवारी मिळत नसल्याने नकाशा बनविण्याचे व त्या पुढील प्रत्यक्ष जागेवर रेषा चिन्हांकित करण्याचे काम खोळंबल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.
पूर रेषा प्रत्यक्षात न येण्यात निधीची उपलब्धता ही एक महत्वाची अडचण असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा विषय उपस्थित झाल्याचे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील सर्व नद्यांच्या पूर रेषा निश्चितीसाठी तीन ते चार कोटी रुपयांची गरज आहे. जोपर्यंत शासनाकडून हा निधी उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हे काम पूर्णत्वास जाणे अवघड असल्याचे वेलरासू यांनी सांगितले. यामुळे नाशिककरांना यंदा पूर रेषेची प्रत्यक्षात आखणी झाल्याचे पहावयास मिळते की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.