Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

शौचालयाच्या टाक्यात पडून बालिकेचा मृत्यू
अकोला, ७ जुलै /प्रतिनिधी

शिवर येथील बेपत्ता झालेल्या बालिकेचा मृतदेह घरामागील शौचालयाच्या टाक्यात मंगळवारी सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिवर येथील सुभाष प्रधान यांची चार वर्षाची साक्षी सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाली. केजी वनमध्ये शिकत असलेल्या साक्षीला तिच्या वडिलांनी नवीन पुस्तके आणून दिली होती. पुस्तकांना कव्हर्स लावल्यानंतर झालेला कचरा फेकण्यासाठी बाहेर गेलेली साक्षी परतलीच नाही.

अकोला महापालिकेचे कामकाज ठप्प
महापौर-आयुक्त वाद
अकोला, ७ जुलै /प्रतिनिधी

महापौर मदन भरगड यांनी आयुक्त गिरीधर कुर्वे यांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ अकोला महापालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन केले. महापौरांनी माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आंदोलनामुळे महापालिकेतील कामकाज मंगळवारी दिवसभर ठप्प राहिले. अमरावती येथे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एकात्मिक घरकुल योजनेची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली.

कर्ज सवलत मुदतवाढीचा १५ हजार शेतकऱ्यांना लाभ
बुलढाणा, ७ जुलै / प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी व कर्ज सवलती योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्य़ातील १५ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला असून दिलेल्या मुदतीमध्ये सवलतीचे हप्ते न भरल्यामुळे जवळपास ८ हजार शेतकऱ्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफी व कर्ज सवलतीचा जिल्ह्य़ात मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाच्या योजनेचा ९८ हजार ९३० तर राज्य सरकारच्या योजनेचा ३७ हजार २१३ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

अमरावती विभागात नवीन आठ ‘पॉलिटेक्निक’ला मान्यता
यवतमाळ - ४, बुलढाणा -२, अमरावती - २
यवतमाळ, ७ जुलै / वार्ताहर
अमरावती विभागात यंदा आठ शिक्षण संस्थांना ‘पॉलिटेक्निक कॉलेज’साठी मान्यता देण्यात आली आहे. आठ पैकी चार कॉलेज यवतमाळ जिल्ह्य़ात आहेत. उर्वरित चार कॉलेजपैकी दोन बुलढाणा जिल्ह्य़ात व दोन अमरावती जिल्ह्य़ात आहेत.

दोन पोलीस निलंबित; ठाणेदाराची बदली
काँग्रेसच्या आंदोलनाची सांगता
ब्रह्मपुरी, ७ जुलै / वार्ताहर
ब्रह्मपुरी पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात ब्रह्मपुरी तालुका काँग्रेसने केलेल्या आंदोलनाची वरिष्ठांनी दखल घेतली असून विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, नगराध्यक्ष अशोक भैया, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रश्न. राजेश कांबळे, संदीप गड्डमवार व रवींद्र दरेकर आदी उपस्थित होते.

अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे- पाटणी
वाशीम, ७ जुलै / वार्ताहर
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खताचे अनुदान थेट देण्याचा केंद्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु, हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत सेनेचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी येथे व्यक्त केले. केंद्र सरकारने गोरगरिबांना ३ रुपये प्रतिकिलो दराने गहू अथवा तांदूळ देण्याची घोषणा केली आहे पण, सध्या स्वस्त धान्य दुकानामध्ये दारिद्रय़ रेषेखालील, दारिद्रय़ रेषेवरील व मध्यमवर्गीय नागरिकांना धान्यच मिळत नाही, असेही ते म्हणाले. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला कोणताही दिलासा मिळाला नाही. भारतीय जनता पक्ष व आघाडीच्या तत्कालीन केंद्र शासनाने आयकराची १५ हजार रुपयांची मुदत वाढवून १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत नेली होती. या शासनाने फक्त १० हजार रुपयांची आयकरामध्ये मर्यादा वाढवली. शेतकरी-शेतमजूर यांचे भवितव्यदेखील अंधारात ठेवले. औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष तरतूद कोणतीही केली नाही, अशी टीका विश्वमंगल गो-ग्राम यात्रेचे संयोजक प्रश्न. दिलीप जोशी यांनी केली.केंद्र शासनाच्या २००९-१० च्या अर्थसंकल्पामध्ये फक्त दीर्घमुदतीसाठी फायद्याची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात अल्पमुदतीसाठी कोणताही फायदा होणार नाही, असे वाशीम अर्बन बँकेचे संचालक सुभाष राठी यांनी सांगितले.

