Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

अग्रलेख

युद्धखोराची अखेर

 

रॉबर्ट स्ट्रेन्ज मॅकन्मारा. तीन दिवसांपूर्वी त्यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. भारतातल्या बहुतेक टीव्ही न्यूज चॅनल्सनी त्यांच्या निधनाची बातमीसुद्धा दिली नाही. एक-दोन इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी चार-दोन वाक्यात बातमी सांगितली आणि काही मोजक्या इंग्रजी दैनिकांत त्यांच्या मृत्यूची अल्पचरित्रासहित नोंद केली गेली. युरोप-अमेरिकेत मात्र मॅकन्मारांची बातमी, त्यांच्या सविस्तर चरित्रासहित आणि त्यांनी शीतयुद्धाचे स्वरूप कसे बदलले याबद्दलचे ऐतिहासिक संदर्भ देऊन (व दृश्य दाखवून)दिली गेली. विस्मरणात जाण्याइतका तो जुना इतिहास नाही. फक्त ४०-५० वर्षांपूर्वी मॅकन्मारा हे जागतिक रंगमंचावरचे एक खलनायक होते. अमेरिकेचे अध्यक्ष प्रथम लिंडन जॉन्सन आणि नंतर रिचर्ड निक्सन, त्यांचे सुरक्षा सल्लागार व पुढे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर आणि अर्थातच मॅकन्मारा यांच्या मांदियाळीत इतरही दीड-दोन डझन खलनायक होते. त्यांच्या टोळीचे प्रमुख जरी जॉन्सन निक्सन-किसिंजर असले, तरी मॅकन्मारा हे त्यांच्या रणनीतीचे मुख्य सल्लागार होते. या टोळीने मॅकन्मारांच्या नीतीला अनुसरून लक्षावधी माणसे ठार मारली आहेत. व्हिएतनाम युद्धात जे सुमारे ४० लाख व्हिएतनामी लोक मारले गेले आणि ज्या युद्धाचा विस्तार पुढे कंबोडिया आणि लाओसमध्ये झाल्यावर आणखी काही लाख लोकांची हत्या झाली, त्या सर्वाचे रक्त मॅकन्मारांच्या हातावरही होते. व्हिएतनाम युद्धात ५५ हजार अमेरिकन सैनिकही मारले गेले. जायबंदी वा अपंग झालेले आणि खेडी बेचिराख झाल्यामुळे देशोधडीला लागलेले वा निर्वासित झालेले कित्येकजण अजून जिवंत आहेत. त्या वेळी जी पाच-सात वर्षांची मुले होती ती आज पन्नाशीतली माणसे आहेत. त्या मुलांचे बरेच सवंगडी धुवांधार बॉम्बहल्ल्यात ठार झाले वा त्यांची गवताची घरे अमेरिकन सैनिकांनी जाळून टाकली तेव्हा त्यात जळून मेले. मॅकन्मारांच्या सुरक्षा मंत्रालयाच्या प्रशस्त केबिनमध्ये त्यांचे अधिकारी त्या बॉम्बहल्ल्यांची माहिती त्यांना सांगत असत. उत्तर व्हिएतनाममधील कम्युनिस्ट राजवट आणि दक्षिण व्हिएतनाममधील त्यांचे गनिमी सहकारी लवकरच पराभूत होतील, अशी खात्री मॅकन्मारा व त्यांच्या टोळीतील सर्वाना होती. परंतु युद्ध आटोक्यात येत नव्हते. व्हिएतनामकडे वायुदल नव्हते, अजस्त्र रणगाडे नव्हते, विध्वंसक बॉम्ब नव्हते, अत्याधुनिक मशीनगन्स व इतर शस्त्रास्त्रे नव्हती. मॅकन्मारांच्या सुरक्षा मंत्रालयातील संशोधन विभागानुसार अमेरिकेकडे ‘बी-५२’ जातीची अक्राळविक्राळ विमाने होती. ही विमाने अतिशय उंचावरून जातात, त्यांचा आवाजही खाली पोचत नाही आणि इतक्या उंचीवरून त्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांचा नेमही साधला जात नाही. परिणामी निमिषार्धात कित्येक खेडी, जंगले, डोंगर उद्ध्वस्त वा बेचिराख होतात. विमानातून हल्ले करणाऱ्यांच्या कॉम्प्युटरवर येतो तो नकाशा. त्या नकाशात अगोदर दिसणारा प्रदेश प्रत्यक्षात त्या नकाशातून, खाली असलेल्या माणसांसहित कसा पुसला जातो आहे, हेही त्यांना कळत नाही. मॅकन्मारांना वाटत असे की, अमेरिकेच्या इतक्या प्रचंड व सुसज्ज लष्कर व वायुदलाला कुणीही आव्हान देणे शक्य नाही. व्हिएतनामी शेतक ऱ्यांना आणि त्यांच्या सैन्याला व गनिमांना तर अजिबातच शक्य नाही. म्हणूनच इतका चिमुकला (आणि बव्हंशी नि:शस्त्र) देश