Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

‘त्या ’३८० रोजंदारांना सेवेत घेण्याचे आदेश
कोल्हापूर महापालिका
कोल्हापूर, ८ जुलै / विशेष प्रतिनिधी
पंधरा-वीस वर्षे महापालिकेच्या सेवेत रोजंदारी म्हणून काम करूनही महापालिकेने नोकरीतून कमी केल्यामुळे गेली ३ वर्षे आपल्यावरील अन्याय दूर होण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणाऱ्या ३८० रोजंदारांना बुधवारी राज्य शासनाने न्याय दिला. नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कक्षात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत मुश्रीफ यांनी संबंधितांना महापालिकेच्या सेवेत पूर्ववत रोजंदार म्हणून दाखल करून घेण्याचे आदेश दिले असून यामुळे रोजंदारांचा एक दीर्घकाळचा लढा संपुष्टात आला आहे.

सोनोग्राफी यंत्रांचा सुळसुळाट;
दहा वर्षात खटले फक्त १२०
कोल्हापूर, ८ जुलै / विशेष प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र वाजवीपेक्षा जास्त सोनोग्राफी यंत्राचा सुळसुळाट आणि पुरूषांच्या तुलनेत महिलांचे दर हजारी घसरलेले प्रमाण या पाश्र्र्वभूमीवर गेल्या दहा वर्षात गर्भजल परीक्षणाचे केवळ १२० खटले न्यायालयात दाखल झाले. या खटल्यांपैकी निकाल लागलेल्या २५ प्रकरणात केवळ ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना झालेली शिक्षा पाहता गर्भिलग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीच्या एका मोठय़ा प्रश्नाला समर्थपणे सामोरे जावे लागेल, असे आवाहन गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र तपासणी व सनियंत्रण समिती अध्यक्ष श्रीमती रजनी सातव यांनी येथे पत्रकार बैठकीत केले.

कोयनेत पावसाचा जोर मंदावला
सातारा, ८ जुलै / वार्ताहर

कोयना पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस पडत असला, तरी त्याचा जोर मंदावला आहे. बुधवारी दिवसभरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोयनेत २५, नवजात १९ वा महाबळेश्वरात ५२ मि. मी. एवढाच पाऊस झाला आहे. कोयना धरणात ३४.७९ टी.एम.सी (२०८५.२ फूट) पाणीसाठा असून पाण्याची पातळी ६३५.५५९ मीटर एवढी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणामध्ये ४२.८८ टीएमसी पाणी साठा होता. तर जूनपासून पाऊस १३५८ मि. मी. इतका झाला होता. तर आजपर्यंत पाऊस ५९४ मि. मी. एवढाच झाला आहे.

मुलानेच दिली बापाच्या खुनाची सुपारी
वर्षानंतर उलगडले गूढ
इस्लामपूर, ८ जुलै / वार्ताहर
मुलानेच आपल्या बापाच्या खुनाची सुपारी दिल्याने साखराळे (ता. वाळवा) येथील कुख्यात खुनी अभय जनार्दन सुतार याने पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील पंचावन्न वर्षीय गुंडोपंत काशिद यांचा खून केल्याचे तब्बल वर्षानंतर सांगलीच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांनी उघडकीस आणले आहे. सुतारला नुकतीच अटक करण्यात आली आहे. पोर्ल तर्फ ठाणे येथील गुंडोपंत काशिद हे व्यसनाधिन व बाहेरख्याली होते.

एका प्रभागात सहा उमेदवार, तर दुसऱ्यात सरळ लढत
कोल्हापूर पालिका पोटनिवडणूक
कोल्हापूर, ८ जुलै / प्रतिनिधी
महापालिकेच्या मीराबाग प्रभाग क्रमांक २३ या मतदारसंघातून सहाजणांनी, तर खरी कॉर्नर प्रभाग क्रमांक ५१ या मतदारसंघातून दोघाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पोटनिवडणुकीसाठी येत्या दिनांक २५ जुलै रोजी मतदान होणार आहे.मीराबाग येथील नगरसेवक उमेश कांदेकर यांचे निधन झाल्यामुळे आणि खरी कॉर्नर येथून निवडून गेलेले विजय साळोखे सरदार यांची निवड जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

