Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

विविध कार्यक्रमांमधून गुरूप्रती ऋण व्यक्त
प्रतिनिधी / नाशिक

 

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूसारखा वाटाडय़ा नसेल तर मार्ग चुकण्याची शक्यता असते. त्यामुळेच हा मार्ग निर्धोकपणे पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्या गुरूचे ऋण व्यक्त करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीने जपली आहे. आधुनिक काळातही ही परंपरा अखंडित राहण्यामागे गुरू-शिष्य यांच्यातील असामान्य नातेच कारणीभूत असावे. त्याचाच प्रत्यय मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून आला.
गुरूप्रती ॠण व्यक्त करण्यासाठी नाशिकमधील स्वामी समर्थ केंद्र, आसारामबापू आश्रम, सिध्दयोग केंद्र, श्रीहरीमंदिर, अशा अनेक अध्यात्मिक केंद्रांमध्ये सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्म, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, क्षेत्र कोणतेही असो ‘गुरूबिन कौन बतावे बाट’ म्हणत शिष्याला प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी गुरूंचा हात हाती घ्यावाच लागतो. हाच धागा पकडून कीर्ती कलामंदिरच्या आजी-माजी विद्यार्थिनींनी रेखा नाडगौडा यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पर्जन्यराजाचे स्वागत करण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने ‘नभ उतरू आलं’ हा कार्यक्रम सादर केला. परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात स्वर आणि नुपुराच्या साथीने पदन्यास रंगला. वेदमाता गायत्री परिवार ट्रस्टतर्फे महिरावणीच्या गायत्रीधाममध्ये गायत्री मंत्र जप, गायत्री यज्ञ या धार्मिक कार्यक्रमांसह वृक्षारोपणही करण्यात आले.
जीवन विद्या मिशनतर्फे सायंकाळी इंदिरानगर येथील साईअक्षता मंगल कार्यालयात बन्सीधर राणे यांचे ‘तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या संकल्पनेवर आधारीत व्याख्यान झाले. सावरकरनगर येथील आसाराम बापू आश्रमात सकाळी प्रार्थना, जप, श्रीआसाराम पाठ, पाद्यपूजन, ध्यान, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम झाले. दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह उत्तर महाराष्ट्रातील सर्व स्वामी समर्थ केंद्रावर विविध कार्यक्रम झाले. दिंडोरी केंद्रात अण्णासाहेब मोरे व त्र्यंबकेश्वर गुरूपीठ केंद्रात व्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी श्री गुरूपादुका पूजन, भूपाळी, अभिषेक, गुरूपद सोपविण्याचा सोहळा, श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण असे कार्यक्रम झाले. यावेळी अनेकांनी अनुग्रहही घेतला. बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे प्रत्येक महिन्याच्या रविवारी व पौर्णिमेला धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात गुरूपौणिमेनिमित्त उत्तमनगरच्या त्रिसरण बुध्दविहारमध्ये झाली. प्रवचन व खीरदान आर. आर. जगताप, जीजीबाई जगताप यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे सायंकाळी गुरूपूजन व सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते.