Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

क्रीडा

पाकिस्तानचे होत्याचे नव्हते
श्रीलंकेविरुद्ध कसोटी गमाविली
गॉल, ७ जुलै / एपी
क्रिकेट हा खेळ मोठा मजेदार आहे. एखादा संघ आरामात जिंकणार असे छातीठोकपणे सांगावे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पराभूत झालेले पाहावे, असे धक्कादायक निकाल क्रिकेटच्या इतिहासात अनेकवेळा लागलेले आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीचा निकालही असाच धक्कादायक होता. विजयासाठी १६८ धावांचा पाठलाग करताना २ बाद ७१ अशा सुस्थितीत असलेल्या पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी केवळ ९७ धावांची गरज होती आणि त्यांच्यापाशी दोन दिवसही शिल्लक होते. त्यामुळे पाकिस्तान विजयाला गवसणी घालणार यात शंका नव्हती. पण सामन्याच्या चौथ्या दिवशी अवघ्या ५६ धावांत पाकिस्तानचा संघ गारद झाला आणि यजमान श्रीलंकेने अनपेक्षित अशा विजयाची नोंद केली.

आयपीएलला आयसीसीच्या वेळापत्रकात नियमित स्थान नाही!
नवी दिल्ली, ७ जुलै/पीटीआय

चौकार-षटकारांची आतषबाजी, खेळाडूंना घसघशीत मानधन, चिअर गर्ल्सची दिलखेचक अदा यात आयपीएलचे दुसरे पर्व संपले. भिन्न-भिन्न देशांतील सीमारेषा पुसट करणाऱ्या या आयपीएल स्पर्धेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वेळापत्रकात नियमित स्थान नाही हे विशेष!

अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलियाला हवा अ‍ॅशेस मालिकेत विजय
दुबई, ७ जुलै / पीटीआय

रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी अ‍ॅशेस मालिका जिंकावीच लागणार आहे. कारण इंग्लंडने ही मालिका बरोबरीत सोडविली तरीही ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या क्रमांकावर ढकलला जाईल. इंग्लंडला ऑस्ट्रेलियन संघाला मागे टाकण्याचीही संधी या मालिकेत मिळू शकेल; पण त्यासाठी त्यांना प्रत्येक कसोटी जिंकण्याची अद्वितीय कामगिरी करावी लागेल.

टी-१० गल्ली क्रिकेटची घोषणा, पण बीसीसीआयच्या परवानगीचा प्रश्न कायम
मुंबई, ७ जुलै / क्री. प्र.

हौशी क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टी-१० गल्ली क्रिकेटच्या दुसऱ्या सत्राची घोषणा आज माजी कसोटीपटू संदीप पाटील, मदन लाल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या स्पर्धेला भारतीय क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी परवानगी नाकारली होती. यावर्षीही बीसीसीआयकडून त्यांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.

राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी कूर्मगतीने - गिल
नवी दिल्ली, ७ जुलै/पीटीआय

केवळ १५ महिन्यांवर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा येऊन ठेपली असली तरी सरकारला मात्र त्याची चिंता नाही. २०१० मध्ये दिल्लीत होणाऱ्या या स्पर्धेची तयारी सद्यस्थितीत तरी मंद गतीने सुरू असल्याची कबुली क्रीडामंत्री एम.एस. गिल यांनी दिली आहे. याबरोबरच लवकरात लवकर पुन्हा तयारी सुरू होईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

राजीव गांधी पुरस्कारापासून मेरी कोम वंचित का?
बॉक्सर अखिल कुमारचा सवाल
भोपाळ, ७ जुलै / पीटीआय
आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियुद्धात भारताचे नाव उंचावणारी मेरी कोम हिला राजीव गांधी खेलरत्न न मिळाल्याने ऑलिम्पिक विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सदा न कदा क्रिकेटचाच उदो- उदो करत ट्ेवन्टी- २० संघाच्या कर्णधाराला जर हा पुरस्कार दिला जातो तर मेरी कोमला का नाही , असा सवालही त्याने विचारला आहे.मध्य प्रदेशच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात अखिल बोलत होता. याखेरीज ऑलिम्पिक च्या महत्त्वपूर्ण लढतीत लवकर विजयाच्या नादातच माझे सुवर्ण हुकले अशी कबुलीही त्याने या वेळी दिली. सुवर्णपदकासमोर सारे गौण असते असे सांगत अखिलने आपले इरादे स्पष्ट केले.

पीटरसन आणि फ्लिन्टॉफपासून सावधान
जेसन गिलेस्पीचा इशारा
मेलबर्न, ७ जुलै / पीटीआय

ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेस मालिकेतील विजयात अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ व केविन पीटरसन हीच जोडी मोठा अडसर ठरेल, असे माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याने म्हटले आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीला उद्यापासून कार्डिफ येथे प्रारंभ होत असताना इंग्लंडच्या रवी बोपारा, तसेच ग्रॅमी स्वान या उदयोन्मुख खेळाडूंना कमी लेखून चालणार नाही, असा इशाराही त्याने ऑस्ट्रेलियन संघाला दिला आहे.२००५ मध्ये अ‍ॅश्ले जाइल्सने ऑस्ट्रेलिय स्वाभिमानाला धक्का दिला होता. त्या वेळी जाइल्सने उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांना डाव्या यष्टीबाहेर गोलंदाजी करण्याचे नकारात्मक डावपेच वापरले असाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समज झाला; पण तेच डावपेच यशस्वी ठरले होते. आता स्वानदेखील इंग्लंडसाठी चांगली गोलंदाजी करतो आहे याकडे गिलेस्पीने ऑस्ट्रेलियन संघाचे लक्ष वेधले आहे.