सांगली जळीतकाडांतून वाचलेला जगन्नाथ आज होणार चतुर्भुज
पोलीस अधिकारी व गृहमंत्र्यांची उपस्थिती
दिगंबर शिंदे
मिरज, ८ जुलै

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आसंगी तुर्क येथे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य घडले. जमिनीच्या वादातून ४३ जणांच्या जमावाने एक कुटुंबच जाळून मारण्याचा केलेला प्रयत्न या जळीतकांडातून केवळ अन् केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलेला जगन्नाथ हा गुरुवार, दि. ९ जुलै रोजी चतुर्भुज होत आहे. वसंत ऋतूच्या आगमनावेळी उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाचा पोलिसांच्या मदतीने जगला वाचलेला वारसदार गृहस्थाश्रमात पदार्पण करीत असून, त्याला आशीर्वाद देण्यासाठी गृहमंत्री जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

पालिका कर्मचाऱ्यांचा संप महिनाभर स्थगित
इचलकरंजी, ८ जुलै / वार्ताहर
राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांबाबत येत्या महिन्याभरात ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले आहे. त्यामुळे नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केलेला कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप एक महिना पुढे ढकलला आहे अशी माहिती समितीचे राज्य अध्यक्ष सूर्याजी साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या पाश्र्र्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ, प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरपालिका संचालक आर.आर.जाधव आणि न.पा.कर्मचारी समन्वय समितीच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे पार पडली. प्रलंबित मागण्यांसदर्भात सविस्तर चर्चा झाली.

कोल्हापूरमध्ये नद्यांना पूर
कोल्हापूर, ८ जुलै / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्य़ातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरम्यान आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पावसाची नोंद राधानगरी येथे झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाँधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात सरासरी ४२.७७ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.राधानगरीत १७० मि.मी., शाहूवाडी ६८, करवीर १९, कागल ९, पन्हाळा ३०, हातकणंगले ४.४., शिरोळ ७, गगनबावडा ८८, भुदरगड १६, गडिहग्लज १४, आजरा ३१ आणि चंदगड ५६ मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे.

बँकेचे खोटे हमीपत्र देणाऱ्या करमाळ्याच्या ११ जणांवर गुन्हा
सोलापूर, ८ जुलै/प्रतिनिधी

शासनाकडून अर्थसाह्य़ मिळविण्यासाठी बँक ऑफ बडोदा अकलूज शाखेचे बनावट हमीपत्र दाखल केल्याबद्दल करमाळा येथील माऊली मागासवर्गीय औद्योगिक संस्थचे संस्थापक रोहिदास रामचंद्र शिंदे यांच्यासह अकराजणांविरूध्द विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ मारुती गायकवाड यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदली आहे. अनुसूचित जाती उपाययोजनांतर्गत कातडी वस्तू तयार करण्याच्या प्रकल्पाकरिता शासनाकडून अर्थसाह्य़ मिळविण्यासाठी बँक ऑफ बडोदा अकलूज शाखेतील हमीपत्र समाजकल्याण खात्यास सदर बाराजणांनी सादर केले. कागदपत्रांच्या पडताळणीत बँकेशी संपर्क साधला असता कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी माऊली मागासवर्गीय औद्योगिक संस्थेचे संस्थापक रोहिदास रामचंद्र शिंदे, पुष्पा ऊर्फ मनाली रामचंद्र शिंदे, श्रीधर मुरलीधर गायकवाड, भारत तुकाराम दामोदर, लक्ष्मण दिगंबर शिंदे, गणेश तुकाराम काळे, ज्योती ऊर्फ ताई गणेश काळे, एकनाथ नारायण भोसले, दत्तात्रेय विठोबा कानगुडे, नितीन अभिमन्यू कांबळे आणि प्रदीप पांडुरंग ढावरे (रा. सर्व करमाळा) यांच्याविरूध्द विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ गायकवाड यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदली असून पोलीस उपनिरीक्षक भंडारे हे तपास करीत आहेत.

