Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी स्वतंत्र न्यायालय अन पोलीस ठाणे
ठाणे/प्रतिनिधी - अनधिकृत बांधकामांचे फुटलेले पेव, झोपडपट्टीदादांची आणि बिल्डरांची वाढती दादागिरी, तसेच सततचा राजकीय हस्तक्षेप यामुळे पालिकेचा कारभार करण्यात हतबल ठरत असलेल्या पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामाची डोकेदु:खी कायमची संपविण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आणि शिघ्रगती वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास अंतिम मंजुरी होऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करता यावी यासाठी बुधवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराच्या खिचडीतील शिक्षण मंडळावर प्रशासक कधी नेमणार?
दिलीप शिंदे

ठाणे शिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार, पुस्तके, दप्तर आदी योजनांमध्ये होणारा गैरव्यवहार आणि सदस्यांच्या पात्रतेबाबत ऐरणीवर असलेल्या प्रश्नामुळे शिक्षण मंडळ पुरते बदनाम झाले आहे. म्हणून भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या शिक्षण मंडळावर तात्काळ प्रशासक नियुक्त करून शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा दरवर्षी होणारी विद्यार्थ्यांची गळती रोखणे जिकिरीचे ठरेल.

खिचडी वाटप प्रकरणात संगनमताने भ्रष्टाचार
हरिश्चंद्र पाटील यांचा आरोप
कल्याण/प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पालिकेच्या आणि खासगी शाळांमध्ये वाटण्यात येणारी खिचडी ही फक्त कागदोपत्री वाटण्यात येते. प्रत्यक्षात ठेकेदार, शाळांचे संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक हे संगनमत करून खिचडी प्रकरणात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार करीत आहेत, असा स्पष्ट आरोप आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी केला आहे. कोपरगाव येथील अहिल्याबाई होळकर शाळेत शिऱ्यामध्ये पाल सापडल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर खिचडी हा विषय शहरात चर्चेला आला आहे.

ठाणे परिवहनची अजब सेवा
विचित्र वेळापत्रक
ठाणे/ प्रतिनिधी

ठाणे परिवहनच्या बेशिस्त कारभाराला शिस्त आणण्यासाठी, तिला जिवंत ठेवण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, आपला स्वार्थ थोडा सोडला पाहिजे, असे ठाणे परिवहनचे सदस्य, अधिकारी आणि नगरसेवकांना बिलकुल वाटत नाही. ज्या शहराला सध्या ४५० बसेसची गरज आहे, त्या ठाणे शहरात जेमतेम १५०-१६० बसेसच्या जोरावर ठाणे परिवहनसेवेचा कारभार कसाबसा हाकला जात आहे. शहराला चांगल्या परिवहन सेवेची गरज आहे. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि टीएमटी प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे ठाणे परिवहनचे पुरते वाटोळे लागत आहे.

संस्कार भारतीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध स्पर्धा
ठाणे/ प्रतिनिधी

संस्कार भारतीच्या येथील समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रविवार ९ ऑगस्ट रोजी निबंध, चित्रकला आणि नृत्यस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा तीन गटात होणार असून ती शिवसमर्थ विद्यालय, राम मारुती रोड, नौपाडा येथे सकाळी ९ ते १० या वेळेत होईल. चौथी ते सातवीच्या पहिल्या गटासाठी पाऊस किंवा गोमाता हे विषय असून स्पर्धकांनी कमाल ५०० शब्दात निबंध लिहिणे आवश्यक आहे. आठवी ते दहावीच्या दुसऱ्या गटासाठी भारताचे अंतराळ स्वप्न आणि गाईचे वैज्ञानिक महत्त्व असे विषय देण्यात आले असून ८०० शब्दमर्यादा आहे.

यश शहा हत्या: पोलीस यंत्रणा हताश
कल्याण/वार्ताहर

डोंबिवलीमधील शहा कुटुंबियांकडे २० लाखांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोरांनी गुन्हा करताना कोणताही पुरावा ठेवला नसल्याने या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला आहे. यश शहाला खंडणीसाठी पळवून त्याची हत्या करण्याचा प्रकार पूर्वी गुन्ह्यात अडकलेल्यांनी जामिनासाठी पैसे मिळावे, यासाठी १८ ते ३० वयोगटातील गुन्हेगारांनी केला असण्याची शक्यता पोलीस उपायुक्त संजय शिंत्रे यांनी व्यक्त केली आहे.

‘यशस्वी भव’ उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भिवंडी/वार्ताहर

कामतघर येथील श्री रंगराव विठोबा पवार माध्यमिक विद्यालयातील प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना नगरसेवक आणि विद्यालयाचे अध्यक्ष साईनाथ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ९५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक लाख ११ हजार रुपये रोख देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या विद्यार्थ्यांनी अभ्यासात ‘लोकसत्ता’मधील ‘यशस्वी भव’ या सदराची खूप मदत झाल्याचे मान्य केले.

