Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अवकाशवेध
राजेंद्र येवलेकर
अंतराळातील ‘शीतयुद्ध’

 

गेली काही वर्षे अंतराळात वास्तव्याची एक जागा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थानकाचा वापर जगातील अनेक देशांचे अंतराळवीर करीत आहेत. तेथे सर्व काही व्यवस्था आहेत. मार्च महिन्यांत या स्थानकात रशिया व अमेरिकेच्या अंतराळवीरांची चांगलीच जुंपली होती. दोघे भाऊ किरकोळ कारणावरून भांडतात तसा हा प्रकार होता, पण जेव्हा हे भांडण शीतयुद्धातील दोन देशांमध्ये जुंपले तेव्हा त्याला महत्व आले. हे भांडण होते ते या अंतराळस्थानकातील प्रसाधनगृहाच्या वापरावरून. थोडक्यात आंतरराष्ट्रीय सुसंवादाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या अंतराळस्थानकातील गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अंतराळवीरांच्या या वागण्याने पुन्हा एकदा माणूस किती छोटा असतो हे त्या अथांग अंतराळात दाखवून दिले.
माणसाने अथांग अंतराळात लीलया प्रवेश केला असला तरी त्याची संकुचित वृत्ती तिथेही कमी झालेली नाही. तिथेही दोन देशांमध्ये अजूनही भांडणे होतात हे ऐकून कदाचित सर्वाना आश्चर्य वाटेल पण तसे घडले हे खरे आहे. गेली काही वर्षे अंतराळात वास्तव्याची एक जागा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थानकाचा वापर जगातील अनेक देशांचे अंतराळवीर करीत आहेत. तेथे सर्व काही व्यवस्था आहेत. मार्च महिन्यांत या स्थानकात रशिया व अमेरिकेच्या अंतराळवीरांची चांगलीच जुंपली होती. दोघे भाऊ किरकोळ कारणावरून भांडतात तसा हा प्रकार होता, पण जेव्हा हे भांडण शीतयुद्धातील दोन देशांमध्ये जुंपले तेव्हा त्याला महत्व आले. हे भांडण होते ते या अंतराळस्थानकातील प्रसाधनगृहाच्या वापरावरून. थोडक्यात आंतरराष्ट्रीय सुसंवादाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या अंतराळस्थानकातील गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अंतराळवीरांच्या या वागण्याने पुन्हा एकदा माणूस किती छोटा असतो हे त्या अथांग अंतराळात दाखवून दिले. एकेकाळी या अंतराळस्थानकातील अंतराळवीर अन्न, इतर साधनसामग्री व सुविधा समजुतीने आपसात वाटून घ्यायचे. आपण लहान मुलांना नेहमीच वाटून घ्यायला शिकवतो ते यासाठीच. तर आतापर्यंत सगळे काही गुण्यागोविंदाने राहात होते पण अलीकडेच रशियन अंतराळवीर गेनाडी पडालका यांनी अशी तक्रार केली की, अमेरिकी अंतराळवीर आम्हाला त्यांची व्यायामाची सायकल व प्रसाधनगृह म्हणजे टॉयलेट वापरू देत नाहीत. पडालका यांनी पहिल्यांदा १९९८ मध्ये अंतराळस्थानकाची सफर केली पण गेल्या सात-आठ वर्षांत असे कधी घडले नव्हते. २००५ पासून अंतराळस्थानकातील वातावरण बदलत गेले, अंतराळ मोहिमांमध्ये व्यावसायिकीकरण घुसले. रशियाने अमेरिकेच्या अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्याच्या कामासाठी पैसे आकारायला सुरुवात केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्वतयारीच्या वेळी व नंतरही व्यायामासाठी असलेली अमेरिकी सायकल वापरू दिली नाही. अमेरिकी व रशियन लोकांनी त्यांची वेगळी प्रसाधनगृहे वापरावीत असाही फतवा निघाला. अमेरिकेचे प्रसाधनगृह तांत्रिकदृष्टय़ा अतिशय सुसज्ज आहे. पडालका हे पन्नास वर्षांचे असून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात त्यांची नेहमी ये-जा असते. आता तर ते कमांडर आहेत. रशियाने २००३ पासूनच इतर अंतराळ संस्थांना त्यांच्या अंतराळवीरांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी पैसे आकारायला