Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

व्यापार - उद्योग

वाढीव ‘व्हॅट’ विरोधात मोबाइल विक्रेत्यांचा आज बंद व मोर्चा

 

व्यापार प्रतिनिधी: मोबाइल हँडसेट्सवर मूल्य वर्धित कर (व्हॅट)चा दर चार टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांवर नेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध म्हणून मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह राज्यभरातील सर्व मोबाइल फोन्सच्या किरकोळ विक्रेत्यांनी येत्या गुरुवारी, ९ जुलैला ‘दुकान बंद’ आंदोलन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत या विरोधात मोर्चाचेही आयोजन केले गेले आहे.
संपूर्ण राज्यभरातील तब्बल ५००० च्या घरात असलेले मोबाइल फोन्सचे विक्रेते, वितरक व व्यापारी राज्य सरकारच्या वाढीव ‘व्हॅट’च्या निर्णयामुळे प्रभावित झाले असून, ते गुरुवारच्या बंदमध्ये सामील होणार आहेत, अशी ‘महाराष्ट्र मोबाइल ट्रेड असोसिएशन’चे अध्यक्ष तुषार आवलानी यांनी माहिती दिली. गुरुवारी दुपारी १ वाजता जेजे उड्डाणपुलापाशी मुंबई व आसपासच्या क्षेत्रातील मोबाइल विक्रेते जमा होतील आणि माझगांवस्थित विक्री कर कार्यालयावर मोर्चाने जाऊन, अतिरिक्त ८.५ टक्के व्हॅट त्वरित मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन विक्री कर आयुक्तांकडे सादर केले जाईल, असेही आवलानी यांनी सांगितले.
दूरसंचारातील क्रांती महाराष्ट्रातील गावागावापर्यंत घेऊन जाण्यात मोबाइल फोन या माध्यमाची महत्वाची भूमिका राहिली आहे. परंतु अन्य राज्यांच्या विपरीत महाराष्ट्रात मोबाइल हँडसेट्सच्या खरेदीवर ८.५ टक्के अतिरिक्त करापोटी भरावे लागणे हे एकंदर या उद्योगाच्या वाढीस मारक ठरेल, असे आवलानी यांनी स्पष्ट केले. शिवाय यातून छुप्या व्यवहारांना व मोबाइल फोन्सच्या अन्य राज्यातून होणाऱ्या तस्करीलाही बळ प्राप्त होईल. त्यामुळे सध्या राज्यात होत असलेली दरमहा १० लाख हँडसेट्सच्या विक्रीत विलक्षण घट होईल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सहा हजार कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात नोकिया इंडियाच्या विक्री विभागाचे संचालक विपुल सबरवाल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने केलेली मोबाईल सेल्युलर हँडसेटच्या व्हॅटवरील वाढ दीर्घकालीन परिणाम लक्षात न घेता केलेली दिसून येते. मोबाईल फोन बाजारपेठ ही अतिशय वेगाने वाढणारी बाजारपेठ असून, या घातक निर्णयामुळे बाजारपेठेची वाढ रोखली जाण्याची शक्यता अधिक आहे. या निर्णयाचा घातक परिणाम राज्याच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासावरही होऊ शकतो.
बाजारपेठेतील अभ्यासानुसार महाराष्ट्रात मोबाईल हँडसेट्सची महिन्याला १० लाख युनिट्सइतकी विक्री होते. यामुळे महिन्याला या बाजारपेठेची उलाढाल ३०० कोटी रुपये प्रती महिना इतकी होते. व्हॅटमधील ८.५ टक्क्यांच्या वाढीमुळे महाराष्ट्र सरकारला सध्याच्या महिन्याला १२ कोटी रुपयांची महसुलामध्ये वाढ होऊन ती महिन्याला ३६ कोटी रुपये होणार आहे. परंतु जाणकारांच्या मते, कायद्याने वैध व्यवहार थंडावून प्रत्यक्षात राज्याला होणारे महसुली नुकसान हे वर्षांला जवळजवळ १०० कोटी रुपयांच्या घरातील असेल.

