Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

नाशिकमध्ये रिक्षाचालक व प्रवासी समन्वय समिती स्थापन
नाशिक / प्रतिनिधी

 

शहरातील वाहतूक समस्येवर उपाय शोधण्यासाठी रिक्षाचालक, प्रवासी, वाहतूक पोलीस व आरटीओ या सर्वाच्या प्रतिनिधींचा समावेश असणारी ‘रिक्षाचालक व प्रवासी समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली असून या समितीचे समन्वयक डॉ. गिरधर पाटील हे आहेत.
शहराच्या वाहतूक व्यवस्थेत रिक्षाचालक, प्रवासी, वाहतूक पोलीस व आरटीओ या प्रत्येकाची बाजू आपापल्या ठिकाणी रास्त आहे. या समस्येचा समाजशास्त्र व मानवी दृष्टीकोनातून अभ्यास न झाल्याने आज हे सर्व घटक एकमेकांच्या विरोधात ठाकलेले दिसतात. या साऱ्यांना एका समान व्यासपीठावर आणून नेमक्या गरजा व समस्या काय आहेत, एकमेकांना सोईच्या ठरतील अशा काय उपाययोजना असू शकतात, याचा अभ्यास ही समिती करणार आहे.
रविवारी हुतात्मा स्मारक येथे प्रवासी, रिक्षा चालक व समन्वयक यांची एक बैठक झाली. बैठकीला प्रवाशांच्या वतीने संक्रमण संस्थेच्या वसुधा फाळके, नाशिक राईट अ‍ॅक्शन फोर्सचे सी. एल. कुळकर्णी व जयप्रकाश जोशी यांनी बाजू मांडली. रिक्षाचालकांच्या वतीने पंडितराव कातड, सुभाष देवरे, वाल्मिक राजपूत, दीपक शेवाळे, अशोक उन्हवणे, विलास पाटील, प्रवीण रोजेकर हे उपस्थित होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने इम्तियाज खान यांनी प्रतिनिधीत्व केले.
रिक्षा चालक, रिक्षा संघटना, प्रवासी या सर्वाचे प्रतिनिधी तसेच वाहतुक पोलीस व आरटीओ अधिकारी यांच्या सूचना संकलित करून कृती कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. ताबडतोबीने काय योजना राबवता येतील, याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले मत व सूचना समितीच्या ‘ए ४, पूर्णिमा सेंटर पॉइंट, गायकवाड क्लाससमोर, कान्हेरेवाडी, नाशिक’ या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.