Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘सुरेश गोपाळे यांच्या आत्मचरित्रात संवेदनशील मनाचे प्रतिबिंब’
प्रतिनिधी

 

महापालिकेत मंडई निरीक्षक म्हणून काम करतानाही लिखाणाची आवड जपताना सुरेश गोपाळे यांच्या ‘एक पाखरू वेल्हाळ’ या आत्मचरित्र पुस्तकात त्यांच्यातील संवेदनशील माणसाचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन पालिका उफायुक्त भारत मराठे यांनी केले.
सुरेश गोपाळे यांच्या ‘एक पाखरू वेल्हाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच खार येथील गोविंदधाम हॉलमध्ये झाले. त्यावेळी मराठे बोलत होते. याप्रसंगी पालिका उपायुक्त राजेंद्र वळे, सहाय्यक पालिका आयुक्त दीपक कामत आणि रवींद्र मालुसरे उपस्थित होते. गोपाळे यांचा खडतर जीवनप्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. लहानपणी घरात कमालीचे दारिद्रय़ असतानाही शिक्षण आणि त्याबरोबर नोकरीही केली. बालपणीचा काळ हा आनंदाचा आणि बागडायचा असतानाही दोन वेळचे जेवण मिळत नसल्याने माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या अनुभवातून इतरांनी बोध घ्यायला हवा, असेही मराठे यांनी सांगितले.
महापालिकेत मंडई निरीक्षक म्हणून काम करताना गोपाळे यांच्या लोकसंग्रहाचा फायदा मुंबई महापालिकेच्या कामासाठी होत असल्याचे प्रशस्तीपत्रक पालिका उपायुक्त राजेंद्र वळे यांनी दिले. दैनंदिन जीवनात डोळे उघडे ठेवून वावरताना आजूबाजूला दिसणाऱ्या घटना आणि विसंगती गोपाळे वृत्तपत्र लेखक म्हणून मांडतात आणि त्याचा समाजाला फायदा होतो, असे मुंबई मराठी लेखक संघाचे वरींद्र मालुसरे म्हणाले. याप्रसंगी चारुल अग्नी, प्रा. विजय जामसंडेकर, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर यांनी केले.