Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

व्हयं महाराजा!

 

‘काय बाबल्या, वांद्रे-वरळी सी-लिंक पूलावरून पिकनिक केलंय काय नाय?’
‘तात्यानू, पुलाचा पूर्ण नाव घ्या.’
‘म्हणजे राजीव गांधी सी-लिंक पूल, असाच तुका म्हणाचा आसा ना!’
‘नाय, नाय. त्या पुलाचा नाव स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असा आसा.’
‘हा नाव मीया घेवचय नाय. कारण मी अनधिकृत काय करणय नाय. या नाव अधिकृत नाय आसा.’
‘तात्यानू, तुमका मराठी बाणोच नाय.’
‘अरे मेल्या मराठी बाण्याचो इचार केलो असतो तर ह्यो पूल झालोच नसतो. कारण या पुलाचो मुख्य आर्किटेक्ट दक्षिणेतलो आसा. तेनी जर आपलो दक्षिणी बाणो दाखवल्यानी आणि मी महाराष्ट्रात पूल बांधूचय नाय असा म्हटला असता तर चलला असता काय?’
‘तुमच्याशी वाद न घातलेलोच बरो. तो वाद मरांदेत, तुमी फुलावरून फिराक येतात तर चला माझ्या वांगडा.’
‘चल बाबा, काढ तुझी नॅनो आणि माका घेवन चल पुलावरसून.’
‘तात्यानू, बघा आता दोन मिनिटांत पूल सुरू जायत.. आता मात्र उजव्या हाताकडे बघा नाकात हां.’
‘कित्याक रे?’
‘अहो तरुण जोडपी हवा खायत बसलेली असतत. या वयात तुम्ही या बघणा बरोबर नाय. त्या तरुणांक करांदेत काय करायाच आसा ता..’
‘तू माका काय बघूचा ता शिकव नको..’
‘तात्यानू. बघा दोन मिनिटांत आपण समुद्राच्या मध्यभागी पोचतलोव. आणि तात्यानू ह्या बघा लता दिदीपण पूल बघूक इलिसा.. चला भेटया आपण. एवढय़ा मोठय़ा गानसम्राज्ञीक आपण टीव्हीच्या पलिकडे कधी बघतलोव होतोव.’
‘लता दिदी नमस्कार. आमी तुमचे चाहते आसोव. तुमची भेट झाली आमका का धन्य वाटल्यानी.’
‘नमस्कार.’
‘पण दीदी, तुमी हो खास पूल बघूक आयल्यात, येचा मोठा आश्चर्यच वाटता.’
‘होय. हा भव्य-दिव्य पूल बघणे ही एक पर्वणीच आहे. माझे बाबा नेहमी बोलायचे संगीतातून मैत्रीचे पूल बांधा.’
‘पण पेडर रोडचा पूल बांधल्यावर पण ही मैत्री वृद्धिंगत जायत असा तुमचा वाटणा नाय काय?’
‘नाही. पेडर रोडच्या पुलाची स्थिती वेगळी आहे. हा पूल बांधल्याने प्रदूषणाचे पूल तुटणार आहेत. त्यामुळे या पुलाचा माझा विरोध अजूनही कायमच आहे आणि पुढेही विरोधच कायम राहील.’
‘या पुलाला विरोध कर, असे त्यावेळी बाबा म्हणाले होते काय?’
‘तुमचा मालवणी खोचकपणा मला समजतो.’
‘पण दीदी पुढील वर्षी या पुलाला एक वर्ष पूर्ण झाल्यार हयसर समुद्रातत तुमका गाण्याचो कार्यक्रम करुक आवडात काय?’
‘मला जरूर आवडेल.’
‘तुमच्या सोबत आशाताई पण गातील का?’
‘जरूर. तिची बिदागी माझ्यापेक्षा कमी आहे..’
प्रसाद केरकर
prasadkerkar73@gmail.com