Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप, पेरण्या सुरू
प्रतिनिधी / नाशिक

 

सलग दोन दिवस तुरळक का होईना हजेरी लावणाऱ्या पावसाने तिसऱ्या दिवशी मात्र उत्तर महाराष्ट्रात काहिशी उघडीप घेतल्याचे दिसत आहे. सर्वाधिक पावसाची नोंद होणाऱ्या इगतपुरी तालुक्यासह नाशिक, देवळा, बागलाण, दिंडोरी तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ात मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, आदल्या दिवशी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बागलाण तालुक्यातील कुंजण, भिलवाड, शेवटे येथील ४० ते ५० विहिरी बुजल्या गेल्या तर पुरात २० ते २५ शेळ्या वाहून गेल्याचे स्थानिक यंत्रणेमार्फत सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसात फारसा जोर पकडला नसला तरी रिपरिप सुरू असल्याने शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. कमी-अधिक प्रमाणात सुरू असणाऱ्या सरींनी मंगळवारी विश्रांती घेतली.
काही भागांचा अपवाद वगळता नाशिक शहरासह इगतपुरी, दिंडोरी, बागलाण व देवळा तालुक्यात दिवसभर पावसाने उघडीप घेतली. सकाळपासून बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्य़ात थोडय़ा-फार फरकाने असेच चित्र पहावयास मिळाले. पावसाने धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ झाली नसली तरी वातावरणातील उष्म्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी ३५ ते ३६ अंशावर पोहोचलेला पारा सध्या २७.८ येवून स्थिरावला आहे.
दोन दिवस झालेल्या तुरळक पावसाला बागलाण तालुका अपवाद ठरला. तुफान पर्जन्यवृष्टीने या तालुक्याच्या पश्चिम भागाला झोडपून काढले. कांद्याच्या चाळी उद्धस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. खालचे टेंभे या गावात कृषी विभागाने बांधलेल्या पाझर तलावास तडा गेला. शेतकऱ्यांच्या जलवाहिन्या वाहून गेल्या. पाण्याचा जोरदार लोंढा शिरल्याने ४० ते ४५ विहिरी बुजल्या गेल्या. घरांची पडझड होऊन पुराच्या पाण्यात अनेक शेळ्याही वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी गटविकास अधिकारी आर. एस. अहिरे यांनी केली. डोंगर उतारावरून पाण्याचे लोंढे गावात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या १५ बक ऱ्यांचे मृतदेह हाती लागले. बागलाण शहर व परिसरात आतापर्यंत २२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यामुळे जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळून वीज वाहिन्या तुटल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. लखमापूर जवळील मांजऱ्या नाला वाहू लागल्याने वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. गिरणा, आरम व मोसम नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्य़ात गेल्या आठवडय़ात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरणीच्या कामांनी जोर पकडला आहे. पावसामुळे पाणीटंचाईचे निर्माण झालेले संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. हतनूर, वाघूर, बोरी धरणांच्या जलसाठय़ात चांगलीच वाढ झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जून महिना संपण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्य़ात पावसाचा मागमूस नव्हता. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या ४९५ गावांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात आषाढीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्य़ात पावसाचे पुनरागमन झाले. त्याचा जोर वाढू लागल्याने रखडलेल्या पेरणीच्या कामांना शेतकऱ्यांनी जोमाने सुरूवात केली. जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात मे महिन्यात बागायती कापसाची लागवड केली जाते. उर्वरित कोरडवाहू जमिनीवरील पेरण्या मात्र पावसावर अवलंबून असतात. त्यांचीही कामे आता पूर्णत्वाच्या दिशेने असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.