Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

उस्मानाबाद जिल्हा बँकेवर दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व
विरोधकांचा धुव्वा

उस्मानाबाद, ८ जुलै/वार्ताहर
जिल्ह्य़ाच्या सहकार क्षेत्रात विरोधी पक्षाला फारशी किंमत नसल्याचे सिद्ध करीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. संचालक पदाच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेसच्या शेतकरी विकास आघाडीने यश मिळविले. बँक बचाव आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील वगळता विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. जिल्हा बँकेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ व काँग्रेसचे ५ सदस्य निवडून आले आहेत.

मराठवाडय़ात सर्वदूर दमदार पाऊस
बीड, ८ जुलै/वार्ताहर

तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर पावसाने काल मध्यरात्रीपासून सर्वदूर हजेरी लावली. तीन तालुक्यांत मध्यरात्रीनंतर जोराचा पाऊस झाला, तर बुधवारी सायंकाळी तासभर बीडसह इतर ठिकाणी पावसाने जोराची हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या तयारीला लागला आहे, तर प्रथमच रस्ते व नाल्यातून पाणी वाहिले.बीड जिल्ह्य़ात या वर्षी मृगनक्षत्र सुरू होवून तब्बल महिन्याचा कालावधी लोटला. कधी तुरळक तर कधी हलक्या स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत राहिले.

‘त्या’ ग्रेडर्सच्या संपत्तीवर ‘टाच’ येणार!
ओल्या कापसाची खरेदी
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
गेल्या वर्षी पणन महासंघाच्या माध्यमातून नाफेडने खरेदी केलेल्या १५ लाख टन कापसापैकी बराच कापूस ओला खरेदी झाल्याचे उघड असताना त्यांच्यावर केवळ निलंबनाची व काहींवर बडतर्फीची कारवाई झाली. मात्र आता महामंडळाने त्याच्याही पुढे जाऊन झालेल्या नुकसानीची भरपाई त्या ग्रेडर्सच्या संपत्तीवर टाच आणून करण्याची तयारी चालू आहे.

आधी स्थलांतर,मग उद्घाटन
नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय सात महिन्यांपूर्वीच सुरु; १४ रोजी उद्घाटन
नांदेड, ८ जुलै/वार्ताहर
सुमारे सात महिन्यांपूर्वी कार्यान्वित झालेल्या टोलेजंग पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन १४ जुलैला करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकार म्हणजे संसार सुरू झाल्यानंतर जाहीर विवाह करण्यासारखा होय, असे मानले जाते. नांदेडसारख्या सर्वाधिक गुन्हे घडणाऱ्या जिल्ह्य़ात सुसज्ज पोलीस अधीक्षक कार्यालय असावे या हेतूने तत्कालीन पोलीस प्रमुख फत्तेसिंह पाटील यांनी प्रयत्न केले होते.

डॉक्टरांचा मूक मोर्चा
‘मार्ड’च्या संपाचा पहिल्या दिवशी परिणाम नाही
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी

वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टर्सनी अचानक पुकारलेल्या संपाच्या पहिल्या दिवशी येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला नसला तरी संप पुढे सुरूच राहिल्यास पूर्वानुभव लक्षात घेता रुग्णव्यवस्था ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान संपादरम्यान निवासी डॉक्टर्सच्या मार्ड या संघटनेच्या वतीने आज रुग्णालयाच्या परिसरात मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे रुग्णालयाच्या प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले.

औरंगाबाद मनपाच्या ‘ड’ आणि ‘इ’, तर
नांदेड मनपाच्या वजिराबाद प्रभागाला पारितोषिक
संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

औरंगाबाद, ८ जुलै/खास प्रतिनिधी

संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाच्या दुसऱ्या फेरीमध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ‘इ’ला चार लाख रुपये, तर नांदेड-वाघाळा महापालिकेच्या शिवाजीनगर प्रभागाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका प्रभाग क्र. ‘ड’ व नांदेड-वाघाळा महापालिकेच्या वजिराबाद प्रभागाला प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.

