Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिक पीएफ कार्यालयाचे कामकाज लवकरच ऑनलाईन
नाशिक / प्रतिनिधी

 

पीएफ कार्यालयाचे कामकाज आता ऑनलाईन सुरू होत असून महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे व नागपूरसह देशातील २५ कार्यालयांचे काम पहिल्या टप्प्यात होणार आहे, अशी माहिती नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) तर्फे निमा हाऊस येथे आयोजित ‘कामगार पेन्शन योजना १९९५’ या विषयावरील चर्चासत्रात केंद्रीय अतिरिक्त पीएफ आयुक्त डॉ. ए. महेंद्र राजु यांनी दिली.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष रमेश वैश्य, सरचिटणीस धनंजय बेळे, आयआर अ‍ॅण्ड एचआरडी उपसमितीचे अध्यक्ष उमेश राठी, विभागीय पीएफ आयुक्त डी. के. सिंग उपस्थित होते. जागतिक मंदीचा फटका भारताला कमी बसण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील ३६ टक्के बचत ही पीएफच्या माध्यमातून होत असल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे, असे यावेळी बेळे यांनी सांगितले. वैश्य यांनी प्रास्तविकात निमाच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी राजु यांनी देशात ७० कोटी कामगार काम करतात, परंतु त्यापैकी फक्त सात कोटीच कामगारांचा पीएफ जमा होत असल्याचे सांगितले. कंत्राटी, सिक्युरिटी, घरकाम करणारे, साखर कारखान्यातील, इलेक्ट्रिकल तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांचा पीएफ जमा होत नाही. या असंघटित क्षेत्रातील कामगारांचा पीएफ भरण्याची जबाबदारी मूळ मालकाची असून नियमानुसार त्यासाठी मालकांवर कारवाई होऊ शकते. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पीएफ सुविधा असणे गरजेचे असून त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून तुम्हाला पैसे जमा करणे, काढणे, किती पैसे जमा झाले हे बघणे ही कामे पटकन होणार असल्याचे राजु म्हणाले. तसेच पेन्शन फंडात जमा होणाऱ्या रकमेवर प्राप्तीकरही नसल्याचे त्यांनी सांगितले.
सिंग यांनी स्लाईड शोव्दारे उपस्थितांना इन्शुरन्स फंड, संपूर्ण पेन्शन, फॅमिली पेन्शन या योजनांव्दारे कामगार व त्यांच्या कुटुंबियांना होणारे फायदे, याबाबत माहिती दिली. यावेळी एआयएफ इंजिनिअरिंग, नितीराज इंजिनिअरिंग प्रा. लि. धुळे, व्हिडिओकॉन एक्स्पोर्ट, ज्योती सिरॅमिक, द्वैता गारमेंटस्, अ‍ॅटलास कॉपको, रेनफो इंडिया, जेदाल एंटरप्राईजेस, योगी आयुर्वेदिक, स्पेसेज डिझाईन, आथरे पाटील शाळा, कडवा एस. एस. के. लि. लास्टर निरज, जळगाव जिल्हा दूध संघ, जळगाव जनता सहकारी बँक आदी संस्थांना वार्षिक पीएफ स्लीप देण्यात आल्या. चर्चासत्रात डॉ. उदय खरोटे, पोपटराव सावंत, आर. जी. माने, जे. के. शिंदे, माधव जाजू, अरविंद कुलकर्णी, किशोर पाटील व उद्योजक, निमा सदस्य व कामगार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.