Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मलेरियाच्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेला आली जाग
चिपळूण, ८ जुलै/ वार्ताहर

 

तालुक्यातील आकले गुरववाडी येथील शुभम पवार या बालकाच्या मृत्यूनंतर निद्रिस्त असलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अत्यवस्थ असलेल्या ३९ रुग्णांची प्रकृती सुधारली असून, त्यांना दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मयत शुभम याचे वडील सुदेश व आई सुरेखा यांच्यासह प्रिया सुर्वे व अरुणा कदम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनेसाठी आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर शुभमचा शनिवारी रात्री झोपेमध्येच दुर्दैवी मृत्यू झाला. गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला असल्याची शंका शुभमच्या कुटुंबियांसहित ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. त्यानुसार त्या गोळ्या देणे बंद करण्यात आले आहे. तसेच त्या गोळ्या व शवविच्छेदनाचा व्हिसेरा पुणे केमिकलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेने दसपटीचा संपूर्ण परिसर भीतीच्या छायेत आहे. तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव कांबळे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अन्य वैद्यकीय अधिकारी परिसरात दाखल झाले आहेत. आकले, नांदिवसे, कादवड, तिवरे या चार गावांमध्ये चार पथके नेमण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, मलेरिया आरोग्य सेवक, सहाय्यक यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे. ही पथके या गावांमध्ये तैनात करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत उपचार प्रक्रिया सुरू आहे. तसेच दुसऱ्या बॅचच्या गोळ्या सुरू करण्यात आल्या आहेत. नांदिवसे व आकले परिसरात फॉगिंग यंत्राद्वारे फवारणी करण्यात आली असून, तिवरे व कादवड येथे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.