धर्माबादचे ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
बिलोली, ८ जुलै/वार्ताहर
धर्माबाद येथे ५५ लाख रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधून एक वर्ष पूर्ण झाले, पण अद्यापि या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. उद्घाटनाचा मुहूर्त कधी लागेल, याचीच सर्वाना प्रतीक्षा लागून आहे. धर्माबाद येथील जुन्या शासकीय रुग्णालयात कोणत्याही सुविधा नसल्याने नवीन रुग्णालय बांधकामाला मान्यता मिळाली. त्यासाठी ५५ लाखांचा निधीही मंजूर झाला. सात एकर जमिनीत २००६ पासून बांधकामास सुरुवात झाली. गेल्या वर्षी हे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीत पाणी व विजेची व्यवस्था करण्यात आली, रुग्णालयात तीन वॉर्ड असून प्रत्येकाचा वेगळा विभाग आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, सामान्य विभाग, शौचालयाची व्यवस्थाही आहे. पण सोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि अतिगंभीर रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या यंत्रणेची सोय व्हावी, विंचू, सर्पदंशावर उपचार व्हावा, बालरोगतज्ज्ञ नियुक्त करावा व या इमारतीचे तातडीने उद्घाटन व्हावे आणि रुग्णांच्या सेवेत रुजू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

शिक्षकांअभावी विद्यार्थी दुसऱ्या गावांतील शाळेत दाखल
सोयगाव, ८ जुलै/वार्ताहर

जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षकांची रिक्त पदे अजूनही न भरल्याने पालकांनी आपली मुले परजिल्ह्य़ात पाठवायला सुरुवात केली आहे. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात असलेल्या उणिवा पालकांना नेहमीचा त्रासदायक ठरल्या आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकाची रिक्त पदे न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ७ ते ८ वर्षांपासून माध्यमिक शाळेला मुख्याध्यापक नाही. सहा वर्षांपासून रिक्त असलेली क्रीडा शिक्षकाची जागा आता भरली आहे. गणित, चित्रकला, हस्तकला विषयाला शिक्षक नाही. लिपिकाची बदली झाली आहे, शिपायाची जागा रिक्त आहे. विद्यार्थ्यांना प्यायला शाळेत पाणी नाही. प्राथमिक विभागात सुदैवाने शिक्षकांची संख्या पुरेशी आहे. मात्र शाळा धोकादायक झाली आहे. वर्गातील भिंतीला तडे गेले, स्लॅबलाही चिरा पडल्या. कन्या शाळेच्या सर्व वर्गात दुर्गंधी येत असल्याने नाक मुठीत ठेवूनच शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेणयासाठीही विद्यार्थी परजिल्ह्य़ातील शेंदुर्णी येथे जाऊ लागले आहेत.

छायाचित्रकार संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
अंबाजोगाई, ८ जुलै/वार्ताहर

शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत प्रत्येक विद्यालयातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अंबाजोगाई छायाचित्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत बर्दापूरकर, संघटनेचे अध्यक्ष विनायक सोळुंके, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव विनय परदेशी यांची उपस्थिती होती. या वेळी खोलेश्वर विद्यालयाचा राघव जोशी, गोदावरी कुंकुलोळची प्रीती लहाने, सेंट अ‍ॅन्थोनीची विदुला पाठक, मिल्लियाची आफशा सय्यद, योगेश्वरी नूतन विद्यालयाचा योगेश राऊत, नेताजीची सोनल कत्राळे, वेणुताईची पूनम सादुळे, ज्ञानेश्वरी पांचाळ, लक्ष्मी गुट्टे, सोनाली करपे, गौरी छत्रबंद आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्ममाचे सूत्रसंचालन अभय खोगरे यांनी तर प्रास्ताविक नागेश औताडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक कचरे यांनी मानले.

