Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९


कधी भराव टाकून, कधी सुशोभीकरण करून तर कधी अन्य काही कारणांमुळे नाशिक शहरात गोदावरीच्या मूळ पात्राचे ठिकठिकाणी असे आकुंचन करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या भागात पुराची तीव्रता वाढत असून या समस्येचे निराकरण करण्याचा पहिला टप्पा म्हणून पूर रेषा आखणीच्या कामाकडे पाहिले जाते. पण, संबंधित प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने हे काम अजूनही अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आहे.

पाऊस आला तरी पूररेषा आखणीबाबत प्रशासकीय यंत्रणांची टोलवाटोलवीच!
अनिकेत साठे / नाशिक

शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषा आखणीचे अंतिम टप्प्यात आलेले काम यंदाच्या पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेण्याची ग्वाही देणाऱ्या पाटबंधारे विभागाने आता पावसाळा जसा पुढे सरकत आहे, तसा सोयीस्कररीत्या ‘बॅकफूट’ जाण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून येते. या प्रक्रियेतील विविध टप्पे पार पडल्यानंतर मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना अर्थात सीडीओने पूर पातळीच्या अभ्यासाची माहिती सादर न केल्यामुळे हे काम रखडले असल्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

विविध कार्यक्रमांमधून गुरूप्रती ऋण व्यक्त
प्रतिनिधी / नाशिक

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूसारखा वाटाडय़ा नसेल तर मार्ग चुकण्याची शक्यता असते. त्यामुळेच हा मार्ग निर्धोकपणे पार पाडण्यासाठी मदत करणाऱ्या गुरूचे ऋण व्यक्त करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीने जपली आहे. आधुनिक काळातही ही परंपरा अखंडित राहण्यामागे गुरू-शिष्य यांच्यातील असामान्य नातेच कारणीभूत असावे. त्याचाच प्रत्यय मंगळवारी गुरूपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांमधून आला.

बडय़ा थकबाकीदारांच्या वसुलीत अपयशी संस्था अवसायनात काढणार
प्रतिनिधी / नाशिक

असुरक्षित आणि बडय़ा कर्जदारांचे कर्ज वसूल होत नसेल तर अशा संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय जिल्हा कृती समितीने घेतला आहे. अशा संस्थांमध्ये अग्रसेन, झुलेलाल व क्रेडिट कॅपिटल या तीन पतसंस्थांचा समावेश असल्याचे समिती सदस्य व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी कळवले आहे.

महापौरांचे बे दुणे पाच अन् पाणीकपातीचा जैसे थे जाच!
प्रतिनिधी / नाशिक

अभ्यास न करता कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होणे खचितच अवघड बाब. त्यातही जर तो विषय आकडेमोडीशी संबंधित अर्थात गणिती असेल तर भल्याभल्यांची भंबेरी उडते. तथापि, शहराचे प्रथम नागरिक मात्र त्याला बहुदा अपवाद असावेत.

सचिन आणि विष्णुदेव मिश्रा
क्रिकेट विश्वातील सार्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि नाशिकचे तडफदार पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्यामध्ये कोणतेही साम्यस्थळ वा विरोधाभास असण्याची सुतराम शक्यता नाही, हे माहीत असूनही शीर्षकात दोघांना एकत्र गुंफण्याचा प्रकार करण्यामागे नाशिकचे शरद साठे यांचा विशिष्ट हेतू आहे. तो कोणता, या प्रश्नाचे उत्तर देणारा हा लेख.


वरातीमध्ये घोडं सर्वात मागे असलं तरी त्याच्याविना विवाहसोहळ्याचा थाटमाट पूर्ण होत नाही. त्यामुळे वरातीत नवरदेवापाठोपाठ लक्ष वेधून घेतो तो हा अश्वच. एरवी, अशा उमद्या अश्वांचा खरा दिमाख दिसतो, तो ते टापा टाकत दौडत निघाल्यावर. पण, या अश्वांवरही चक्क चारचाकीमध्ये कोंबून घेत अशाप्रकारे प्रवास करण्याची वेळ ओढवल्यास काय म्हणणार? ओबीसी विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कमोद यांनी खास ‘वृत्तान्त’साठी टिपलेले हे छायाचित्र काळाचा महिमा अगाध असल्याची प्रचीती देणारेच.


नाशिक महापालिका सेवक सहकारी संस्थेतर्फे कुस्तीगीर तथा कवी वाळू नवले यांचा सत्कार करताना स्थायी समिती सभापती संजय बागूल. समवेत माजी सभापती संजय चव्हाण, प्रकाश साळवे, पिंटू तांबोळी आदी.

वाळू नवले यांचा गौरव
नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील कुस्तीगीर तसेच महापालिका तरणतलावाचे प्रशिक्षक वाळू नवले यांचा नुकताच महापालिका सेवक सहकारी संस्थेतर्फे क्रीडा तसेच काव्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल स्थायी समिती सभापती संजय बागूल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर अजय बोरस्ते, संजय चव्हाण, प्रकाश साळवे, शंकर बर्वे, संजय खैरे, पिंटू तांबोळी आदी उपस्थित होते. नवले यांचा ‘झालं उन्हाचं चांदणं’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून ‘कुस्तीपुराण’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या या कामगिरीचा उपस्थितांनी गौरव केला.
प्रतिनिधी, नाशिक

अपंगांना आवाहन
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथील दि नॅशनल असोसिएशन फॉर दी हॅन्डिकॅप्ड आणि राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स यांच्या सहकार्याने राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त अपंग व्यक्तींसाठी शुक्रवार २४ जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अपंगांसाठी १० शिलाई मशीन, अपंग महिलांसाठी वापरलेले कॉम्प्युटर देण्यात येणार आहे. गरजुंनी विहीत अर्ज छायाचित्रासहित अपंगाचा दाखल्यासह राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलजवळ, नाशिक येथे जमा करावे. अधिक माहितीसाठी ९८२२०५६९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जयप्रकाश जातेगांवकर, कीर्ती बाफणा, राजेंद्र पारख यांनी केले आहे.

कृषक समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
नाशिक / प्रतिनिधी

भारतीय कृषक समाजातर्फे करण्यात आलेल्या सर्व मागण्या योग्य असल्याने तत्काळ पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्याची माहिती कृषक समाजाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. संजय जाधव यांनी पत्रकाव्दारे दिली. डॉ. पंजाबराव देशमुखांची प्रतिमा सर्व कृषी कार्यालयांमध्ये लावावी, त्यांची जयंती व पुण्यतिथी शासनस्तरावर साजरी करणे, शेतकऱ्यांना पद्मश्री, पद्मभूषण यासारखे पुरस्कार देणे, पंजाबराव देशमुखांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी शासनाने शिफारस करणे तसेच डॉ. स्वामिनाथन समितीने शिफारस केलेला २५ वर्षांचा आराखडा व शिफारसींची अमलबजावणी करावी, या मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत. प्रा. जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपर्कप्रमुख तानाजी नामाडे, बाळासाहेब धुमाळ, बबन आवारे, सागर रहाणे यांनी थोरात यांना निवेदन दिले.