Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

तलाव अद्याप तहानलेलेच!
मुंबई, ८ जुलै /प्रतिनिधी
मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळीही दमदार बरसणे सुरुच ठेवल्याने मुंबईच्या विविध भागात पाणीही साचले. त्यामुळे मुंबईची रेल्वे, रस्ता वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. दुपारी एकच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुन्हा एकदा ‘२६ जुलै २००५’ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुदैवाने सकाळी साडेदहानंतर पावसाचा जोर ओसरला आणि साचलेल्या पाण्याबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातील भीतीचाही निचरा झाला.

मुंबईकरांसाठी आता समुद्राचे पाणी गोडे करणार
मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी

पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तालावांच्या क्षेत्राकडे गेले २० दिवस पूर्ण पाठ फिरविल्याने मुंबईकरांच्या तोंडचे अक्षरश पाणी पळाले आहे. या अवाढव्य शहराला आता रिकामे करण्याची वेळ येऊ शकते, असे अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे. या पाश्र्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आयत्यावेळचा विषय म्हणून मुंबईसाठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. असा समुद्राच्या पाण्याचा पुरवठा सध्या चेन्नई शहराला करण्यात येतो.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव
* नामकरणांमध्ये काका-पुतण्यांचा पुढाकार!
* शिवसेनेचा पुन्हा विरोध

मुंबई, ८ जुलै / खास प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूस राजीव गांधी यांचे नाव देण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केल्याने त्याची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली असतानाच पवारांचे पुतणे अजितदादा पवार यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मांडला. अर्थात नामकरणासाठी पवार काका-पुतण्याने मांडलेले दोन्ही प्रस्ताव लगेचच मंजूरही झाले.

निवासी डॉक्टरांच्या मनमानी संपाने रुग्ण त्रस्त!
मुंबई, ८ जुलै/खास प्रतिनिधी

निवासी डॉक्टरांनी ऐन पावसाळ्यात पुकारलेल्या बेमुदत संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच जे.जे.सह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून नवीन रुग्णांना भरती करणे बंद करावे लागत आहे. दिल्लीच्या एम्स तसेच टाटा रुग्णालयात मिळणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे ३५ ते ४० हजार रुपये वेतन मिळण्याची मागणी ही निव्वळ ‘दादागिरी’ असल्याचे मत वैद्यकीय वर्तुळातच व्यक्त करण्यात येत आहे.

शाळांमधील शुल्कवाढीला तात्पुरती मान्यता!
१० ऑगस्टला हायकोर्टात अंतिम निर्णय

मुंबई, ८ जुलै /खास प्रतिनिधी

९०-१० कोटाप्रकरणी न्यायालयीन लढाईत नापास ठरलेल्या राज्य शासनाच्या विरोधात आता आंतरराष्ट्रीय, केंद्रीय मंडळांबरोबरच राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांनीही दंड थोपटले आहेत. या शाळांमधील शुल्कवाढ रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, वाढीव शुल्काच्या ‘वसुली’स तात्पुरती मान्यताही मिळविण्यात आली आहे!

मायकेल जॅक्सनला कोटय़वधी चाहत्यांचा अखेरचा निरोप
लॉसएन्जेलिस, ८ जुलै/ पीटीआय
प्रसारमाध्यमांचा आजवरचा सर्वात मोठा ‘इव्हेंट’ असे वर्णन करता येईल अशा भव्यदिव्य कार्यक्रमात ‘पॉप संगीताचा बादशहा’ मायकेल जॅक्सनला त्याचे हजारो चाहते, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी येथील स्टॅपल्स सेंटरवर अखेरचा निरोप दिला. जगभरातील कोटय़वधी लोकांनी थेट प्रक्षेपणाद्वारे हा कार्यक्रम पाहिला. त्यात नेल्सन मंडेलांपासून सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू मॅजिक जॉनसन शिवाय संगीत क्षेत्रातील बडय़ा हस्तींचा समावेश होता. जॅक्सनच्या कुटुंबीयांमध्ये त्याचे आई-वडील, आठ लहान आणि तीन तरुण मुले होती. हे सर्वजण मायकेलचे पार्थिव ठेवलेल्या शवपेटीसमोरच पहिल्या रांगेत होते. स्टॅपल्स सेंटरवर झालेल्या या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या जॅक्सनच्या कोटय़ावधी चाहत्यांमधून ११ हजार ‘भाग्यवान ’ चाहत्यांची ‘लकी ड्रॉ’ मधून निवड करण्यात आली. उर्वरित लाखो चाहत्यांनी टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्क, नेव्हरलॅन्ड रान्च, गॅरी, इंडियाना, प्लॅनेट हॉलिवूड आणि लॉसएन्जेलिस येथे लावण्यात आलेल्या मोठमोठय़ा पडद्यांवरून थेट प्रक्षेपित होत असलेले प्रक्षेपण पाहून जॅक्सनच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याची इच्छा पूर्ण केली. नेल्सन मंडेला आणि डायना रॉस यांच्याकडून आलेले शोकसंदेश वाचून दाखवल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. मायकेलची मोठी बहीण जर्माईन जॅक्सननेही या वेळी आपल्या लहान भावाच्या आठवणी सांगितल्या. प्रिन्स मायकेल (१२), पॅरिस कॅथरिन (११) आणि प्रिन्स मायकेल -दुसरा (ब्लॅंकेट)(७) ही जॅक्सनची मुलेही या वेळी स्टेजवर आली.

शाही इमाम मौलाना बुखारी यांचे निधन
नवी दिल्ली, ८ जुलै/पी.टी.आय.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले येथील जामा मशिदीचे माजी इमाम मौलाना सय्यद अब्दुल्ला बुखारी यांचे बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मौलाना सईद अब्दुल्ला बुखारी हे या ऐतिहासिक मशिदीचे १२ वे शाही इमाम होते. सध्याचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांचे ते वडिल होत. राजस्थानच्या संभारमध्ये त्यांचा जन्म झाला होता व दिल्लीतील दरस-ए-निजामी या मदरशामध्ये त्यांचे धार्मिक शिक्षण झाले होते. त्यांच्या पश्चात चार पुत्र आणि दोन कन्या असा परिवार असून १९४६ मध्येच ते या मशिदीचे उप शाही इमाम झाले होते. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी बुखारी यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे.

‘दादा’ची नवी इनिंग क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष होणार ?
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या सौरव गांगुलीला आता क्रिकेट प्रशासकाच्या नवीन भूमिकेत शिरण्याची इच्छा आहे. पाच वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद पूर्व विभागाला मिळणार असून, त्या वेळी या पदावर गांगुली विराजमान झाल्यास आश्चर्य वाटू नये. आज ३७ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गांगुलीने आपण क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी प्रशासकाची नवी इनिंग सुरू करून त्याच खेळाशी निगडित राहण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. बंगालमध्ये क्रिकेटविषयक गुणवत्ता विपुल असून, त्याची काळजी घेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे, असे देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या गांगुलीने म्हटले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनमधील जगमोहन दालमियांची सद्दी संपविण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी त्या दृष्टिकोनातून आतापासूनच मोर्चेबांधणी करायला प्रारंभ केला आहे.
(सविस्तर वृत्त )

 


महाराष्ट्राचा आखाडा संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी वरील इमेजवर क्लिक करा, त्याचप्रमाणे या बातम्यांवरील आपली प्रतिक्रिया ऑनलाईन नोंदविण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

 

प्रत्येक शुक्रवारी