Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

हेदवी समुद्रकिनारपट्टीवर राजरोसपणे वाळूचे उत्खनन
चिपळूण, ८ जुलै/ वार्ताहर

 

गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्रकिनारपट्टीवर वाळू उत्खनन राजरोसपणे सुरू असून, गावाच्या सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला धूप प्रतिबंधक बंधारा ढासळत चालला आहे. या बेकायदेशीर वाळू उत्खननाकडे येथील महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे.
हेदवी समुद्रकिनाऱ्यावरील भंडारवाडय़ामध्ये २० घरांची वस्ती आहे. येथे धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याअगोदर समुद्राच्या उधाणाचे पाणी भरत होते. त्यामुळे या वस्तीला धोका निर्माण झाला. बागायतींमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत होते. यामुळे १९८५ मध्ये या ठिकाणी ७०० मीटर लांबीचा बंधारा मंजूर करून बांधण्यात आला होता. याच गावच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याशेजारी वाळू उत्खनन मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे हा बंधारा ढासळत चालला आहे. येथून दररोज ८०० ते ९०० रुपये ब्रासने वाळू विक्री केली जात आहे. या बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर महसूल खात्याने कारवाई केल्याचे समजते. हे उत्खनन वारंवार होत असूनही महसूल खाते ठोस कारवाई का करीत नाही, असा सवाल केला जात आहे. कोसळत असलेल्या बंधाऱ्याजवळ वाळूचे ढीग उभारण्यात आले आहेत. तसेच शेजारी वाळू भरण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री ठेवण्यात आली आहे. याकडे महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.
हेदवी समुद्रकिनारपट्टीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननामुळे धूप प्रतिबंधक बंधारा ढासळू लागला आहे.