Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सचिन आणि विष्णुदेव मिश्रा

 

क्रिकेट विश्वातील सार्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि नाशिकचे तडफदार पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्यामध्ये कोणतेही साम्यस्थळ वा विरोधाभास असण्याची सुतराम शक्यता नाही, हे माहीत असूनही शीर्षकात दोघांना एकत्र गुंफण्याचा प्रकार करण्यामागे नाशिकचे शरद साठे यांचा विशिष्ट हेतू आहे. तो कोणता, या प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख.
१९८९ पासून जगातील प्रत्येक क्रिकेट मैदान गाजवणारा सचिन तेंडुलकर जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरतो तेव्हा, त्याच्या ज्ञात-अज्ञात, दृश्य-अदृश्य, आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या असतात. अपेक्षांचे प्रचंड दडपण तुझ्या खेळावर विपरित परिणाम करते का, या नेहमीच्या प्रश्नावर सचिनने उत्तर दिले होते, ‘फलंदाजीला जाताना दर वेळेस एक प्रकारचा ताणतणाव सुरूवातीस जाणवतोच. पिच, गोलंदाजी, हवामान यांच्याशी जुळवून घेईपर्यंत हा ताण किंवा दडपण वरखाली होत असतेच, पण चाहत्यांच्या दडपणाचे विचाराल तर मला ते दडपण कधीच वाटत नाही. उलटपक्षी, एवढय़ा प्रचंड संख्येने असणाऱ्या चाहत्यांचा पाठिंबा मला दरवेळेस नवी उमेद देत असतो. आई-वडिलांचे संस्कार आणि चाहत्यांचे कौतुक, हीच तर माझी भक्कम आणि अमोघ शक्ती आहे..
ते खरंच आहे. वेगवेगळ्या प्रसंगात आणि परिस्थितीत वसीम अक्रम आणि सकलेन, मुरली आणि वास, मॅग्रा-वॉर्न यांच्यासारख्या संहारक गोलंदाजांना आणि डॅरेल हेअर व स्टीव्ह बकनर यांच्या पक्षपाती व कुटील कारवायांना ‘खोल पुरून’ सचिन कितीतरी वर राहिला. कर्तृत्वाने, प्रतिष्ठेने, सदाचाराने आणि नैतिकतेने.
गेल्या महिनाभरात नाशकात ज्या घटना घडल्या आणि त्यावेळी सत्ताधाऱ्यांच्या उर्मट आणि उन्मत्त अरेरावीला न जुमानता पोलीस आयुक्त विष्णुदेव शर्मानी जी धिटाई व तडफ दाखविली आणि नाशिककरांना जवळपास ‘प्रथमच’ सिस्टीमला न जुमानता, जो दिलासा दिला, त्यामुळेच ते तमाम नाशिककरांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. त्याचे कारण उघड आहे. महापालिकेचे प्रशासन काय किंवा पोलिसी प्रशासन. यांनी आतापर्यंत कधी नाशिककरांच्या हितासाठी आपली सत्ता राबवली असे अगदी क्वचितच घडले. त्यामुळेच टुमदार नाशिकची आज बजबजपुरी झाली आहे.
आजपर्यंत नाशिकमध्ये कोण कोण आयुक्त आले? त्यांनी त्यांच्या दप्तरात बसून काय काम केले ? काय भक्षण केले ? काय प्राशन केले ? कोणाच्या बंगल्यावर हजेऱ्या लावण्याव्यतिरिक्त काय केले ?, म्हणजेच नाशिककरांचे जीवन सुखावह व सुसह्य़ होण्यासाठी काय केले, याचा जर लेखाजोखा काढला तर केवळ सत्ता आणि संपतीसाठीच काय काय करता येते, त्याचा एक प्रत्ययकारी व स्फोटक वृत्तान्त मिळू शकेल.
विष्णुदेव मिश्रा ‘त्या’ पठडीतले प्रशासक नव्हेत, हे गेल्या काही दिवसातील घटनांनी सिद्ध केले आहे. सर्वशक्तिमान सत्ताधिशांपुढे केवळ ‘मान’ वर करून बोलल्यास तो अक्षम्य प्रमाद समजला जातो व त्या ‘सत्यवचनाचे’ नाव तत्काळ काळ्या यादीत टाकले जाते, असे म्हणतात. विष्णुदेवांना हे ठाऊक नसेल असे कसे म्हणता येईल ? आणि तरीसुद्धा..
