Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

‘वाडिया’ तील पाऊस यापुढे वाया जाणार नाही!
पुणे, ७ जुलै/प्रतिनिधी

वाडिया महाविद्यालयात पडणारे पावसाचे पाणी आतापर्यंत दरवर्षी वाहून वाया जात होते. या वर्षीपासून मात्र महाविद्यालयातील सर्व इमारतींच्या छतावर आणि मैदानावर पडणाराही पाऊस गोळा करण्याचा प्रकल्प महाविद्यालयाने सुरू केला असून पहिल्या टप्प्यातील ‘पर्जन्यजलभरण प्रकल्प’ महाविद्यालयात यशस्वी झाला आहे.

आकुर्डी रेल्वे अपघातात तीन ठार
पिंपरी, ७ जुलै/प्रतिनिधी

आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ सोमवारी रात्री उशिरा एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने एका दाम्पत्यासह तिघांचा अत्यंत शोचनीय मृत्यू झाला.मृत्युमुखी पडलेले सर्वजण आकुर्डीच्या आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत.

प्रत्येकाने आपल्यामध्ये गुरू शोधावा-काकोडकर
पुणे, ७ जुलै/प्रतिनिधी

‘प्रत्येकाने आपल्यामध्ये गुरू शोधावा व त्याचा उपयोग समाजातील सर्वाना करून द्यावा, असा विचार अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी मांडला.विद्या सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विद्या व्यास पुरस्काराचे वितरण काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यात रिपरिप, धरणांच्या क्षेत्रातही पावसाची नोंद
पुणे, ७ जुलै / खास प्रतिनिधी

पुण्यात आज बऱ्याच दिवसांनी पावसाची रिपरिप अनुभवायला मिळाली आणि रात्री साडेआठ वाजेपर्यंत १०.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रातही पाऊस पडल्याने पुण्यातील टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांतही पाऊस कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

राजकीय वर्चस्वाच्या वादातून माजी नगरसेविकेच्या मुलाचा खून
पुणे, ७ जुलै/प्रतिनिधी

‘झोपडपट्टी पुनर्वसन’ (झोपु) योजनेतील सदनिका ताब्यात घेण्यावरून, तसेच राजकीय वर्चस्वाच्या वादातून पाच ते सहा संशयितांनी वार करून माजी नगरसेविकेच्या मुलाचा खून केला. पर्वती पायथा येथे एका सार्वजनिक शौचालयाजवळ सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

शिकाऊ डॉक्टरांना मिळणार ‘रुग्ण संवादा’चे धडे!
बीजेसह मुंबई, औरंगाबादमध्ये कार्यशाळा
पुणे, ७ जुलै/प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षणात रुग्णावर कोणते आणि कसे उपचार करावेत हे शिकविले जात असले तरी प्रत्यक्षात रुग्णांशी संवाद कसा साधायचा, त्यांच्याशी कसे वागावे याबाबतचे धडे आता देण्यात येणार आहेत. पुण्याच्या ‘बीजे’सह मुंबई आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयांत हा प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

‘लवासा’ साठी पुण्याचे पाणी पळविण्याचा कट - पाटकर
पुणे, ७ जुलै/प्रतिनिधी
वरसगाव धरणातील पाणी लवासा प्रकल्पाला वापरून पुण्याला मिळणारे पाणी पळविण्याचा कट खासगी कंपनीला हाताशी धरून जलसंपदामंत्री अजित पवार यांनी केला आहे, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पुण्याच्या नागरिकांचे पाण्याअभावी होणारे हाल व वाढती पाणीकपात याला अजित पवार हेच जबाबदार आहेत. शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा होत असलेल्या वरसगाव धरणामध्ये बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. त्याचा उपयोग खासगी कंपन्या करीत असून, धनवंतांना जलक्रीडा, तसेच त्यांच्या वापरासाठी केला जात आहे, असे पाटकर यांनी सांगितले. पुण्याला पानशेत, खडकवासला धरणांतून पाणीपुरवठा केला जातो; परंतु पुण्याची लोकसंख्या पाहाता अतिरिक्त पाणीपुरवठय़ाची वरसगाव धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. लवासा प्रकल्पामुळे धरण बांधण्याचा मूळ उद्देश मातीस मिळाला आहे. लवासा प्रकल्पाला शासनाने तडकाफडकी मंजुरी देऊन या धरणक्षेत्रात राहाणाऱ्या आदिवासी जमातींवर अन्याय केला आहे. या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत घेऊन कुटुंबातील सर्वाची संमती नसतानाही त्यांचा सातबारा कोरा करून त्यांना भूमिहीन केले आहे. सरकार खासगी कंपन्यांपुढे का झुकत आहे याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