‘व्हॅट’ सुलभीकरण: विक्रीकर विभाग व व्यापारी यांच्यात ‘ई-मेल’ संपर्क
व्यापार प्रतिनिधी: विक्रीकर विभागाने मूल्यवर्धित करप्रणालीअंतर्गत नोंदणीकृत व्यापाऱ्यांशी तत्पर संवाद साधण्यासाठी ‘रिडीफमेल डॉट कॉम’शी सामंजस्य करून प्रत्येक नोंदणीकृत व्यापाऱ्याला स्वतंत्र ई-मेल आयडी प्रदान करण्याची योजना आखली आहे. विक्रीकर विभागाच्या www.mahavat.gov.in या वेबसाइटवर सर्व अधिकारी/ कर्मचारी यांचे ई-मेल आयडी Whats New? या स्तंभात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याला विक्रीकर विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या संपर्क साधायचा झाल्यास किंवा विक्रीकर अधिकारी/ कर्मचारी यांना व्यापाऱ्याशी संपर्क साधावयाचा असल्यास आता ते अगदी सोपे झाले आहे. यातून पैसा, श्रम व वेळेची बचत होईल, असा विक्रीकर विभागाचा कयास आहे.

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचा कर्जरोख्यांचा ‘पब्लिक इश्यू’
व्यापार प्रतिनिधी: आपल्या आर्थिक क्षमता वृद्धिंगत करण्याच्या हेतूने श्रीराम समूहातील कंपनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.ने सुरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोख्यांमार्फत (एनसीडी) भांडवल उभारणीकरण्याविषयी प्रस्ताव दाखल केल्याची घोषणा केली आहे. यामार्फत कंपनीने रु. ५०० कोटींची भांडवल उभारणी प्रस्तावित केली असून, चांगला प्रतिसाद लाभल्यास अतिरिक्त रु. ५०० कोटींचे भांडवल उभारण्याचे पर्याय कंपनीने खुला ठेवला आहे. कंपनीमार्फत प्रामुख्याने वाणिज्य वापराच्या वाहनांसाठी कर्जसाहाय्य पुरविले जाण्याबरोबरच, ग्राहकोपयोगी वित्तीय सेवा, विमा, स्टॉक ब्रोकिंग, चिट फंड सेवा त्याचप्रमाणे विमा आणि म्युच्युअल फंड योजनांचे वितरण केले जाते. कंपनीच्या देशभरात ४९७ शाखा आणि सहा लाखांहून अधिक ग्राहक असून, कर्मचारी बळ १२,१९६ इतके सशक्त आहे.

एलआयसी हाऊसिंग फायनान्सची ‘फिक्स-ओ-फ्लोटी’ योजना
व्यापार प्रतिनिधी: एलआयसी हौसिंग फायनान्स कंपनीने तीन वर्षांसाठीचे ‘फिक्स-ओ-फ्लोटी’ नावाचे नवे उत्पादन सादर केले आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकांना लवचिकता व बाजारातील बदलत्या व्याजदरांपासून संरक्षण देण्यात आले आहे. ‘फिक्स-ओ-फ्लोटी’ उत्पादनाअंतर्गत ग्राहक पहिल्या तीन वर्षांसाठी ७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर केवळ ८.९ टक्के स्थिर व्याजदर आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ लाख रुपयांपुढील कर्जावर ९.५ टक्के दराने व्याज आकारण्यात येणार आहे. तीन वर्षांनंतर तत्कालीन तरत्या (फ्लोटिंग) दरानुसार व्याज देणार आहे. पहिल्या तीन वर्षांच्या काळात केव्हाही ग्राहकाला तरत्या व्याजदराचा पर्याय स्वीकारण्याची मुभा देण्यात येणार असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.
सुरुवातीलाच तरता व्याजदर निवडणाऱ्या नव्या गृहकर्ज ग्राहकांना विशेष दर आकारण्यात येणार आहे. या खास दराअंतर्गत ७५ लाखांपर्यंतच्या कर्जावर ८.५ टक्के दर आकारण्यात येणार आहे. पूर्वी हा दर ९.७५ टक्के होता, तसेच ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर ९.५० टक्के दर आकारण्यात येणार आहे. पूर्वी हा दर १०.२५ टक्के होता.


शॉपर्स स्टॉपने इटलीची सर्वात जुनी घडय़ाळांचे ब्रॅण्ड मोरेलातो टाइमच्या सहयोगाने आणलेल्या आकर्षक ऑफरच्या विजेत्या ग्राहकाला ९,००० रु. किमतीचे मोरेलातो घडय़ाळ भेट म्हणून प्रदान करताना मोरेलोतोचे भारतातील ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर अभिनेता नील नितीन मुकेश. ही ऑफर येत्या १९ जुलैपर्यंत शॉपर्स स्टॉपच्या मुंबईतल्या स्टोअर्स तसेच ६६६.२ँस्र्स्र्ी१२३स्र्.ूे या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.