केहार सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई
असभ्य वर्तनाचा आरोप
मुंबई, ७ जुलै / क्री. प्र.

मुंबई हॉकी संघटनेच्या नवनियुक्त व्यवस्थापन समितीने सचिव केहार सिंग यांना कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत असभ्य वर्तन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे व ९० दिवसांसाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यकारिणीचे सदस्य जोअकिम काव्‍‌र्हालो यांनी सांगितले की, केहार सिंग यांनी न्यायालयातील संघटनेच्या विविध खटल्यांची कागदपत्रे व सदस्यनोंदणीच्या फाइल्स देण्यास नकार दिला. त्याशिवाय, त्यांनी असंसदीय भाषाही वापरली. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आयटीएफ टेनिस स्पर्धेत युकी भांब्री दुसऱ्या फेरीत
नवी दिल्ली, ७ जुलै/पीटीआय
भारताच्या युकी भांब्री याने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आज वाटचाल केली. त्याने निहाल कपूरचा ६-२, ६-० असा धुव्वा उडविला.विम्बल्डन स्पर्धेच्या कनिष्ठ गटात भाग न घेता येथे आयटीएफ स्पर्धाच्या मालिकेत सहभागी झालेल्या भांब्रीने गेल्या आठवडय़ातील स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. आज त्याने अव्वल दर्जाचा खेळ करीत निहाल याला फारशी संधी दिली नाही. त्याने पासिंग शॉट्सबरोबर प्लेसिंगचाही सुरेख खेळ केला. बिगरमानांकित खेळाडू ताल इरॉस (इस्रायल) यानेही दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याचा प्रतिस्पर्धी एन.विजय सुंदरप्रशांत याने दुखापतीमुळे तिसऱ्या सेटमध्ये सामना सोडून दिला. त्यावेळी इरॉसकडे १-६, ७-६(७-५), २-१ अशी आघाडी होती.राष्ट्रीय विजेता रणजित विराली मुरुगसेन याने चुरशीच्या लढतीनंतर व्हिग्नेश चंद्रशेखर याचे आव्हान ३-६, ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. अग्रमानांकित केंतो तेकुची याने दुसऱ्या फेरीकडे वाटचाल करताना नवदीपसिंग याला ६-३, ७-६ (७-०) असे नमविले.

न्यूझीलंड संघात बॉण्डला संधी
ख्राइस्टचर्च, ७ जुलै / पीटीआय
इंडियन क्रिकेट लीगमध्ये खेळल्यामुळे बंदी घालण्यात आलेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड याला पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघाचे दरवाजे खुले झाले असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीएलमध्ये खेळणाऱ्या डॅरिल टफी यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. टफी कसोटीसाठी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करील. येत्या ऑगस्ट महिन्यात भारत दौऱ्यावर येणाऱ्या न्यूझीलंड ‘अ’ संघातही बॉण्डला स्थान देण्यात आले आहे.
कसोटी संघ - डॅनियल व्हेटोरी (कर्णधार), क्रेग क्युिमग, ग्रॅन्ट इलियट, डॅनियल फ्लिन, मार्टिन गुप्तिल, ख्रिस मार्टिन, ब्रेन्डन मॅकक्युलम, टिम मॅकिन्टोश, इयन ओब्रायन, जेकब ओराम, जीतन पटेल, जेसी रायडर, रॉस टेलर, डॅरिल टफी व रीस यंग. एकदिवसीय/ट्वेन्टी-२० संघ - डॅनियल व्हेटोरी (कर्णधार), शेन बॉण्ड, नील ब्रूम, इयन बटलर, ग्रॅन्ट इलियट, मार्टिन गुप्तिल, गॅरेथ हॉपकिन्स (यष्टीरक्षक; एकदिवसीय सामन्यांसाठी), ब्रेन्डन मॅकक्युलम, नॅथन मॅकक्युलम, पीटर मॅकग्लाशन (यष्टीरक्षक; ट्वेन्टी-२०साठी), मिल्स, जेकब ओराम, जीतन पटेल, जेसी रायडर, रॉस टेलर.

विलासरावांकडून आभार
मुंबई, ७ जुलै / क्री. प्र.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून क्रिकेटच्या हितासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल विलासराव देशमुख यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांचे तसेच उपाध्यक्षपदाची उमेदवारी मागे घेणाऱ्या प्रवीण बर्वे, श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर यांचे विलासरावांनी विशेष आभार मानले आहेत.

राजस्थान रॉयलची मिडलसेक्सवर मात
मॅस्कारेन्हासचा अष्टपैलू खेळ
लंडन, ७ जुलै / पीटीआय
दिमित्री मॅस्कारेन्हासने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ब्रिटिश आशियाई चषक एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात मिडलसेक्स संघावर ४६ धावांनी मात केली. मॅस्कारेन्हासने ३२ धावांची खेळी केल्यामुळे राजस्थान रॉयल्सने १६२ धावांची खेळी केली व मॅस्कारेन्हासने गोलंदाजीतही चमक दाखविताना मिडलसेक्सच्या नील डेक्स्टर व ओवेस शहा यांना बाद करून राजस्थानच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. मिडलसेक्सचा संघ ७ बाद ११६ धावापर्यंतच मजल मारू शकला. राजस्थान संघातर्फे फैज फझल (२७), स्वप्निल अस्नोडकर (४१) व मोहम्मद कैफ (४१) यांनी चमकदार कामगिरी केली तर मिडलसेक्सतर्फे डेव्हिड मॅलन (३४) चमकला.