विठ्ठलाच्या स्वरभक्तीत रसिक झाले चिंब
डोंबिवली/प्रतिनिधी - आषाढी एकादशीनिमित्त पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य माधव गुडी यांनी डोंबिवलीत विठ्ठलाच्या स्वरसाधनेने आरधना करून उपस्थित भक्तजनांना भक्तिरसाने ओलेचिंब केले. जीएसबी वेल्फेअर ग्रुपचे के. व्ही. भट, गिरीधर पै यांनी आषाढी एकादशीनिमित्त माऊली हॉलमध्ये संतवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गुडी यांनी विठ्ठलाच्या आराधना करणाऱ्या रचना सादर केल्या.

कोपरीत ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना
ठाणे/प्रतिनिधी : कोपरी विभागातील ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘आधार’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महापालिका सभागृहनेता आणि स्थानिक नगरसेवक पांडुरंग पाटील यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिक संघात ११२ सभासद असून, संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविल्या जाणार आहेत. यावेळी भाई परब यांची अध्यक्षपदी, पोपट तळोले यांची खजिनदार म्हणून, तर गमरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. महिला विभागासाठी नीलूताई नाईक यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

मदनजींच्या अवीट गाण्यांची मैफल
ठाणे/ प्रतिनिधी: मदन मोहन यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘कला माध्यम’ या संस्थेतर्फे या महान संगीतकाराला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार, १२ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सहयोग मंदिर, ठाणे येथे गाण्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. १९५० ते ७५ या २५ वर्षांत मदन मोहन यांनी अवघ्या ९२ चित्रपटांना संगीत दिले. त्या चित्रपटांपैकी ‘ऑँखे’, ‘वह कौन थी’, ‘अनपढ’, ‘भाईभाई’, ‘हसते जख्म’, ‘लैला मजनू’, ‘मौसम’ या चित्रपटांना रौप्य महोत्सवी यश मिळू शकले. मदन मोहन म्हणजे सतार, सारंगी, तबला, व्हायोलीन, बेस गिटार, पियानो, ढोलक, बोंगो, सेक्सो फोन किंवा अॅकॉर्डियन अशा मोजक्या गाण्यांचा सुरेल मेळ साधून जोडीला स्वरसम्राज्ञीच्या कोकिळकंठाची साथ घेऊन संगीताचा स्वर्ग उभा केला होता. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली वो भूली दास्ताँ, आप की नजरो ने समझा, हम प्यार में जलनेवालों को, यू हसरतों के दाग, जाना था हमसे दूर, मेरी याद में तुम ना आँसू, शोख नजर की बिजालियाँ, मैं पागल.. अशी असंख्य अजरामर गाणी या कार्यक्रमात सादर केली जातील. संपर्क : ९८६९०१३३४४

मुखवटय़ामागच्या चेहऱ्यांचे चित्रप्रदर्शन!
ठाणे/प्रतिनिधी: प्रत्येक माणूस एक मुखवटा घालून वावरत असतो. हा मुखवटा जगाच्या दृष्टीने वेगळा असतो. मुखवटय़ामागे दडलेला चेहराही वेगळा असतो. कलाकार म्हणून मुखवटय़ामागची माणसे शोधण्याचा प्रयत्न चित्रकार स्वरूप बिश्वास यांनी केला आहे. मानवी जीवनाच्या आविष्काराचे विविध रंग विश्वास यांनी त्यांच्या चित्रांतून उलगडले आहेत. ठाणे कलाभवनमध्ये त्यांनी काढलेल्या, मनाला भिडणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन सध्या कापूरबावडी नाक्यावरील बिग बाझारजवळील ठाणे कलाभवनात भरले आहे. हे प्रदर्शन १८ जुलैपर्यंत असेल. कोलकाताच्या इंडियन कॉलेजमधून डिप्लोमा केलेल्या स्वरूप बिश्वास यांनी लखनौच्या शासकीय महाविद्यालयातून बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी मिळविली. देश-विदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. ठाण्यात पहिल्यांदाच हे प्रदर्शन होत आहे.

महिला लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणावर भर - नीला सत्यनारायण
खास प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी सांगितले.
नीला सत्यनारायण यांनी सोमवारी निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ३३ टक्के आरक्षणामुळे महिलांचा लोकप्रतिनिधी बनण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी अनेकदा त्या ‘डमी’ लोकप्रतिनिधी असल्याची टीका केली जाते. ही परिस्थिती बदलण्याची गरज असून त्यांच्या प्रशिक्षणासाठी एखादी योजना तयार करण्याचा माझा मानस आहे. महिला लोकप्रतिनिधी सर्वार्थाने समर्थ होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल खात्यात काम करताना तळापर्यंतच्या महिला अधिकाऱ्यांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवला होता. त्याचे चांगले परिणाम दिसले होते. भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत आक्षेप घेतले असले तरी राज्यातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अत्यंत चांगली असून त्याबाबत कोणाचीही तक्रार नाही. ‘एक दिवस जी‘वना’साठी’ हे आपले पुस्तक ग्रंथालीतर्फे लवकरच प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.