Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

राज्य

चिपळूण तालुक्यातील मलेरियास जंगलतोड कारणीभूत?
चिपळूण, ७ जुलै/वार्ताहर

जंगलतोडीमुळे तालुक्यातील दसपटी भागाला मलेरियाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. फेब्रुवारी ते जुलैदरम्यान तब्बल ६४ रुग्ण आढळले असल्याची माहिती दादर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती जाधव यांनी दिली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला निसर्गरम्य दसपटी विभाग सध्या बेसुमार जंगलतोडीमुळे भकास होऊ लागला आहे.

संगमेश्वरच्या औद्योगिक विकासाच्या स्वप्नाचा पुरता अपेक्षाभंग
देवरुख, ७ जुलै/वार्ताहर

नवेनवे उद्योगधंदे यावेत, स्थानिकांनी उद्योगशील बनावे, त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामुळे स्थानिकांना अर्थार्जनाच्या विविध संधी स्थानिक पातळीवरच निर्माण होतील. साहजिकच ग्रामीण कुटुंबांचा पर्यायाने तालुक्याचा आर्थिक विकास साधता येईल, या उदात्त हेतूने १२ वर्षांंपूर्वी देवरुखजवळील साठवली गावात स्थापन झालेल्या लघु औद्योगिक वसाहतीचे तालुक्याच्या आर्थिक विकासाचे स्वप्न अक्षरश: धुळीस मिळाले आहे.

जुन्या समस्यांचा चक्रव्यूह भेदण्याचे नव्या खासदारांपुढे आव्हान!
सोपान बोंगाणे

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण-आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे दोन नवे व तरुण खासदार प्रथमच लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे नव्या दमाच्या या खासदारद्वयांकडून ग्रामीण भागातील रहिवाशांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था, पाणी समस्या, वनजमिनींमुळे वर्षांनुवर्षे अडून पडलेले सुमारे दोन डझन धरणांचे प्रस्ताव, कुपोषण, विविध प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, रेल्वे व उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या समस्या अशा अनेक प्रश्नांनी आता उग्र स्वरूप धारण केले असून नवे खासदार या प्रश्नात गंभीरपणे लक्ष घालतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सचिवांच्या आश्वासनानंतर आदिवासींचे वऱ्हाड परतले
ठाणे, ७ जुलै /प्रतिनिधी

कन्यादान योजनेंतर्गत आदिवासी जोडप्याला मिळणारे अनुदान त्वरित द्यावे, या मागणीसाठी नवविवाहित आदिवासी जोडप्यांनी वऱ्हाडींसमवेत आज आदिवासी अप्पर आयुक्तांना घेराव घातला. अखेर कन्यादान योजनेच्या अध्यादेशात सुधारणा करण्याचे आश्वासन आदिवासी सचिवांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंबोली घाटात ‘ग्लायडिंग फ्रॉग’
अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी, ७ जुलै

पश्चिम घाटात आजही निसर्गाच्या विविध छटा व निसर्गसौंदर्यासोबत जीवसृष्टीचे दुर्मिळ दर्शन घडते. दुर्मिळ होत चाललेल्या ‘ग्लायडिंग फ्रॉग’ या विविधरंगी बेडकाच्या जाती आंबोली घाटात पर्यावरणप्रेमी अभ्यासकाचे लक्ष वेधून घेत आहेत. पश्चिम घाट म्हणजेच सिंधुदुर्गच्या सह्याद्री घाटात आजही दुर्मिळ वनौषधी प्राणी व सरपटणारे प्राणी प्रकर्षांने आढळतात.