पहिल्याच पावसात सिमेंट बंधारा वाहून गेला
सिंदखेडराजा, ७ जुलै / वार्ताहर
जळगाव-पिंपळगाव नदीपात्रात बांधण्यात आलेला निकृष्ट दर्जाचा सिमेंटचा बंधारा पहिल्याच पुरात वाहून गेला. या बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत असून खर्च झालेले ८ लाख ६३ हजार रुपये पाण्यात गेले आहे. तालुक्यातील जळगाव-पिंपळगाव नदीच्या पात्रामध्ये काही महिन्यांपूर्वी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेतून शिवकल्याण पाणीपुरवठा भूवैज्ञानिक विभागामार्फत बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. या बंधाऱ्यावर ८ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता परंतु, या कामावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदारासह सर्व संबंधितांनी कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शिवसेनेचे रामेश्वर मेहेत्रे यांनी तक्रार केली होती परंतु, वरिष्ठांनी काहीच कारवाई केली नाही. बोगस बांधकाम झाल्याने हा बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेला. पावसामुळे जळगाव-पिंपळगाव नदीला मोठा पूर आला. पहिल्याच पावसाच्या पुरात हा बंधारा तुटून वाहून गेला आहे. या बंधाऱ्यावर खर्च झालेले साडे आठ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. बंधारा वाहून गेल्याचे समजताच शिवकल्याण पाणीपुरवठा भूवैज्ञानिक विभागासह ठेकेदार आणि सर्व संबंधितांचे धाबे दणाणले आहे. या बंधाऱ्याप्रकरणी आता प्रशासन काय करवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

आमना नदीतून रेतीचा बेकायदा उपसा
देऊळगावराजा, ७ जुलै / वार्ताहर
जवळखेड येथील आमना नदीतून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार रेतीचा उपसा न करता ठेकेदाराने रेतीचे उत्खनन सुरू केले आहे. या प्रकरणी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रमोद राजे जाधव यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील जवळखेड येथील आमना नदीवरील रेतीचे उत्खनन करण्याची परवानगी बुलढाणा येथील सखाराम काळकर यांना देण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार १५० मीटर अंतरापुढे रेतीचे उत्खनन करण्याची व वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे, असे असतानाही ठेकेदार अवैधरीत्या रेतीचा उपसा करून वाहतूक करीत आहे. तसेच १२७ ब्रास एवढय़ा रेतीचा उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र ठेकेदाराने आतापर्यंत २०० ब्रास रेतीचा उपसा केला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्याचप्रमाणे चिंचोली बुरकुल येथील आमना नदीवरूनही बेकायदा उपसा सुरू आहे. ठेकेदार रॉयल्टीच्या पावत्या मात्र असोला जहांगीर व जवळखेड येथील देत आहे. यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. याप्रकरणी ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रमोद राजे जाधव यांनी केली आहे. या प्रकरणी देऊळगावराजाचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता बेकायदा वाळू उपसा प्रकरणाची मंडळ अधिकारी चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘व्हिडिओ प्रश्नेग्रामिंग’ अभ्यासक्रम
चंद्रपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी
सरदार पटेल महाविद्यालयात २००९-१० या शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यता प्रश्नप्त ‘व्हिडिओ प्रश्नेग्रामिंग’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
सध्याचे युग हे स्पध्रेचे आहेत. केवळ शैक्षणिक अर्हता प्रश्नप्त करून चालणार नाही. तर त्यासोबतच त्याला व्यावसायिक अभ्यासाची जोड हवी. यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकल्पनेतून साकार झालेला ‘व्हिडिओ प्रश्नेग्रामिंग’ हा अभ्यासक्रम या शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहे. बी.ए., बी.एस्सी., बी. कॉम. सारख्या तत्सम पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी या विषयाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी पात्र राहू शकतील. त्यांना पदवीच्या द्वितीय वर्षात पदविका अभ्यासक्रम तर अंतिम वर्षात प्रगत पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल.