गेल्या महिन्याभरात जे काय घडले, त्याची पुनरावृत्ती करण्याची अजिबात गरज नाही. हो, एक अक्षरश: अलौकिक घटना घडली. नाशिकवर ‘जागे’ झाले आणि स्वत:च्या हितासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आले. अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्याच्या ‘कथा’ वारंवार सांगितल्या जातील. हा चमत्कार कसा घडला ? याचे विश्लेषण समाजशास्त्रज्ञ करतीलसुद्धा. कदाचित शिशुपालाप्रमाणे सत्ताधाऱ्यांचे शंभर अपराध तरी भरले असतील व कृष्णावतार नव्हे, तर विष्णुदेव धावून आला असेल.
ते काहीही असो, सत्ताधाऱ्यांना, त्यांच्या गुर्मीला वाकवता येते हे महासोशिक नाशिककरांच्या लक्षात आले आहे आणि त्यातून विष्णुदेवांसारखा अधिकारी असेल तर ‘नाशिक’ सुधरवतासुद्धा येऊ शकेल, असे वाटू लागले आहे. कालपरवा सायंकाळी सातच्या सुमारास नेहरू उद्यान जवळून ‘सावाना’कडे जाताना याची प्रचिती आली. फेरीवाल्यांचा गराडा विरळ झाला होता. चालणे किंचित सुसह्य़ वाटू लागले होते. अन्यथा नाशकातला कोणताही रस्ता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. ही केवळ सुरूवात आहे. नाशकातील रस्त्यांवरील बेशिस्त व धोके जाणून घेण्यासाठी खरं तर ‘हरून अल रशीद’ प्रमाणे सकाळ, संध्याकाळ लालदिव्यांच्या वाहनाविना शहराचा फेरफटका मारायला हवा. मग ठक्कर बाजारासमोरील रिक्षा, मोठय़ा बसेस, सीबीएसवरील अस्ताव्यस्त रिक्षा, रविवार कारंजा, मेनरोड, चांदवडकर लेन, महात्मा गांधी रोड, कॉलेजरोड, पंचवटी कारंजा, प्रभात चित्रपटगृहाजवळील परिसर अशा अनेक स्थळांचा परामर्श घेता येईल.
हे सर्व करणे म्हणजे मधमाशांच्या पोळ्यास डिवचण्यासारखेच आहे. कारण कोणतीही कारवाई केल्यास रिक्षावाले, फेरीवाले यांच्या संघटनांचे नेते प्रत्युत्तर देतील, बंद पुकारतील. त्यांचे ‘पालक’ राजकीय पक्ष पुढे सरसावतील. अन्याय (?) करणाऱ्यांच्या बदलीचा एखाद दुसरा फतवापण काढला जाईल. गुन्हेगारीला आळा बसला तर हप्ताबंदी होईल. ज्यांचा ज्यांचा लाभांश बंद होईल ते बोंबा मारतील..आयुक्तांचया नादाने.
अशा प्रत्येक वेळी नाशिककरांनी पुन्हा पुन्हा विष्णुदेवांना आपला संपूर्ण पाठिंबा, सक्रिय व जाहीर मदत देणे अनिवार्य ठरणार आहे. विष्णुदेवांकडून नाशिककरांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. पण या अपेक्षा म्हणजे मिश्रासाहेबांच्या पाठीशी असणारी नाशिककरांची एकजुटीची शक्ती ठरावी.
अपेक्षा उगाच कोणाकडून केल्या जात नाहीत.
सचिन मैदानावर निघाला की अपेक्षा उंचावतात. त्या बहुतेक वेळेस तो पूर्ण करतो. १८ ते २० लाख नाशिककरांपैकी बहुसंख्यांच्या अपेक्षा आज मिश्रा साहेबांमुळे खूप खूप उंचावल्या आहेत. अगदी पहिल्यांदाच..
मिश्रासाहेब त्या पूर्ण करण्यात यशस्वी होवोत. त्यांनीसुद्धा सचिनप्रमाणे अपेक्षांचे दडपण जाणवू न देता त्या अपेक्षा म्हणजेच बहुसंख्य नाशिककरांचा पाठींबा व कौतुक असे समजून आपले प्रामाणिक कर्तव्य पार पाडावे हीच इच्छा.