युद्धानंतर शहीद जवानांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष - पित्रे
कोल्हापूर, ८ जुलै / प्रतिनिधी
युध्द सुरू झाले की त्याच्या बातम्या आवर्जून वाचल्या जातात. युध्द संपल्यानंतर मात्र शहिद जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे समाज दुर्लक्ष करतो याबद्दल कर्नल अरविंद पित्रे यांनी येथे बोलताना खंत व्यक्त केली. अक्षरदालन आणि निर्धार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास शहिद जवान आणि अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.अरविंद पित्रे यांनी नकाशाच्या साहाय्याने कारगिल युध्द कसे घडले आणि ते आपण कसेजिंकले याबद्दलची अतिशय रोमहर्षक माहिती दिली. भारतीय जवान जीवावर उदार होऊन देशासाठी काय करू शकतो हे कारगिल युध्दातून प्रत्ययास येते. पण युध्दानंतरही शहिदांच्या कुटुंबीयांकडे समाजाने दुर्लक्ष करू नये असे त्यांनी आवाहन केले.या कार्यक्रमाच्यावेळी शहिद अभिजित सूर्यवंशी यांच्या मातु:श्रींच्या हस्ते दत्ता धर्माधिकारी यांच्या लष्करविषयक लिखाण व चिन्हे या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. २००१ मध्ये उधमपूर भागात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले राजेश नायर यांच्या सासू सविता दोंडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अमृतसर येथे शहिद झालेले लेफ्ट.भूषण परब यांचे वडील अशोक परब यांनीही आपण आपला शहिद मुलगा भूषण परब याच्या नावाने ट्रस्ट चालवून गरजूंना मदत करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी रवींद्र जोशी यांनी आभार मानले.

सोलापुरातील प्रश्नध्यापकांचे सामुदायिक रजा आंदोलन यशस्वी
सोलापूर, ८ जुलै/प्रतिनिधी
सेट-नेट बाधित प्रश्नध्यापकांचे प्रश्न निकालात काढून त्यांना न्याय द्यावा, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रश्नध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या आदेशाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणीच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयांतील प्रश्नध्यापकांच्या सामुदायिक रजा आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती सोलापूर/शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) जिल्हा शाखाध्यक्ष प्रश्न. भारत जाधव आणि सरचिटणीस प्रश्न. अशोक साळुंकेयांनी दिली. राज्यातील सरकारच्या उदासीनतेमुळे आणि नोकरशाहीच्या उद्दामपणामुळे प्रश्नध्यापकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले. यापूर्वी शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच २२ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करून आंदोलनाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांकडे सादर केला. आंदोलनाची शासनाने गंभीर दखल न घेतल्याने प्रश्नध्यापकांना सामुदायिक आंदोलन करावे लागले. याबाबतही दखल न घेतल्यास येत्या १४ जुलैपासून राज्यातील प्रश्नध्यापक बेमुदत संपावर जाणार असल्याचे प्रश्न. जाधव व प्रश्न. साळुंके यांनी सांगितले.

मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
सांगली, ८ जुलै / प्रतिनिधी
आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी नगरसेवकांना मंजूर झालेली कामे ताबडतोब पूर्ण करावीत, असे आदेश महापालिकेतील सत्ताधारी गटाचे गटनेते सुरेश आवटी यांनी आढावा बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना दिले. आवटी यांनी एकप्रकारे महाआघाडीच्या सर्व नगरसेवकांना रिचार्जच केले आहे. सुरेश आवटी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. विविध प्रभागात मंजूर असलेल्या विकासकामांचा आढावा आवटी यांनी घेतला. मंजूर कामांच्या निविदा तात्काळ प्रसिध्द करण्याचे आदेश त्यांनी दिले. पावसाळा असल्याने विशेष करून नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष वेधत पाणीपुरवठा व ड्रेनेज स्वच्छता वेळोवेळी करून घ्यावी, अशी सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केली. प्रभाग समितीत रिक्त असणाऱ्या जागांवरती कर्मचारी पुरविण्याचे आश्वासन आवटी यांनी दिले. ठेकेदारांची बिले काढा व सुरू असलेली कामे पूर्ण करण्यावर भर द्या, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस उपमहापौर शेखर इनामदार, स्थायीचे सभापती हरिदास पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती सुमन कदम, मागासवर्गीय सभापती बिरेंद्र थोरात, प्रभाग समितीच्या सभापती आशा शिंदे यांच्यासह सभापती व अधिकारी उपस्थित होते.

