Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महापौरांचे बे दुणे पाच अन् पाणीकपातीचा जैसे थे जाच!
प्रतिनिधी / नाशिक

 

अभ्यास न करता कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होणे खचितच अवघड बाब. त्यातही जर तो विषय आकडेमोडीशी संबंधित अर्थात गणिती असेल तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. तथापि, शहराचे प्रथम नागरिक मात्र त्याला बहुदा अपवाद असावेत. ज्या पावसाने महापालिका हद्दीतील रस्त्यांवरून साधे पाणी देखील वाहू शकले नाही, त्याचा संबंध थेट गंगापूर धरणात जमा झालेल्या अतिरिक्त जलसाठय़ाशी जोडून महापौरांनी अशी काही अफलातून आकडेमोड केली, की ती थेट सध्या लागू असलेल्या पाणी कपातीचे संकट लगोलग दूर करणारी ठरली! कारण, येत्या दोन दिवसात पाऊस असाच सुरू राहिला तर शहरात सध्या लागू असलेली २० टक्के पाणी कपात शुक्रवारपासून रद्द होणार असल्याची घोषणा त्याआधारे करून शहरवासियांना त्यांनी दिलासाही देऊन टाकला. पण.. महापौरांनी सोडविलेला पेपर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी आला अन् राजकारणातील समीकरणे सोडविण्यात माहीर असणारे महापौर या बाबतीतल्या आकडेमोडीत मात्र फारच पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर आपल्या म्हणण्याच्या पुष्टय़र्थ जिल्हाधिकाऱ्यांनी सध्याच्या जलसाठय़ाची स्थिती जैसे थे असल्याचे पत्रकही प्रसिद्धीस दिले, हे विशेष.
सलग दोन दिवस शहरात झालेल्या पावसाने नाशिककरांना दिलास दिला खरा, पण त्याचा जोर जेमतेमच असल्याने एरवीप्रमाणे रस्त्यांवरून पाणी वाहिल्याचे दृष्य सुद्धा दिसले नाही. त्यामुळे किमान पुढील काळात तरी तो जोर पकडेल अशी शहरवासियांची अपेक्षा होती.
नाशिकचे महापौर विनायक पांडे हे तर प्रथम नागरीक. साहजिकच त्यांनाही रिमझिम पावसाचा कोण आनंद होणे स्वाभाविक होते. घडलेही अगदी तसेच. साधारणत महिनाभरापासून पाणी कपातीच्या ओझ्याखाली दबलेल्या नाशिककरांचे चेहेरे बहुदा त्यांना दिसत असावेत. त्यामुळेच की काय, ही पाणी कपात कधी एकदाची रद्द करता येईल याची चिंता त्यांना सतावत असावी. त्यामुळे मागील दोन दिवसातील रिमझिम सरींनी गंगापूर धरणात जमा झालेल्या पाण्याची संपूर्ण आकडेवारी त्यांनी गोळा केली आणि पाऊस असाच सुरू राहिला तर शुक्रवारपासून पाणी कपात रद्द करण्याचे स्पष्ट संकेत देवून टाकले. गेल्या दोन दिवसात गंगापूर धरण परिसरात ४५ मिलिमीटर तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३५ मिलिमीटर पाऊस झाला असून त्यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात १५ दशलक्ष घनफूट जलसाठा वाढला असल्याचा दाखला सोमवारी पांडे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला. महापौरांच्या या वक्तव्याने नाशिककरांना खरोखरच आनंद झाला, पण तो फार काळ टिकू शकला नाही.
महापौरांनी ही घोषणा करून टाकली असली तरी जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना केवळ बोलघेवडेपणा करून चालत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या यंत्रणेमार्फत त्याची पडताळणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी पत्रकार परिषदेत महापौरांच्या पाणी कपातीच्या घोषणेवर उत्तर देताना यंदा र्पजन्यमान अपेक्षेहून कितीतरी कमी असल्याने पाणी कपात मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. धरणांमध्ये अद्याप अतिशय अल्प जलसाठा असून शासन २० टक्के पाणीकपातीच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून पावसाचे पाणी गंगापूर धरणात येते, त्या ठिकाणी आतापर्यंत एकूण केवळ ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने गंगापूर धरणाच्या जलसाठय़ात २५ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली आहे.
दारणा धरणातील जलसाठा तर सहा दशलक्ष घनफुटाने कमी झाला आहे. गंगापूर धरणाची वाढ केवळ ०.३४ इतकी अल्प असताना पाणी कपातीचा निर्णय कसा रद्द करता येवू शकतो, असा प्रश्न वेलरासू यांनी उपस्थित केला. जिल्ह्य़ात समाधानकारक पर्जंन्यमान व धरणसाठय़ात लक्षणीय वाढ झाल्याशिवाय कपातीचा निर्णय मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गंगापूर धरणाची एकूण क्षमता पाच हजार ६३० दशलक्ष घनफूट असून सध्या धरणात केवळ १०६८ दशलक्ष घनफूट म्हणजे १८.९७ टक्के जलसाठा आहे. नाशिकरोडचा काही भाग वगळता उर्वरित संपूर्ण नाशिक शहराला प्रामुख्याने याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो.
नाशिककरांची तहान भागविण्यासाठी महापालिका दररोज गंगापूर धरणातून १४ ते १५ दशलक्ष घनफूट पाणी उचलते. याचा विचार केल्यास महापौरांनी जलसाठय़ात सांगितलेली वाढ ही केवळ एक दिवस पुरेल इतक्याच पाण्याची असल्याचेही लक्षात येऊ शकते.अभ्यास न करता परीक्षेला सामोरे जात ठोकताळे मांडल्यास प्रत्यक्षात जसा पेच निर्माण होतो, तशीच काहिशी स्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे महापौरांच्या या घोषणेचीही झाल्याची प्रतिक्रिया जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.