‘जगभरातील भारतीय शास्त्रज्ञांना एकत्र आणण्याची गरज’
पुणे, ७ जुलै / खास प्रतिनिधी

देशाच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी जगभरातील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना तातडीने एकत्र आणण्याची आवश्यकता असल्याचे ठाम मत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष व अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. जगभरातील भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचा मेळावा येत्या १६ ते १८ डिसेंबर या काळात बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी क्राडी संकुलात भरविण्यात येणार आहे. त्याची माहिती देताना डॉ. काकोडकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाश माशेलकर, डॉ. विजय भटकर हेही उपस्थित होते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन शोध हे विकासाचे प्रमुख सूत्र असून, याबाबत जागतिक वैज्ञानिक समूदायाला भारतीयांकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. जगभरातील भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना एका व्यासपीठावर आणणे आणि देशाच्या र्सवकष विकासासाठी विविध कल्पनांची चर्चा करणे असा या मेळाव्याचा उद्देश आहे. आताच्या अंदाजानुसार, विविध देशांमध्ये भारतीय वंशाचे सुमारे दोन कोटी शास्त्रज्ञ आहेत. त्यापैकी एकटय़ा अमेरिकेत दीड लाख शास्त्रज्ञ आहेत. विशेष म्हणजे अनेक शास्त्रज्ञ आता भारतात परतण्याचा मार्ग पत्करत आहेत. केंद्र सरकारनेसुद्धा अनिवासी भारतीय शास्त्रज्ञांची बौद्धिक संपदा व त्यांच्या ज्ञानाच्या स्रोतांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही डॉ. काकोडकर म्हणाले.

विलासरावांचा हडपसरला सत्कार
हडपसर, ७ जुलै/वार्ताहर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड खात्याचे मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर येथे येत्या शुक्रवार, दि. १० जुलै रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देशमुख तसेच पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांचा सत्कार करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार जयवंत आवळे असणार आहेत. हा सत्कार सोहळा शुक्रवार दि. १० जुलै रोजी हडपसर येथील दिलीप सोपल यांच्या प्लॉट (वैभव टॉकीजसमोर) वर सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.

बौध्द धम्मचारी सुदर्शन यांचे पत्नीसह अपघाती निधन
आज दापोडी येथे अंत्यसंस्कार
पिंपरी,७ जुलै / प्रतिनिधी
त्रलोक्य बौध्द महासंघ सहायक गणाचे ज्येष्ठ धम्मचारी सुदर्शन (वय ६३) व त्यांच्या पत्नी धम्मचारिणी बोधीसखी (वय ५४)यांचे सोमवारी रात्री मुंबईहून पुण्याकडे येताना अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा विक्रांत व मुलगी नागेश्री तसेच सून, जावई असा परिवार आहे. दोघांचा अंत्यविधी उद्या (बुधवारी) दुपारी एक ते पाच या वेळेत दापोडी येथील महाविहारात होईल.
धम्मचारी सुदर्शन यांनी १९७९ मध्ये दीक्षा घेतली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) रसायन शास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नंतरच्या काळात त्यांनी स्वत:ला आंबेडकरी चळवळीत झोकून दिले. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता. ते देशातील पहिले जाहीर उपाध्याय होते. त्यांच्या पत्नी बोधीसखी या शिक्षिका होत्या. गतवर्षी त्यांनीही दीक्षा घेतली. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते एम. डी. पंचभाई यांच्या त्या कन्या होत्या.

लोकशाहीदिनी स्थापत्य विभागाच्याच सर्वाधिक तक्रारी
पिंपरी, ७ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित लोकशाहीदिनी विविध ५१ तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्या असून, त्यामध्ये सर्वाधिक १४ तक्रारी स्थापत्य विभागाच्या आहेत.पिंपरीतील कामगार भवनात झालेल्या या उपक्रमात अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन स्वीकारून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या वेळी अतिरिक्त शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, उपजिल्हाधिकारी आर. व्ही. आवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी, सहायक आयुक्त सुधाकर देशमुख, साहेबराव गायकवाड, बाळाजी कांबळे, मुस्तफा फडणीस, अशोक मुंडे, शहाजी पवार, पांडुरंग झुरे, रोहिदास गायकवाड, दिलीप गावडे, विश्वास भोसेकर, हरि भारती, डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

निळू फुले यांची प्रकृती स्थिर
पुणे, ७ जुलै / प्रतिनिधी

प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. परिमल लवाटे यांनी सांगितले. अन्ननलिकेच्या विकाराचा त्रास बळावल्याने काल त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. प्रकृती स्थिरावल्याने आज त्यांना तेथून खासगी कक्षात हलविण्यात आले आहे.