Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

जिल्हाध्यक्षांच्या मेळाव्यासही ठाकरे यांची उपस्थिती
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेने कार्यकर्ते संभ्रमित

धुळे / वार्ताहर

जिल्ह्य़ात आधीच गटबाजीने पिचलेल्या काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजीलाच उधाण येत असल्याने सामान्य कार्यकर्ते बेचैन झाले असून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या उपस्थितीत अधिकृत मेळावा ठरलेला असताना जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी धुळ्यातच स्वतंत्र मेळावा घेतल्याने सनेर यांनी उचललेले पाऊल कितपत योग्य आहे, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

पोलीस अधिकारी खंडणी प्रकरणाचा सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा
वार्ताहर / जळगाव

चाळीसगाव येथे अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या तक्रारी बद्दल अधीक्षकांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठविला असला तरी या प्रकरणाचा खरा सूत्रधार वेगळाच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चाळीसगाव विभागासाठी नुकतेच रुजू झालेल्या लोहार यांच्याविरुद्ध काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांनी २१

तळोदा तालुक्यात अतिक्रमणधारकांची स्थिती ‘जैसे थे’
शहादा / वार्ताहर

तळोदा तालुक्यातील अतिक्रमणधारकांची स्थिती विनाचौकशी ‘जैसे थे’ आहे. वनाधिकार समित्या स्थापून बराच कालावधी झाला तरी केवळ चौकशीचे नाटक सुरू असून वनाधिकार कायदा २००६ ची अमलबजावणी योग्य पध्दतीने होणार नसेल तर आंदोलन करण्याचा निर्णय अतिक्रमणधारकांच्या बैठकीत घेण्यात आला.


तापी पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये मंगळवारी पहाटे झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी धुळे महापालिकेतर्फे मुंबई-आग्रा महामार्गाजवळ असलेल्या वरखेडी शिवारातील बिलाडीजवळ या पाइपलाइनचा व्हॉल्व काढण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी पाणी भरण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. छाया : मनेश मासोळे


धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून जी. बी. मवारे यांनी मंगळवारी सूत्रे हाती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक सुनील कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

चाळीसगावमध्ये ‘चित्रपट, मालिका निर्मिती’ कार्यशाळा
चाळीसगांव / वार्ताहर

येथील रंगगंध कलासक्त न्यासतर्फे चित्रपट तसेच टीव्हीच्या कार्यक्रमासंदर्भात या क्षेत्राची तोंडओळख व्हावी म्हणून १८ व १९ जुलै रोजी ब्राम्हण सभेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाप्रेमींना चित्रपट, जाहीरातपट किंवा दूरदर्शन मालिका निर्मिती या चंदेरी दुनियेचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. रंगगंधतर्फे ही आवड लक्षात घेऊन निवासी कार्यशाळा होणार आहे. चित्रपट, कॅमेरा वगैरे तांत्रिक अंगाची सुरूवात कशी झाली, व्यवसायात वापरले जाणारे शब्द, माहितीपट, वृत्तपट, जाहीरातपट, मालिका यांचे प्रकार कोणते, चित्रपटाकरीता पटकथा लेखन, संवादलेखन कसे असावे, अभिनेता बनण्यासाठी काय करावे लागेल, कॅमेराचे प्रकार व तंत्र, चित्रपटाचे संकलन कशा प्रकारे असावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे माध्यम प्रशिक्षक सागर अध्यापक, रोहित जगदाळे हे मार्गदर्शनाव्दारे देणार आहेत. १२ जुलैपर्यंत नावनोंदणी करण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी डॉ. मुकूंद करंबेळकर (९८२२२६३२७९), जितेश पोतदार (९७६४४६२२६६) यांच्याकडे संपर्क साधावा.

भाजपतर्फे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध
शहादा / वार्ताहर

तालुका व शहर भाजपच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतांवर डोळा ठेऊन काँग्रेसने डिझेल-पेट्रोलचे दर कमी केले होते. परंतु, पुन्हा केंद्रात सत्तेवर आल्यानंतर दरवाढ करण्यात आली. दुसरीकडे स्वयंपाकासाठी लागणारे सिलींडर सुद्धा काळ्या बाजारातून विकत घ्यावे लागत आहे, अशी बिकट अवस्था या सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. पावसाअभावी बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला असून केंद्र व राज्य सरकारने नंदुरबार जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा व शेतकरी बांधवांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. किशोर पाटील, शहराध्यक्ष विजय कदम, युवा मोर्चा शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल आदी उपस्थित होते.

तोतया न्यायदंडाधिकाऱ्यास अटक
मनमाड / वार्ताहर

मनमाड ते येवला रस्त्यावर मोटारीस पिवळा दिवा लावून न्यायदंडाधिकारी असल्याची बतावणी करीत वाहन चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या मध्य प्रदेशातील गुलाब गणपतलाल मुखाती (४८) यास शहर पोलिसांनी अटक केली. मोहन रामलाल रघुवंशी (रा. माचलगाव, जि. इंदूर) याने या घटनेची फिर्याद दिली. मोहन हा मालट्रकने पुण्याहून मनमाडकडे येत होता. मनमाड-येवला रोडवर अनकवाडे शिवाराजवळ एमपी ०९ बीए ७६३५ ही पिवळा दिवा लावलेली गाडी मागून येऊन ट्रकला आडवी झाली. गाडीतील व्यक्ती मुखातीने ट्रक चालकास आपण मॅजिस्ट्रेट आहोत असे सांगून ट्रकच्या कागदपत्रांची मागणी केली. ट्रक चालकास संशय आल्याने त्याने तेथून मनमाड शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी करून तोतयेगिरी करताना या मॅजिस्ट्रेटविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यास मनमाड न्यायालयापुढे हजर केले असता न्ययाालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.