Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९


ए व्ह्यू फ्रॉम हेवन्स
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे म्हणजे जणू विहंगम अशी पाचूची बेटेच! परंतु सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ही बेटे पाण्याखाली जातात. म्हणूनच भविष्यात या विलोभनीय निसर्गसुंदर अशा लक्षद्वीप बेटांची विहंगम दृश्ये कायमस्वरूपी उपलब्ध व्हावीत या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी हेलिकॉप्टरमधून ही बेटे आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली असून त्या छायाचित्रांचे ‘लक्षद्वीप : ए व्ह्यू फ्रॉम हेवन्स’ पुस्तक तयार करण्यात आले आहे. सिद्धिशक्ती पब्लिकेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन व्हाइस अ‍ॅडमिरल सुनील दामले यांच्या हस्ते १० जुलै रोजी सदर्न नेव्हल कमांड, कोची येथे एका शानदार समारंभात करण्यात येणार आहे.

आजपासून नवीन स्पर्धक जोडय़ा
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘जोडी जमली रे’ कार्यक्रम आता चांगलाच लोकप्रिय झाला असून आज, गुरुवारी रात्री १० वाजता दाखविण्यात येणाऱ्या एपिसोडमध्ये जयेंद्र, रोहित, सोमनाथ, भक्ती, मीनल आणि योशिता असे सहा नवीन स्पर्धक सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालक जोडी अर्थात कविता मेढेकर-अतुल परचुरे सुरुवातीला स्पर्धक, पालक यांची ओळख करून देणार असून त्यानंतर स्पर्धकांच्या जोडय़ा जुळविण्याची अनोखी फेरी होईल.

 

यात स्पर्धक तरुणींना दिलेल्या विशेष क्रमांकावर स्पर्धक तरुण फोन करतील आणि ज्याचा फोन लागेल त्या मुलीशी त्या मुलाची जोडी जमविण्यात येईल. या फेरीनुसार जयेंद्र व भक्ती, रोहित व मीनल आणि सोमनाथ व योशिता अशा तीन स्पर्धक जोडय़ा गुरुवारच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतील. इंटरॅक्टिव्ह खेळांद्वारे ‘कम्पॅटिबिलिटी टेस्ट’द्वारे सर्वोत्तम अनुरूप जोडी निवडण्याच्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये गमतीदार खेळांबरोबरच लग्नाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर गंभीर चर्चा स्पर्धकांमध्ये होते. या भागात अपत्याबाबत स्पर्धक चर्चा करतील. मुलगा म्हणजे ‘वंशाचा दिवा’ ही विचारसरणी अजूनही आपल्या समाजात कायम आहे की शिक्षणाच्या प्रसारामुळे ती बदलली आहे याबद्दल स्पर्धक आपले विचार मांडतील.
प्रतिनिधी