Leading International Marathi News Daily

बुधवार, ८ जुलै २००९

विविध

सरबजितसाठी नवे वकील
आज करणार दयेचा अर्ज

लाहोर, ७ जुलै/पी.टी.आय.

पाकिस्तानात फाशी सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्या शिक्षेत कपात अथवा माफीसाठीच्या हालचालींनी वेग घेतला असून, नवे वकील आता त्याचा खटला लढविणार आहेत. बुधवारी नवे वकील ओवेस शेख हे सरबजितचा दयेचा अर्ज राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. गेल्याच आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने सरबजितच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला होता.

२६/११ सारखा हल्ला
लष्कर -ए- तय्यबा पुन्हा करण्याची शक्यता!
आखाती देशांतील हस्तकांकडून होऊ शकतात हल्ले

व्हर्जिनिआ, ७ जुलै/ वृत्तसंस्था

मुंबईवर झालेल्या २६/११च्या सर्वात मोठय़ा दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्यासाठी लष्कर- ए- तय्यबा आपल्या आखाती देशांमधील हस्तकांवर बराच मोठय़ा प्रमाणावर पैसे खर्च करीत असून, गुजरात, महाराष्ट्र किंवा गोवा या किनारी शहरांवर हे हल्ले होऊ शकतात, असा अहवाल अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे.

देशातील १६ व्याघप्रकल्प ‘डेंजर झोन’मध्ये
वाघांची अतोनात शिकार झाल्याची केंद्र सरकारची कबुली
सारिस्का, पन्ना अभयारण्यातील वाघ पूर्णपणे संपले

नवी दिल्ली, ७ जुलै / पी.टी.आय.

देशभरातील जंगलांमध्ये वाघांची मोठय़ा प्रमाणात शिकार होत असल्याचे केंद्र सरकारने संसदेत आज जाहीररित्या मान्य केले. देशातील ३७ व्याघ्र प्रकल्पांपैकी १६ व्याघ्र प्रकल्प ‘डेंजर झोन’ मध्ये असून आताच उपाययोजना न केल्यास या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकही वाघ शिल्लक राहणार नाही, असा धोक्याचा इशारा केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री जयराम रमेश यांनी राज्यसभेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिला.

लालूंच्या काळात रेल्वेने कमविलेल्या नफ्याविषयी संशय
नवी दिल्ली, ७ जुलै/खास प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत रेल्वेच्या खात्यात ९० हजार कोटींचा नफा जमा करताना माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी ‘सत्यम’च्या राजूप्रमाणे आकडय़ांची हेराफेरी तर केली नाही? असा संशय आज लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी व्यक्त केला. लालूंच्या कारकीर्दीत रेल्वेच्या कारभारावर रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्वेतपत्र जारी करण्याच्या घोषणेचे स्वागत करताना त्यांनी सहा महिन्यांत श्वेतपत्र काढावे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली.

कर्नाटकात मुसळधार पावसाचे आणखी दोन बळी
बेंगळुरू, ७ जुलै / पीटीआय

मुसळधार पावसामुळे कर्नाटकचे जनजीवन विस्कळीत झाले असून, काल रात्रीपासून येथे दोनजण मृत्युमुखी पडल्याचे समजते. पावसामुळे बळींची संख्या आता पाच झाली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. किनाऱ्यावरील दक्षिण कन्नडा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. एक सात वर्षांचा मुलगा आणि एक कामगार मृत्यमुखी पडला आहे. जिल्ह्यातील नेत्रावती आणि कुमारधारा नद्यांची पाण्याची पातळी वाढत असून, त्या धोक्याची पातळी ओलांडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम बोटींद्वारे सुरू होते, असे अधिकाऱ्यांकडून समजते. उल्लाल, मुक्काचेरी, होसाबेट्टू, मुक्का आणि ससिहितलू भागातील अनेक घरांचे पावसामुळे नुकसान झाले. सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयात २४तास मदतसेवा सुरू करण्यात आली आहे. दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.

अहमदाबादेत विषारी दारूचे १२ बळी; पाच अत्यवस्थ
अहमदाबाद, ७ जुलै/पी.टी.आय.

विषारी दारू प्राशन केल्यामुळे येथील मजूर गाम भागात आज १२ जण मृत्युमुखी पडले. इतर पाचजणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे त्या भागातील रहिवाशी शोकसंतप्त होऊन रस्त्यावर आले. त्यात महिलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता. सरकारने राज्यातील बेकायदा दारूसाठे नष्ट करावेत अशी मागणी निदर्शकांनी केली. प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तथापि, आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी मजूर गाम भागातील काही लोकांना उलटय़ा व पोटात दुखत असल्याचा त्रास होऊ लागला. पाहता पाहता या प्रकाराने गंभीर स्वरूप धारण केले आणि रुग्णालयात दाखल करेपर्यंत सातजण मृत्युमुखी पडले. अन्य पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शक्तिसिंह गोहिल यांनी घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या भागातील बेकायदा दारू दुकानांविषयी अनेकवार तक्रारी करूनही पोलीस त्याची दखल घेत नसल्याची तक्रार महिलांनी केली.

शोपियांप्रकरणी आता पंतप्रधानांना साकडे
श्रीनगर, ७ जुलै/पी.टी.आय.

काश्मीरमधील शोपियां येथे गेल्या ३० मे रोजी झालेल्या दोन महिलांच्या बलात्कार व खूनप्रकरणी पोलीस आणि न्यायालयीन चौकशीसाठी नियुक्त केलेला आयोग या दोघांविषयी अविश्वास व्यक्त करून मजलिस-ए-मुशवरत शोपियां (एमएमएस) या संघटनेने याप्रकरणी पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. एमएमएसचे प्रवक्ते मोहम्मद शफीखान यांनी पत्रकारांना सांगितले की, न्यायालयीन चौकशी आयोगावर आणि विशेष तपास पथकावरही आमचा विश्वास नाही. याप्रकरणी पंतप्रधानांनीच हस्तक्षेप करून अपराध्यांना शासन घडवावे अशी आमची मागणी आहे.