Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

एका लोकविलक्षण साहसाची शताब्दी..

 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली, त्या घटनेस ८ जुलै रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. जागतिक राजकारणातही या घटनेचे पडसाद उमटले. समस्त भारतीयांना अभियान वाटावा असे इतिहासातील ते सोनेरी पान ठरले..
वांद्रे ते वरळी समुद्रसेतूच्या नामकरणाच्या वादाचे वादळ सध्या चालू आहे. सागराबरोबर सावरकरांचे नाव पक्के जोडले गेले आहे. ‘सागरास’ हे काव्य आणि मार्सेल्सची समुद्रउडी या गोष्टी सावरकरांचे नाव घेताच आठवतात. त्यांच्या सागरातील उडीचे शताब्दीवर्ष आजपासून चालू होते आहे. हा दिवस निवडून सेतूचे उद्घाटन करून सावरकरांचे नाव दिले गेले असते तर योग्य ठरले असते, पण राजकारणी मंडळींना त्याचे काय?
ब्रिक्स्टनच्या कारागृहातून भारतात पाठवणी होण्यापूर्वीच सावरकरांनी मार्सेल्स सुटकेचा विचार केला होता. तसा निरोपही व्ही. व्ही. एस. अय्यरांना दिला होता. त्यांनी तो मॅडम कामांपर्यंत पोचवला होता. योजना यशस्वी झाली असती तर सुटका झाली असतीच, पण भारतातील परकीय सत्तेची दडपशाही व अत्याचार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता आले असते!
त्या कारागृहातूनच सावरकरांनी ‘माझे मृत्युपत्र’ हे काव्यरूप पत्र येसू वहिनींना पाठवले. याच्या पहिल्या कडव्यातच त्यांचा जीवनोद्देश स्पष्ट होतो-
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले।
वक्तृत्व-वाग्विभवही तुज अर्पियेले।
तूतेचि अर्पिली नवी कविता रसाला।
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला।।

१ जुलै १९१० ला त्यांना ‘मोरिया’ बोटीवर चढविण्यात आले. ती ७ जुलैला मार्सेल्सला आली. शौचकुपातल्या पोर्टहोलचे माप त्यांनी जानव्याने घेतले. खिडकीचा व्यास १२ इंच होता. सावरकरांच्या छातीचा घेर ३२ इंच होता. सर्व पाहाणी करून झाल्यावर ८ जुलैच्या सकाळी त्यांनी शौचाला जाण्याचा बहाणा केला. आत जाताच अंगातला गाऊन काढून काचेच्या दारावर पसरून अडकवला. एका झेपेत कमोडवरील पोर्टहोल गाठले. कसेबसे शरीर त्यातून बाहेर काढले. त्याचवेळी संडासाचे दार फोडून शिपाई आत घुसले. सोलवटल्या शरीराने सागरात उडी घेतली. गँगवेवर उभ्या असलेल्या क्वार्टर मास्टरने हे दृष्य पाहून आरडाओरडा केला. अटकेतून सुटका करून घेण्यासाठी अपरिचित समुद्रात उडी घेणे हे लोकविलक्षण साहस होते. सूर मारताना खडकावर डोके आपटले असते तर..? त्यामुळे या उडीत अद्भुत पराक्रम, साहस, अतुलनीय धैर्य होते.
समोरचा धक्का हा नऊ फूट उंच होता. त्यावरील शेवाळामुळे ते एक दोनदा पाण्यात पडले. तरीही नेटाने तो धक्का चढून गेले. तेथे कोणी सहकारी दिसत नाहीत हे पाहून ते धावू लागले. काही अंतरावर एक फ्रेंच पोलीस त्यांना दिसला. त्याला ते म्हणाले, Take me into your Custody. Assist me. Take me before a magistrate! त्याला इंग्रजी येत नव्हते नि त्यांना फ्रेंच येत नव्हते. तोवर तेथे येऊन पोचलेल्या शिपायांनी त्या पोलिसाची मूठ गरम केली आणि सावरकरांना ताब्यात घेतले.
बोटीवर होणारी मारहाण, ‘एखाद्याचा तरी मुडदा पाडेन’, असा त्यांनी दम देताच थांबली. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न इंग्रजांनी केला, पण कामाबाईंमुळे ‘ल ताँ’ या फ्रेंच वृत्तपत्रात ९ जुलै आणि डेली मेलच्या ११ जुलैच्या अंकात हे वृत्त प्रसिद्ध झाले. आता सावरकरांसाठी ‘इनर केबिन’ निवडण्यात आली. चोवीस तास लक्ष ठेवण्यात येऊ लागले. डेकवर हिंडताना दोन रक्षक त्यांचे हात पकडून फिरत असत. केबिनमधील दिवे चालू असत. त्यांच्या तोंडावर प्रकाश पडेल अशी योजना करण्यात आली. त्यामुळे स्वस्थ झोप घेणे दुरापास्त झाले. या स्थितीतही त्यांना काव्य सुचले..
अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला।
जिंकिल रिपु कवण असा जगति जन्मला।।

यानंतर मोरिया बोट एडनला आली. तिथे सशस्त्र शिपायांच्या गराडय़ात सावरकरांना उतरविण्यात आले व सालसेट नामक बाष्पनौकेवर चढविण्यात आले. २२ जुलैला ही नौका कडेकोट बंदोबस्तात मुंबईला पोचली. आचार्य अत्रे त्यावेळचे वर्णन करताना म्हणतात, ‘ज्यावेळी आमचा हा पुरुषसिंह इंग्रज सरकारने तुरुंगात नेऊन कोंबला, तेव्हा त्याचा आवेश आणि डरकाळ्या ऐकून मी मी म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या छातीत धडकी भरत असे.’
वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे फ्रान्स सरकारवर दडपण आले. सरकारने आंतरराष्ट्रीय निर्बंधांनुसार हक्काचा प्रश्न काढला. यावर उत्तर देण्यासाठी इंग्रज राजधुरिणांची तारांबळ उडाली. डेली मेलसारख्या ब्रिटिश वृत्तपत्रांनी देखील सरकारला धारेवर धरले. बॅ. बॅप्टिस्टा हे सावरकरांचे वकील होते. त्यांनी सावरकरांबरोबर चर्चा करून मार्सेल्सचा वृत्तान्त नीट लिहून काढला व पॅरिसमधील मित्रांकडे धाडला. ल ह्यूमनाईट व ल ताँ या वृत्तपत्रांनी या आधारे लेख लिहिले. डेली न्यूजने लंडनमधे तेच केले. या सर्वांना उत्तर देणे इंग्रज सरकारला कठीण झाले.
अखेर हेग येथील आंतरराष्ट्रीय निवाडा न्यायमंडळापुढे हे प्रकरण जावे, असे फ्रेंच सरकारने सुचवले. ब्रिटनने ते मान्य केले, पण त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत अभियोग स्थगित ठेवण्याची मागणी मात्र फेटाळली. सावरकरांना फ्रेंच सरकारच्या स्वाधीन करायला हवे की नको, एवढय़ासाठीच हा सर्व घोळ घालण्यात आला. हा निवाडा होण्यापूर्वी ३० जानेवारी १९११ ला सावरकरांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली.
हेग येथील सुनावणी in camera झाली व त्यांनी इंग्लंडची बाजू योग्य ठरवली. यामुळे टीकेचे मोहोळ उठले व फ्रेंच पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. एकूण या एका कृतीमुळे सावरकरांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले एवढे खरे!
डॉ. सच्चिदानन्द शेवडे