Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

व्यक्तिवेध

 

शिल्पं, स्मृतिस्तंभ, स्मारकं, उद्यानं, लेणी, धरणं या गोष्टी समाजाच्या सांस्कृतिक-औद्योगिक विकसनाच्या साक्षीदार मानल्या जातात. या प्रतिकांची उभारणी मोजक्या काळात घडणारी नव्हे. त्यासाठी काही जणांची काही र्वष खर्ची पडतात; तर काहींना त्यासाठी पिढय़ापिढय़ांचंही योगदान द्यावं लागतं. ती प्रतिकं उभी राहतात, त्यांना नावंही दिली जातात, आणि ती ज्यांच्या कारकीर्दीत उभी राहिली, त्यांच्या नावांच्या पाटय़ाही त्या त्या प्रतिकांवर चढतात, पण ती प्रतिकं घडवणाऱ्या कुणाचीच नामोनिशाणी त्या प्रतिकांवर सहसा रहात नाही. त्यामुळेच अजिंठा-वेरुळची शिल्पं कुणी घडवली हे जगाला ज्ञात होत नाही आणि शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांच्या वास्तुशिल्पींचे नावही जगापुढे येत नाही. वांद्रे-वरळी सागरी सेतूही याला अपवाद कसा असावा? या सेतूची मूळ कल्पना सेना-भाजप राजवटीतली, तो बांधला मात्र कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने. सेना-भाजप सरकारने त्याचे मूळ नाव ठरवले सावरकर सेतू आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने म्हणे ते केले राजीव सेतू. ते नाव शरद पवारांनी सुचवले आणि त्याची भवतीनभवतीच खूप झाली. पण या साऱ्या प्रकारात पडद्याआड राहिले ते पुलाच्या मूळ डिझायनरचे नाव. ना त्या पुलाच्या मूळ संकल्पकाला उद्घाटन समारंभात स्थान मिळाले, ना त्या पुलाच्या डिझायनरला. शेषाद्री श्रीनिवासन हे त्या डिझायनरचे नाव. वय वर्षे ७७ फक्त. श्रीनिवासन मूळचे मद्रासचे, १९५८ साली मद्रास विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर श्रीनिवासन पूलबांधणी क्षेत्रात आले. ५१ वर्षांत श्रीनिवासन यांनी किमान शंभरेक पूल बांधून हातावेगळे केले. वांद्रे-वरळी सेतूच्या निमित्ताने पत्रकारांनी त्यांना गाठले, तेव्हा हा पूल नेमका कितवा, यावरचे त्यांचे उत्तर मार्मिक होते. मी माझा शंभरावा पूल बांधून पूर्ण केला, त्यालाही आता काही वर्षे उलटून गेली असावीत, इतकेच ते म्हणाले होते. जे. जे. फ्लायओव्हर हा त्यांनी बांधून पूर्ण केलेला एक अगदी अलीकडचा महत्वाकांक्षी प्रकल्प. तो पुरा झाला २००२ साली. २,४०० मीटर लांबीचा हा पूल मुंबईकरांच्या लेखी एक आकर्षणकेंद्र ठरला. त्यानं दक्षिण मुंबईतली वाहतूक कोंडी, विशेषत: भेंडीबाजार भागातील गर्दी तर नाहीशी केलीच, पण उपयोगिता आणि सौंदर्य याची उत्तम सांगड घालता येते, हे सिद्धही करून दाखवलं. इस्लामधर्मीयांचं पवित्र शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्केतील जमारत ब्रिजचं डिझायनिंगही त्यांचंच. हज यात्रेला जाणारे भाविक या पुलाचा वापर करतात तो ‘डेव्हिल वॉल’वर दगडफेक करण्यासाठी. १९८६ साली ठाणे खाडीवरच्या पुलाचा विचार सुरू होता, तेव्हा श्रीनिवासन यांनी सहा डिझाइन्स सादर केली होती. पण ते कंत्राटच उत्तर प्रदेश सरकारकडे गेले आणि श्रीनिवासन एका संधीला मुकले. वांद्रे-वरळी सेतूचे काम त्यांच्या दार-अल्-हँडसाह या कंपनीला २००३ साली मिळाले. डिझाइन करायचे होते ते केबलस्टेड ब्रिजचे. त्याचा प्राथमिक आराखडा त्यांच्या कंपनीने तयारही केला, पण त्यात दिवसागणिक बदल होते गेले. प्रथम तो एका टॉवरचा व्हायचा होता, दोन्ही मार्गिकांना एकाच टॉवरचा आधार रहायचा होता, त्यामुळे स्वाभाविकपणे दोन्ही मार्गिका एकाच वेळी बांधल्या जायच्या होत्या. पण पुढे दोन टॉवरचा पर्याय आला. आराखडेच बदलावे लागले. खर्चातही प्रचंड वाढ झाली आणि पर्यावरणाच्या नावाखाली जो विरोध झाला त्यामुळे पूल चौपट महाग झाला. श्रीनिवास यांनी सौदी अरेबियातला रियाधचा अल् खलीज व्हायाडक्ट, कुराशिया ब्रिज, सेकंड मनामा-मुहर्रक क्रॉसिंग, सेकंड नर्मदा ब्रिज, सिरसी सर्कल फ्लायओव्हर, सुंगई प्राई ब्रिज, वाडी अबदौन ब्रिज, वाडी लेबन ब्रिज असे अनेक देखणे पूल बांधून दिले आहेत. असं असलं तरी वांद्रे-वरळी पुलानं जे समाधान दिलं ते अन्य कुठल्याच पुलानं आजवर दिलं नव्हतं, हे श्रीनिवासन यांचं मनोगत खूप बोलकं आहे. पूल हे केवळ दोन शहरांना जोडणारे वास्तुशिल्प असता कामा नये; तर ते दोन मनांनाही जोडणारे वास्तुशिल्प असावे अशी संकल्पना श्रीनिवासन यांनी मनाशी बाळगली आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या निर्मितीतून ती साकारलीही.