सुरुवात केली तेव्हापासून हा सुसंवाद बिघडला हे ते मान्य करतात. पैसा आला की, मैत्री संपते आणि व्यवहार सुरू होतो मग सुसंवाद टिकत नाही. असे असले तरी प्रसाधनगृहासारख्या किंवा व्यायाम यंत्रासारख्या किरकोळ गोष्टींवरून भांडणे सुसंस्कारित मानव जातीला शोभणारे नाही असे पडालका यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश व रशियाचे माजी अध्यक्ष व व्लादिमीर पुतिन यांच्यातील ताणलेल्या संबंधांचेही प्रतिबिंब या वादात दिसत होते. या अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळप्रवाशांनी त्यांचे स्वत: आणलेले अन्नच खावे. दुसऱ्यांचे घेऊन खाऊ नये असा नवा नियमही करण्यात आला आहे, पण पडालका म्हणतात की, अमेरिकी अंतराळवीर आणतात ते अन्न जास्त चटपटीत व चवदार असते मग हे सगळे जमायचे कसे. या अंतराळ स्थानकातील रशियन व अमेरिकी अंतराळवीर एकमेकांची प्रसाधनगृहे वापरीत होते मग एकदम असे काय झाले की, अमेरिकी अंतराळवीरांनी त्यांचे प्रसाधनगृह रशियनांनी वापरू नये असा आदेश काढला, तर त्यांचे म्हणणे असे की, रशियन लोक अधिक पौष्टिक व कॅलरीयुक्त अन्न घेत असल्याने त्याचा त्यांच्या मूत्रातील घटकांवर परिणाम होऊन प्रसाधनगृह खराब झाले. त्यामुळे अमेरिकी अंतराळवीर आजारी पडू लागले, त्यासाठी रशियन अंतराळवीरांवर हे बंधन घालावे लागले. शेवटी नासाने त्यांच्या अंतराळवीरांसाठी दोन कोटी डॉलरचे नवीन प्रसाधनगृह रशियाकडूनच मागवले, याचे कारण काय असेल अंतराळात वापरावयाचे प्रसाधनगृह तयार करण्यात रशियाची कुणीही बरोबरी करू शकणार नाही असे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. हे प्रसाधनगृह पुरुष व महिला दोघेही वापरू शकतात त्यात मानवी मूत्र एका भांडय़ात साठवून त्यात एक द्रावण मिसळले जाते व नंतर त्याचे रूपांतर पाण्यात केले जाते व त्या पाण्याचा फेरवापर केला जातो. असाच एक वाद चीन आणि युरोप यांच्यात गाजतो आहे. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नावाची जी यंत्रणा चालवली जाते ती काही उपग्रहांच्या मदतीने चालवली जाते हे सर्व उपग्रह अमेरिकेचे आहेत. त्याला पर्याय म्हणून आता युरोपही एक पर्यायी यंत्रणा उभारत आहे. तिचे नाव आहे गॅलिलिओ नॅव्हीगेशन प्रोजेक्ट. या प्रकल्पासाठी लागणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरण्यावर चीनने दावा सांगितला. अमेरिकेची ग्लोबल पोझिशनिंगमधील मक्तेदारी संपवण्यासाठी चीन व रशिया सतत प्रयत्नशील आहे. खरेतर चीनने युरोपच्या गॅलिलिओ नॅव्हिगेशन प्रकल्पात ३ कोटी डॉलर गुंतवण्याचा प्रस्ताव २००३ मध्ये मान्य केला होता पण मधूनच त्यांनी सुरक्षेच्या भीतीस्तव त्यातून माघार घेतली. रेडिओ फ्रिक्वेन्सी वाटण्याचे काम संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन या संस्थेकडे आहे. त्यांच्याकडे चीनने तक्रार करून आपल्या उपग्रहांची फ्रिक्वेन्सी (कंप्रता), युरोपीय समुदायाच्या गॅलिलिओ नॅव्हिगेशन प्रकल्पातील उपग्रहांना देऊ नये असे म्हटले आहे. या प्रकल्पात आतापर्यंत केवळ दोन गॅलिलिओ उपग्रह सोडण्यात आले आहेत म्हणजे अजून २८ उपग्रह सोडायचे बाकी आहेत. हे काम २०१० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आता चीनने आणलेल्या अडचणींमुळे अंतराळातील आणखी एक शीतयुद्ध सुरू आहे. गॅलिलिओ प्रकल्प असा रेंगाळत असताना चीनचा कंपास (बिडाऊ) हा ग्लोबल पोझिशनिंग प्रकल्प मात्र वेगात सुरू आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रंगलेले हे वाद नंतर मानवी प्रगतीस अडचणीचे ठरू शकतात.
rajendra.yeolekar@gmail.com