Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

नानासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी हरितसृष्टीचा संकल्प
मुरुड-जंजिरा, ८ जुलै

 

बैठकीच्या माध्यमातून देश-विदेशात आपल्या निरुपणाने अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधीनता मिटविण्यासाठी अजरामर कार्य केलेले स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रथम स्मृतिदिनी श्री परिवाराने हरितसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प सुरू केला. नानासाहेबांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आप्पासाहेब व सचिनदादा धर्माधिकारी यांनी आज सकाळी स्वत: वृक्षारोपण करून या चळवळीचा शुभारंभ केला.
सृष्टीमधील सजिवांसाठी वृक्ष जीवनावश्यक आहेत. जगाचा समतोल वृक्षांच्या माध्यमातून राखला जातो. पूर्वी आपल्या पूर्वजांनी वृक्षांचे शास्त्रीय महत्त्व जाणले होते. आता या वसुंधरेला हरित करण्यासाठी प्रत्येक मानवाने स्वत:पासून प्रयत्न केले पाहिजेत, असे मनोगत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
वृक्ष लागवडीनंतर त्याचे संवर्धन अधिक महत्त्वाचे आहे, असे मत सचिनदादांनी मांडले. वृक्ष लागवडीचे अनेक कार्यक्रम होतात; त्यानंतर त्यांची निगा राखली जात नाही. आपण वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन होण्याकामी विशेष लक्ष राखावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री परिवाराच्या माध्यमातून १० लाख झाडे लावण्याचा संकल्प आज जाहीर झाला आहे.