Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

बडय़ा थकबाकीदारांच्या वसुलीत अपयशी संस्था अवसायनात काढणार
प्रतिनिधी / नाशिक

 

असुरक्षित आणि बडय़ा कर्जदारांचे कर्ज वसूल होत नसेल तर अशा संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय जिल्हा कृती समितीने घेतला आहे. अशा संस्थांमध्ये अग्रसेन, झुलेलाल व क्रेडिट कॅपिटल या तीन पतसंस्थांचा समावेश असल्याचे समिती सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी कळवले आहे.
जिल्हा कृती समितीची बैठक जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. विषय पत्रिकेतील नऊ विषयांवर चर्चा झाली. बढे सहकारी पतसंस्थेचे बडे कर्जदार रामराव चौधरी पाटील यांची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. बडय़ा कर्जदारांवर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कर्ज वसुलीसाठी आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याचेही बैठकीत ठरले. त्यासाठी स्वतंत्र पोलीस पथकाची निर्मिती करण्याची भूमिका सदस्यांनी मांडली. पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्याकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बैठक घेण्याचेही ठरले.
दरम्यान, संस्था डबघाईस आल्यानंतर विविध उपाययोजनांसाठी प्रयत्न केले जातात. त्यापेक्षा या संस्था डबघाईस येऊ नयेत, अशी प्रथमपासून दक्षता घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या सूचनेचा सदस्यांनी गौरव केला. यावेळी झालेल्या चर्चेत पोलीस उपआयुक्त जय जाधव, जिल्हा उपनिबंधक शरद जरे, जिल्हा लेखा परीक्षक, मुद्रांक दुय्यम निबंधक, सहकार विभागाचे राजेंद्र इप्पर आदींसह संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.