शेतकरी व बचत गटांना रायगड जिल्हा बॅंकेतर्फे बिनव्याजी कर्ज - जयंत पाटील
अलिबाग, ७ जुलै / प्रतिनिधी

आजचा कार्यक्रम राजकीय स्वरुपाचा नाही तर निखळ स्नेह आणि मैत्री दाखवणारा आहे असे म्हणत सुचक कोपरखळया आणि तितकेच हळुवार चिमटे अशा वातावरणात पालकमंत्री सुनील तटकरे, अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे, खासदार अनंत गीते यांच्या उपस्थितीत, शेकाप आमदार जयंत पाटील यांचा ५४ वा वाढदिवस सोहळा रंगतदार झाला़ मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते पाटील गौरव करून सत्कार समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा त्यांना प्रदान करण्यात आली़

अग्निशमन दलातील जवानाचा लोकलमधील रेल्वे पोलिसावर हल्ला
शहापूर, ७ जुलै/वार्ताहर

बँका, पतपेढय़ा, सोसायटय़ांकडून घेतलेले लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याने चक्क रेल्वे पोलिसावर हल्ला करून त्याच्याजवळील रिव्हॉल्व्हर घेऊन पळ काढल्याची थरारक घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास वासिंद स्थानकात घडली. मुंबई ते आसनगाव या रेल्वेत हा प्रकार घडला.

मुंबईकरांना भविष्यात मिळणार मुबलक पाणी
अनिकेत साठे
नाशिक, ७ जुलै
सध्या पाणी कपातीच्या संकटाखाली सापडलेल्या मुंबईकरांसमोर भविष्यात याहूनही अधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने केंद्रीय जल आयोगाने या महानगराची पुढील चार दशकातील संभाव्य पाण्याची गरज भागविण्यासाठी दमणगंगा-पिंजाल नदी जोड प्रकल्पातून तब्बल ३१५ टी. एम. सी. (३१ हजार दशलक्ष घनफूट) पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या नदी जोडणी प्रकल्पांतर्गत गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर दोन धरणे बांधून बोगद्यांद्वारे पाणी वळविले जाणार आहे. दमणगंगा खोऱ्यात आणले जाणारे पाणी पुढे वैतरणा नदीतून मुंबईकडे नेण्याचे प्रयोजन आहे. परिणामी, मुंबईकरांसाठी सध्याच्या वातावरणात हे शुभ वर्तमानच म्हणावे लागेल.या प्रकल्पाचा अंतिम आराखडा नाशिकमध्ये अलिकडेच स्थापन झालेल्या राष्ट्रीय जल विकास अभिकरण संस्थेच्या कार्यालयामार्फत होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, या प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी नेमके कोणत्या ठिकाणी हवे याची स्पष्टता मुंबई महापालिकेने वारंवार मागणी करूनही अद्याप केली नसल्याची तक्रार संस्थेने केली आहे.

वसई-पालघर, वाडे तालुक्यात फिरती आरोग्य सेवा सुरू
नालासोपारा, ७ जुलै

विरार येथील श्री जिवदानी देवी मंदिर ट्रस्ट आणि श्री साईधाम मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वसई, पालघर आणि वाडे तालुक्यांच्या ग्रामीण भागांत चार फिरते दवाखाने आणि नेत्रोपचार पथक सुरू करण्यात आले आहे. एक अभिनव आरोग्य सेवेचे व्रत म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या सहकार्यातून ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तीन रुग्णवाहिकांमध्ये प्रत्येकी एक डॉक्टर, एक परिचारिका व एक सेवकासह सुसज्ज फिरता दवाखाना ग्रामीण भागात फिरून रुग्णांवर औषधोपचार करीत आहे. एका रुग्णवाहिकेत संगणकीय नेत्रतपासणी यंत्रणा असून, अंध, मोतिबिंदू असलेल्या रुग्णांची तपासणी करून नेत्रोपचार आणि नेत्रचिकित्सेसाठी विरार येथे रुग्णांना आणून मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे, तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आपापल्या घरी पोहोचविले जात आहे. १४ वर्षांपूर्वी विरार येथे ‘दिन दलित सेवाभावी धर्मदाय ट्रस्ट’ स्थापन करून आरोग्य सेवेचे व्रत घेतलेल्या या ट्रस्टच्या वतीने दर महिन्याला ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिर व मोफत वैद्यकीय उपचार केले जात आहेत.