घोरपडीस अभय देण्याचे आवाहन
वर्धा, ७ जुलै / प्रतिनिधी
धान्याचा नाश करणाऱ्या उंदिर व घुशींचा फडशा पाडणाऱ्या घोरपडीची भीती न बाळगता या उभयचर प्रश्नण्यास अभय द्यावे, असे आवाहन वन्यजीव प्रेमी संघटनांनी केले आहे. पावसाळ्यात घोरपडीचे प्रजनन होत असल्याने मोठय़ा प्रमाणात तिची पिल्ले आढळून येतात. या पिल्लांना मारल्या जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संघटनेने उपरोक्त आवाहन केले आहे. पावसाचे पाणी बिळात गेल्याने किंवा अन्न शोधण्यासाठी साप, घोरपड, मुंगूस असे सरपटणारे प्रश्नणी बिळाबाहेर पडतात. घोरपड उंदिर, घुशी, साप, गोगलगाय यावर जगते. पिकांचे नुकसान करणाऱ्या प्रश्नण्यांवर घोरपड जगत असल्याने ती शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरते, अशी भूमिका संघटनेचे आशीष गोस्वामी यांनी मांडली. घोरपडीचे प्रमाण विविध कारणांनी कमी होत आहे. मांस, कातडी, तेल, नरडे आदीसाठी घोरपडीची शिकार होत असल्याने या प्रश्नण्यास वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये सुरक्षा देण्यात आली आहे. जैव विविधतेतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या घोरपडीचे संरक्षण करावे, तसेच घोरपड कुठे आढळून आल्यास ९४२२१४१२६२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या पॉवर ट्रिलरची सोडत
बुलढाणा, ७ जुलै / प्रतिनिधी
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचे लाभार्थी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना किफायतशीर शेती करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर पॉवर ट्रिलरचे वाटप करण्यात येणार आहे. पॉवर ट्रिलरची सोडत ९ जुलै ला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जिल्हास्तर समिती तसेच स्वाभिमान योजनेचा लाभ मिळालेल्या तीन शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत गुरूवार ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात लॉटरी पद्धतीने पॉवर ट्रिलरची सोडत काढण्यात येणार आहे. यादी विशेष समाज कल्याण कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतीय संगीत महाविद्यालयाचे यश
भंडारा, ७ जुलै / वार्ताहर
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाद्वारे संचालित भारतीय संगीत महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे, असे प्रश्नचार्य सुधाकरराव हांडे यांनी कळविले आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर २००८ आणि एप्रिल-मे २००९ या दोन्ही सत्रात झालेल्या परीक्षात एकूण २९० विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी प्रश्नवीण्य श्रेणीत विशेष योग्यता प्रश्नप्त करून उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत १२२ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ९३ तर तृतीय श्रेणीत ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.गुणवत्ता यादीत रितू बोपचे, मिताली भागवत, प्रश्नची पातुरकर, मनीषा वंजानी, स्नेहल हाडगे, पूजा भालेराव, सुरभी हांडे, रश्मी व्याघ्रांबरे, सिद्धेश हांडे, इंद्रायणी कावळे यांची नावे आहेत.

महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय कलोरे
शेगाव, ७ जुलै / वार्ताहर

येथील महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नगरपरिषदेचे शिक्षण सभापती संजय कलोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संचालक पुरुषोत्तम शेगोकार, डॉ. डी.पी. लहाने, अनिल कलोरे, सुनीता पोटदुखे, माधुरी लहाने, रमेश दिवनाले, मुकिंदा शेगोकार, रंजना गजानन पोटदुखे, वासुदेवराव गणोरकर उपस्थित होते. संजय कलोरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

शेगावात आषाढी पोळा उत्साहात
शेगाव, ७ जुलै / वार्ताहर
येथील मारुती संस्थानसमोर आषाढी पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी बैलजोडय़ा सजवून पोळ्यात उभ्या केल्या होत्या. बुरूंगले यांच्या मानाच्या बैलाचे पूजन काकासाहेब बुरूंगले यांनी केल्यानंतर पोळा विसर्जित करण्यात आला. यावेळी मधु म्हसाळ, संतोष माने, नगरपरिषद सदस्य शिवाजी बुरूंगले, माजी नगरपरिषद सदस्य शिवाजी कांबळे, नगरपरिषद उपाध्यक्ष रामविजय बुरूंगले, मच्छिंद्र देवकते, अंगत पिंगळे, नामदेव माने, नामदेव करे आदी उपस्थित होते.

वीज पडून मुलीचा मृत्यू; चार जखमी
भंडारा, ७ जुलै / वार्ताहर
सिल्ली येथील शिवारात वीज पडून एका मुलीचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. भंडारा तालुक्यातील सिल्ली शेत शिवारात तुरीची लागवड करण्यासाठी गावातील महिला गेल्या होत्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेतात वीज कोसळली. यात मनीषा केशवराव पंधरे (१४) या बालिकेचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेल्या लक्ष्मी पडोळे (१५), गीता जांभूळकर (३५), गीता चव्हाण (४०) आणि मंगला शहारे (१४) या जखमी झाल्या. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील पवनी व लाखांदूर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे.

सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास
चिखली, ७ जुलै / वार्ताहर
भांडय़ाला चकाकी करून देण्याच्या नावाखाली सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दोघांनी पळ काढला. शिवाजीनगर परिसरातील रावसाहेब पाटील यांच्या घरी दोघांनी भांडे चमकवून देण्याच्या नावाखाली प्रवेश केला. मीना पाटील यांनी दिलेले काही भांडे व मूर्ती चमकवून दिल्याने खूष होऊन त्यांनी हातातील बांगडय़ा पाटल्या व मंगळसूत्र चमकवण्यासाठी दिले. पाणी आणण्यासाठी मीनाला पाठवून संधी मिळताच चोरटय़ांनी सर्व दागिण्यांसह पोबारा केला. या सर्व दागिण्यांचे मूल्य सुमारे दोन लक्ष पंचवीस हजार रुपये असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रावसाहेब पाटील हे सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी आहेत. दिवसाढवळया झालेल्या या फसवणूक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

प्रसूतीगृह बांधकामाचे भूमिपूजन
चंद्रपूर, ७ जुलै/ प्रतिनिधी

बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मंजूर प्रसूतीगृह बांधकामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा सरचिटणीस प्रमोद कडू, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पटकोटवार, जिल्हा परिषद सदस्य शालिक पेंदराम, तुषार सोम प्रश्नमुख्याने उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रश्नस्ताविकपर भाषणात बोलताना कळमना ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश पोडे यांनी आमदार मुनगंटीवार यांचे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर आभार व्यक्त केले. यापूर्वीही कळमना येथे गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते, बोअरिंग आदी विकासकामे सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ण केली आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस प्रमोद कडू, तुषार सोम यांचीही भाषणे झाली. संचालन सुनील कोवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागोबा मोरे, अमरदीप उपरे, विलास साळवे, बंडू गावंडे, विनोद उरकुडे, रवींद्र उरकुडे, श्यामसुंदर झाडे, दौलत शेडमाके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कळमना येथील नागरिक उपस्थित होते.

हंगामी कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
भंडारा, ७ जुलै / वार्ताहर
तसर (कोसा) अनुसंधान केन्द्राच्या खापा येथील नर्सरीतील हंगामी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. १९९४ पासून हे कामगार कामावर होते. परंतु, गेल्या २२ जून २००९ ला त्यांना कामावरून कमी करण्यात आले. कामगारांना कामावरून कमी करण्याचा आदेश राची येथील वरिष्ठ कार्यालयातून देण्यात आल्याचे समजते. यामुळे १९ कामगारांवर बेकारीचा प्रसंग ओढवला आहे. केन्द्रीय रेशीम बोर्डाने या कामगारांच्या जीवनमरणाच्या प्रश्नाचा सहानुभूतीने विचार करावा, असे निवेदन कामगारांच्यावतीने वरिष्ठांना देण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप
शेंदुरजनाघाट, ७ जुलै / वार्ताहर
शालेय परिसराची स्वच्छता करून परिपाठाला सुरुवात झाली. गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीत सर्व विद्यार्थी, शिक्षक प्रशासन अधिकारी नगराध्यक्ष आणि पदाधिकारी सहभागी झाले. त्यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन अभिनंदन केले. सकाळी ९ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभा सोनेकर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुरेंद्र आंडे व शिक्षण सभापती लोखंडे आणि इतर पदाधिकारी, पालक उपस्थित होते. पाहुण्याच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन हरले यांनी तर आभार टेंभे यांनी मानले.

लॉयन्स क्लबतर्फे डॉक्टरांचा सत्कार
भंडारा, ७ जुलै / वार्ताहर
लॉयन्स क्लब क्रॉस सिटी भंडारातर्फे लॉयन्स अध्यक्ष सचिव, पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टरांकडे जाणाऱ्यांमध्ये लॉयन्स क्लब क्रॉस सिटी भंडाराचा नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. धनराज खोब्रागडे, सचिव लॉ. चांदना, एम.जे.एफ. ईश्वरलाल काबरा, एम.जे. एम. ज्ञानेश्वर वांदिले, एम.जे. राधाकिसन झंवर, रमेश पांडे, सेवकभाऊ कारेमोरे, मोतीलाल फिरोदिया, लॉयनेस अध्यक्ष संगीता सुखानी, सचिव निशा कारेमोरे हे असून त्यांनी डॉ. चौधरी, व्यास, लेंडे व अन्य डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टर्स डे साजरा केला.