आटपाडी वकील संघटना अध्यक्षपदी अनिल पाठक
आटपाडी, ८ जुलै / वार्ताहर

आटपाडी तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अनिल सुधाकर पाठक, तर उपाध्यक्षपदी विनोद शंकरराव दाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत संघटनेची कार्यकारिणीही निश्चित करण्यात आली. त्यात सचिवपदी पी. डी. जेडगे व सहसचिवपदी श्रीमती शैलजा राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांनी संघटनेपुढील प्रश्न सोडविण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. या बैठकीस विनायक लाळे, रामराव देशमुख, सी. पी. शेलार, रवींद्र कुलकर्णी, व्ही. बी. पाटील, राम इनामदार, प्रकाश शिंदे व अन्य सदस्य उपस्थित होते.

वाईच्या शिंदे महिला महाविद्यालयात एम.बी.ए. अभ्यासक्रम सुरू
वाई, ८ जुलै/वार्ताहर

भीमराव शिंदे महिला महाविद्यालयात एम.बी.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी दिली.डी. एस. शिक्षण संस्थेच्या वतीने पाचगणी येथे इंग्रजी माध्यमाची ब्ल्यू मिंगडेल स्कूल ही निवासी शाळा सुरू आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील वर्षापासून येथे विज्ञान ते वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय सुरू आहे. वाई येथे ब्लू मिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले असून येथेही प्ले ग्रुप ते ९ वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. मागील शैक्षणिक वर्षापासून वाई येथे भीमराव शिंदे महिला महाविद्यालय सुरू करण्यात आले. या वर्षापासून येथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.बी.ए. स्टडी सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेचे संचालक अमेरिकास्थित अशोकराव जोशी यांच्या प्रयत्नातून लोक कम्युनिटी कॉलेज येथे (अमेरिका) या संस्थेचे विविध कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.

बाळासाहेब देसाई कारखान्याचा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता जमा
कराड, ८ जुलै / वार्ताहर
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन केले असून, अडीच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी कार्यक्षेत्रातील शेतक ऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे पाठवून हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले.कारखान्याच्या मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब जाधव, माजी अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के, कार्यकारी संचालक व्ही. ए. देसाई यांच्यासह संचालक मंडळ व सभासद या वेळी उपस्थित होते.डॉ. दिलीप चव्हाण पुढे म्हणाले, की कारखान्याने या वर्षी प्रतिटनास १२०० रुपये याप्रमाणे पहिला हप्ता दिला असून, २०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आला आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. व्यवस्थापनाने सुयोग्य नियोजन केले आहे, असे सांगतानाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालून सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

सोलापुरात १४२ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती
सोलापूर, ८ जुलै/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्य़ातील १४२ प्रश्नथमिक शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली असून त्यात १३४ खुल्या तर ८ आरक्षित संवर्गातील शिक्षकांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसांत संबंधित शिक्षकांना पदोन्नतीचे आदेश प्रश्नप्त होतील, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रदीप मोरे यांनी सोलापूर जिल्हा प्रश्नथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्य़ात १९५ शाळांवर मुख्याध्यापकपदाच्या जागा रिक्त होत्या. यापूर्वी शिक्षक संघाच्या वतीने प्रश्नथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक या पदांवर बढत्या देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा केला असता त्यात अखेर यश आले. शिक्षणाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात भरले यांच्यासह सरचिटणीस संभाजी फुले, बाळासाहेब काशीद, लिंबराज जाधव, रब्बीलाल मुल्ला, राजकुमार बिज्जरगी, बा. दा. मुल्ला आदींचा समावेश होता.

मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन
माळशिरस, ८ जुलै/वार्ताहर
आमदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुका जनसेवा संघटनेच्या वतीने तालुक्यातील ४२ गावांत मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. तालुका जनसेवा संघटनेबरोबरच मानव कल्याण सेवाभावी संस्था मुंबई व के. के. आय. हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. तालुक्यातील मोटेवाडी, पळस मंडळ, चव्हाणवाडी, बांगर्डे, दहिगाव, पिरळे कळंबोली, एकशीव, मांडवे, गिरवी, लोंढे मोहितेवाडी, फडतरी, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी, हनुमानवाडी, इस्लामपूर, कण्हेर, माणकी, तोंडले, बोंडले, दसूर, खुळेवाडी, तामसीरवाडी, कदमवाडी, सार्कडवाडी, धर्मपुरी, पिंपरी, कारुंडे, कोयळे, पिलीव, बचेरी, शिंगोर्णी, भांबुर्डी, जाधववाडी, गिरझणी, मेडद, तांबेवाडी, कुरबावी, फोंडशिरस, नातेपुते, सदाशिवनगर या गावांमध्ये श्री. शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबिरार्थीना मोफत शस्त्रक्रियेबरोबरच प्रवास, जेवण, औषधे, चष्मे देण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने महिलांना साडी व पुरुषांना धोतर मोफत देण्यात आले. शिबिरात एकूण १० हजार ५५४ रुग्णांनी सहभाग नोंदवल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष विवेक गवळी यांनी दिली.

स्वाभिमान रोजगार मार्गदर्शिकेचे प्रकाशन
सांगली, ८ जुलै / प्रतिनिधी
आजची तरुण पिढी उद्याच्या प्रगतशील भारताचा खरा आधारस्तंभ असून त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती व निश्चयाला दिशा देण्यासाठी ‘स्वाभिमान’ संघटनेच्या ‘स्वाभिमान करीअर व रोजगार मार्गदर्शिका’ पुस्तकाची निश्चितच मोलाची मदत होईल, असे मत ‘स्वाभिमान’ संघटनेचे राज्याचे प्रमुख संघटक सम्राट महाडिक यांनी व्यक्त केले.युवा पिढीला मार्गदर्शक ठरणाऱ्या स्वाभिमान करीअर व रोजगार मार्गदर्शिका पुस्तकाची पहिली आवृत्ती सम्राट महाडिक यांच्या हस्ते विलिंग्डन महाविद्यालयाचे प्रश्नचार्य यांना देण्यात आली. त्यावेळी सम्राट महाडिक बोलत होते. यावेळी महापालिका क्षेत्र अध्यक्ष सचिन जाधव, संदीप माने, रितेश अग्रवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रश्नरंभी सचिन जाधव यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले, तर संदीप माने यांनी आभार मानले.

कस्तुरबाई वालचंद कॉलेजचा आजपासून सुवर्णमहोत्सव
सांगली, ८ जुलै / प्रतिनिधी
येथील लठ्ठे एज्युकेशन संस्थेचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय ५० व्या वर्षात पदार्पण करीत असून त्यानिमित्त आयोजित सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचा प्रश्नरंभ गुरूवार दि. ९ जुलै रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर सुरेश पाटील यांनी दिली.या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री अजित पवार व गृहमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विद्यापीठ गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मैनुद्दीन बागवान, संस्थेचे मानद सचिव प्रश्नचार्य व्ही. टी. चौगुले, खजिनदार अ‍ॅड. विजयकुमार सकळे व माजी आमदार प्रश्न. शरद पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

सोलापुरात आराध्ये स्मृत्यर्थ कुमार गंधर्व संगीत महोत्सव
सोलापूर, ८ जुलै/प्रतिनिधी

येथील हिराचंद नेमचंद वाचनालय आणि सृजन सांस्कृतिक या संस्थांच्या वतीने कै. नानासाहेब आराध्ये यांच्या स्मृत्यर्थ येत्या १० जुलै रोजी पं. कुमार गंधर्व संगीत महोत्सव आयोजिला आहे.
हि. ने. वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर येथे १० रोजी सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवात पंडित कुमार गंधर्व आणि विदुषी वसुंधरा कोमकली यांची कन्या कलापिनी कोमकली यांची शास्त्रीय संगीताची मैफल आयोजिल्याची माहिती जयंत आराध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचे डेका अ‍ॅनिमेशन व ईशानी हर्बल हे प्रश्नयोजक आहेत. येत्या १० जुलैला या संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प कलापिनी कोमकली यांच्या गायनाने गुंफले जाणार आहे. गेल्या काही वर्षापासून खंडित झालेला हा संगीत महोत्सव पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे श्री. आराध्ये यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जयंत राळेरासकर, दत्ता गायकवाड, सुनील गुरव, प्रदीप आराध्ये, अमोल चाफळकर हे उपस्थित होते.