कशाच्या जोरावर टिकून राहत होता आणि इतका प्रतिकार करीत होता हे त्यांना समजत नसे. मॅकन्मारांच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कॉम्प्युटर्सना जिद्द, स्वातंत्र्याची प्रेरणा, देशप्रेमाची भावना व त्यातून येणारी लढण्याची स्फूर्ती या गोष्टी व त्यांचे गणित मांडता येत नसे. या युद्धातून बाहेर पडायचे ते ‘जिंकूनच’, हा जॉन्सन निक्सन-किसींजर-मॅकन्मारा यांचा निर्धार होता. अमेरिका या युद्धात अडकत गेली ती स्वाईट आयझेनहॉवर यांच्या सिद्धांतामुळे. आयझेनहॉवर हे १९५३ ते १९६१ या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते. याच आठ वर्षांच्या कारकीर्दीत सोव्हिएत युनियनने आपले लष्करी व वायुदल मोठय़ा प्रमाणावर सज्ज केले होते. शिवाय १९४९ च्या अणुस्फोट चाचणीनंतर रशियाने अण्वस्त्रनिर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्याच वर्षी चीनमध्येही कम्युनिस्ट क्रांती झालेली असल्याने आता साम्यवाद व सामथ्र्य या दोन्हीच्या जोरावर जगभर कम्युनिझम प्रस्थापित करण्याचे स्वप्न सर्व देशातले कॉम्रेड्स पाहू लागले होते. दुसऱ्या महायुद्धामुळे खिळखिळ्या झालेल्या युरोपियन भांडवलशाहीला अमेरिकेचाच आधार वाटत असे. परंतु स्टॅलिनचा रशिया आणि माओंचा चीन एकत्र आल्यामुळे अमेरिकेने धसका घेतला होता. या पाश्र्वभूमीवर आयझेनहॉवर यांनी अशी मांडणी केली की, जगात कुठेही कम्युनिझम येणे हा अमेरिकेला धोका आहे. त्यामुळे जेथे जेथे कम्युनिस्ट चळवळ वा कम्युनिस्टांना सहानुभूती असणाऱ्या पक्षांची राजवट येत असेल, तेथे तेथे अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करायला हवा. आयझेहॉवर यांच्या या सिद्धांताचे नाव होते ‘डोमिनो थिअरी’. आयझेनहॉवर अध्यक्ष झाले त्याच वर्षी फ्रेंच साम्राज्यवाद्यांचा संपूर्ण पराभव व्हिएतनामी कम्युनिस्ट व राष्ट्रवादी पक्षांनी केला. व्हिएतनाम पण कम्युनिस्ट झाला तर चीनच्या पाठोपाठ उर्वरित आशिया पण ‘लाल’ होईल ही धास्ती अमेरिकेला वाटू लागली होती. म्हणून अमेरिकन प्रशासनाने व्हिएतनाममध्ये व इतरही हस्तक्षेप करण्याचे धोरण स्वीकारले. इराणमधली उदारमतवादी-लोकशाही सत्ता उलथवण्याचा कट त्याच धोरणाचा भाग होता. (ज्याबद्दल अलिकडेच अध्यक्ष ओबामांनी जाहीर खेद व्यक्त केला आहे.) त्यानंतर १९५९-६० साली क्यूबात गुप्तहेर व कमांडो पाठवून कॅस्ट्रोंचे बंड मोडून काढायची नीतीही त्याच धोरणाचा भाग होती. आयझेनहॉवर यांच्यानंतर १९६१ साली जॉन एफ. केनेडी अध्यक्ष झाले. त्यांनी त्याच नीतीला अनुसरून व्हिएतनाममध्ये एक ‘अभ्यास पथक’ पाठविले. व्हिएतनाममध्ये शक्यतो कम्युनिस्टविरोधी सरकार स्थापायला मदत करावी, असे धोरण अमलात आणायचे ठरले. पण त्या वेळच्या दक्षिण व्हिएतनाममध्ये असलेली राजवट कम्युनिस्टांना तोंड देऊ शकत नव्हती. केनेडी यांनी जी रणनीती आखली त्या नीतीचे प्रवर्तक म्हणून रॉबर्ट मॅकन्मारा ओळखले जातात. केनेडींच्या तीन वर्षांच्या कारकीर्दीत व्हिएतनाममध्ये हळूहळू सैन्य पाठविले जाऊ लागले. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. अखेरीस केनेडींनी तो नाद सोडून द्यायचे ठरविले. तेव्हा व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे फक्त १५ ते २० हजार सैनिक होते. केनेडी वैतागून म्हणाले की, ‘‘जे आपल्याला क्यूबात जमले नाही वा चीनमध्ये थोपवता आले नाही, ते व्हिएतनाममध्ये करण्याच्या फंदात पडण्यात अर्थ नाही. शेवटी तो प्रश्न व्हिएतनामी जनतेचा आहे, अमेरिकेचा नाही.’’ परंतु केनेडींनी त्यांचे धोरण अमलात आणण्याचे ठरविल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचा खून झाला. (जेएफके या ऑलिव्हर स्टोन यांच्या चित्रपटात हा संदर्भ प्रकर्षांने दाखविला आहे. असो.) केनेडींच्या जागी लिंडन जॉन्सन अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकीर्दीत व्हिएतनाम प्रकरणाची सर्व सूत्रे पूर्णपणे मॅकन्मारा यांच्याकडे सोपविली गेली. इतकी की, १९६३ ते १९६८ या काळात त्या युद्धाचे नाव ‘मॅकन्मारांचे युद्ध’ असेच मीडियाने ठेवले होते. मॅकन्माराही अभिमानाने सांगत की अमेरिकेचे लष्करी व वायुदलीय सामथ्र्य इतके प्रचंड आहे की, ‘विजय आता अगदी समीप आला आहे.’ प्रत्यक्षात मात्र अमेरिकेला सतत पराभावाला तोंड द्यावे लागत होते. केनेडींच्या काळात फक्त अभ्यासपथक गेले होते. आता साडेतीन लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक व्हिएतनामी लाल सेनेशी लढत होते. सुमारे ३८ हजार अमेरिकन सैनिक १९६८ पर्यंत त्या युद्धात मारले गेले होते. अखेरीस जॉन्सन आणि मॅकन्मारा दोघेही जेरीला आले. जॉन्सन यांच्या विरोधात अमेरिकेत सर्वत्र निदर्शने होऊ लागली. जॉन्सन यांनी १९६८ ची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी मार्टिन ल्यूथर किंग आणि केनेडींचे भाऊ रॉबर्ट केनेडी यांचीही हत्या झाली. ते दोघेही व्हिएतनाममधून अमेरिकन सैन्य मागे घ्यावे या मताचे होते. (त्यांची हत्या हा योगायोग नाही.) त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे रिचर्ड निक्सन अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी मॅकन्मारांचे धोरण किसींजर यांच्या मदतीने अधिक विस्तारले. व्हिएतनामला लाओस व कंबोडियातून मदत मिळते असे सांगून त्यांनी त्या देशांवरही हिंस्र बॉम्ब हल्ले सुरू केले. परंतु आता मॅकन्मारा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष केले गेले होते. जॉन्सन यांनी जाता जाता त्यांची त्या पदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर सुमारे १३ वर्षे मॅकन्मारा त्या पदावर होते. या काळात त्यांनी अमेरिकेच्या एकूण व्हिएतनाम धोरणावर अंतर्मुख होऊन विचार केला. अमेरिकेचे धोरण पूर्णत: चुकीचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्याच सूचनेवरून ‘पेंटॅगॉन पेपर्स’ हा गुप्त अहवाल तयार झाला होता. तो अहवाल ‘न्यूयॉर्क टाइम्स’ कडे डॅनिएल एस्सबर्ग यांनी गुप्तपणे पोचवला. एस्सबर्ग यांनी तो मॅकन्मारांसाठी रॅन्ड कॉर्पोरेशनच्या मार्फत बनविला होता. ते ‘पेपर्स’ न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्यावर अवघ्या अमेरिकेत प्रचंड खळबळ माजली आणि युद्धविरोधी व निक्सनविरोधी चळवळ देशभर पसरली. वॉटरगेट प्रकरण उद्भवले ते या पाश्र्वभूमीवर. अखेरीस अमेरिकेचा संपूर्ण पराभव होऊन व्हिएतनाम मुक्त झाला व उत्तर व दक्षिण असे विभाजन झालेला देश एक झाला. निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. मॅकन्मारा यांची युद्धनीती पूर्णपणे फसली होती. पुढे १९९५ साली त्यांनी आत्मचरित्र लिहिले आणि त्या घनघोर चुकीचा आपल्याला पश्चाताप होत असल्याचे म्हटले. पण तो पश्चाताप व्यर्थ होता. कारण मॅकन्मारांच्या युद्धनीतीमुळे ३५ ते ४० लाख व्हिएतनामी आणि ५५ लाख अमेरिकन मारले गेले होते. युद्धात जिची दोन्ही मुले मारली गेली होती, त्या आईने मॅकन्मारांच्या मृत्यूवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे. ‘‘या पश्चातापाने माझी मुले मला परत मिळणार नाहीत!’’ तिचे ते शब्द म्हणजे मॅकन्मारांचा epitaph आहे!