रुग्णांना रेल्वेभाडय़ात सवलतीची मागणी
भंडारा, ४ जुलै / वार्ताहर

सिकलसेल रुग्णांना रेल्वे प्रवास भाडय़ात सवलत मिळावी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना बहुजन प्रबोधन मंचच्या वतीने तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. श्रीमंतांमध्ये आढळणारा थॅलेसिमीया हा आजार व गरिबांमध्ये आढळणारा सिकलसेल हा आजार जेनेटिक असून त्या हिमोग्लोबिनशी संबंधित आहेत. सिकलसेल समूळ नष्ट करण्यासाठी संपूर्ण जगात खात्रीलायक उपचार आजपर्यंत नाही. देशातील १२ राज्ये व एक केंद्रशासित प्रदेशातील गरीब लोक सिकलसेलच्या विळख्यात सापडले आहेत. सिकलसेलच्या आजाराने जाणकारांच्या मते देशात १० लाख सिकलसेलचे रुग्ण आहेत. दुर्गम विभागातील सिकलसेल रुग्णांना वर्षातून तीन-चार वेळा रक्त घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे त्यांना रेल्वेत सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठाणेदाराविरोधात शिवसेनेचे धरणे
बुलढाणा, ७ जुलै / प्रतिनिधी

ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या सामान्य व्यक्तींच्या तक्रारी न घेणे, अ‍ॅपे व टॅक्सी चालकांना नाहक वेठीस धरणे, अवैध धंद्यावर नियंत्रण न ठेवणे यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धाड पोलीस ठाण्यासमोर धरणे देण्यात आले.धाड येथील ठाणेदार सूर्यवंशी व शिपाई काझी हे परिसरात वाढत चाललेल्या अवैध धंद्यावर नियंत्रण न ठेवता ऑटोचालकांना वेठीस धरून त्यांच्याकडून हप्ते वसुली करतात. पैसे देण्यास नकार दिला असता खोटय़ा केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देतात. पोलीस ठाण्यात सामान्य माणूस तक्रार घेऊन गेला असता त्यांना सन्मानाची वागणूक देणे तर दूरच त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत नाही.
गावठी दारू, अवैध दारू, जुगार, सागवान लाकूड, तस्करी, गांजा तस्करी असे विविध अवैध धंदे वाढले आहे. ऑटो चालकांना विनाकरण त्रास देण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने पोलीस ठाण्यासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आ. विजयराज शिंदे यांनी केले.

अज्ञात रोगाने जनावरांचा मृत्यू
यवतमाळ, ७ जुलै / वार्ताहर

गेल्या दोन दिवसात अज्ञात रोगाच्या साथीने पाटणबोरी येथे ६ गायींचा तर १० डुकरांचा मृत्यू झाला आहे. डुकरांच्या अचानक मृत्यूमुळे स्वाईन फ्लूची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसात रोज ४ ते ५ डुकरांचा मृत्यू होत असताना अनेक गायींचासुद्धा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकात भीती पसरली आहे. एकीकडे अपुऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशात डुकरांच्या अचानक होत असलेल्या मृत्यूमुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना घरूनच पाणी घेऊन जाण्यास सांगत आहेत. प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

विजेच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यू
अचलपूर, ७ जुलै/ वार्ताहर

शेतात गवत कापताना विजेचा धक्का लागून एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पथ्रोट येथे मंगळवारी दुपारी घडली.पथ्रोट येथील विनोद देविदास जायले (२८) मंगळवारी गोरले यांच्या शेतात कामाला गेला. गुरांसाठी गवत कापण्यासाठी तो शेजारच्या शेतात गेला. गवत कापताना बोअरवेलसाठी टाकलेले केबलही विळ्याने कापले गेल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या
बुलढाणा, ७ जुलै / प्रतिनिधी

पशुचिकित्सकांच्या संपामुळे पशुधन मालकांचे हाल होत आहेत. उपचाराअभावी जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष प्रकट करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत बैल नेण्यात आला. हा प्रकार केवळ असंतोष प्रदर्शित करण्याचाच असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांन देण्यात आले. २ जुलैला वरवंड येथील राजेंद्र जेऊघाले यांचा बैल उपचाराअभावी मरण पावला. पशुचिकित्सकांच्या संपामुळे बैलाचा उपचार होऊ शकला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच आपद्ग्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी मृत बैल जिल्हाधिकारी कार्यालयावर आणून असंतोष प्रकट केला. कोणतीही कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली नसताना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अस्मानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करून पुन्हा हैराण करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी गजानन अमदाबादकर, डॉ. जनार्दन शिवनेकर, श्यामभाऊ राखोंडे, शारदा राजपूत यांनी केली आहे.