‘खासदार आवळे यांचे वक्तव्य लोकशाहीविरोधी’
लातूर, ८ जुलै/वार्ताहर

खासदार जयवंत आवळे यांनी आपल्या लातूर दौऱ्यात ज्या गावांनी मला लोकसभा निवडणुकीत आघाडी दिली त्याच गावांना विकास निधी देऊ असे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य लोकशाहीविरोधी असल्याचे मत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बळवंत जाधव यांनी व्यक्त केले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. जाधव यांनी म्हटले आहे की, लोकशाहीत निवडणुका या अटळ असतात. निवडणुकीत मत कोणाला द्यायचे याचे स्वातंत्र्य घटनेने प्रत्येकाला दिलेले आहे. या पाश्र्वभूमीवर खासदार जयवंत आवळे यांचे विधान लोकशाहीला काळीमा फासणारे आहे. लातूरच्या राजकीय संस्कृतीत सत्ताधारी किंवा विरोधकांनी असे वक्तव्य कधीही केले नाही किंवा तशी वर्तणूकही दिलेली नाही. खासदार संपूर्ण मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असतो याचाच आवळे यांना विसर पडलेला दिसतो. ज्या गावात आवळे यांना मते मिळाली नाहीत किंवा आघाडी मिळाली नाही त्या गावांना विकास निधी नाही असे विधान करणे म्हणजे निव्वळ पोरकटपणाचे लक्षण आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

महापालिकेत म्युनिसिपल कामगार सेनेची स्थापना
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
औरंगाबाद महानगरपालिकेत आज म्युनिसिपल कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. पालिकेत गेल्या २० वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता असून येथे कामगारांची अधिकृत संघटना स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी संजय साबळे यांची निवड करण्यात आली आहे. एन. बी. वाघ हे सचिव तर जी. एन. तुपे कार्याध्यक्ष, कृष्णा पाटील कोषाध्यक्ष तर अण्णा साळवे हे उपाध्यक्ष म्हणून कार्यकारिणीवर आहेत. प्रदीप जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली १९२ सदस्यांनी ही संघटना गठीत केली असल्याचे संघटनेच्या वतीने आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुरुवातीला फक्त महापालिका एवढेच संघटनेचे कार्यक्षेत्र असून जैस्वाल यांच्या आदेशानुसार सिडकोतही संघटना लक्ष घालेन, असे श्री. साबळे यांनी सांगितले. संघटनेच्या स्थापनेनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आरसीएच योजनेचे कर्मचारी पालिकेच्या आस्थापनेवर
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
२००५ वर्षी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या महिला व बाल संगोपन (आर.सी.एच.) या योजनेतील सर्व कर्मचाऱ्यांना आता पालिकेच्या आस्थापनेवर घेण्यात आले आहे. या योजनेत ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण ४० कर्मचारी होते. आतापर्यंत या सर्वाना मानधन देण्यात येत होते. आता शासकीय अटी, शर्तीनुसार पालिकेकडून त्यांना वेतन तसेच अन्य भत्ते मिळणार आहेत.
पहिल्या वर्षी या योजनेसाठी सर्व खर्च शासनाकडून करण्यात आला. पुढच्या वर्षी ७५ टक्के, नंतर ५० आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के खर्च शासनाने केला होता. त्यानंतर या सर्वाना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, असे शासनाने योजना सुरू करतानाच म्हटले होते. त्यानुसार या सर्वाना पालिकेच्या आस्थापनेवर घेण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला होता.

कुटुंबनियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आज सत्कार
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणारी दाम्पत्ये आणि या शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचा उद्या (गुरुवार) जागतिक लोकसंख्या दिनी पालिकेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. दाम्पत्य आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी पालिकेच्या वतीने आज देण्यात आलेली नाही. ही नावे उद्या ऐनवेळी जाहीर करण्यात येणार आहे.
दुपारी बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास महापौर विजया रहाटकर, उपमहापौर भाऊसाहेब वाघ, स्थायी समितीचे सभापती अब्दुल साजेद, सभागृह नेते गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते संजय जगताप, विजय खुडे, उद्धव घुगे, मारोतीराव कांबळे, डॉ. श्रीकृष्ण देगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर उपस्थित राहणार आहेत.

पोलिसात तक्रार दिली म्हणून पत्नीला बेदम मारहाण
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
पोलिसात तक्रार तसेच न्यायालयात दावा केला म्हणून पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी प्रकाश मोगल गायकवाड आणि त्याच्या बहिणीविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. जयश्री गायकवाड (वय २४, रा. साईशक्तीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाद झाल्याने त्यांनी पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. तसेच त्यांनी कौटुंबिक न्यायालयातही धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मंगळवारी सकाळी त्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. तेथेच प्रकाश आणि त्याची बहीण शोभा यांनी त्यांना गाठले. आमच्या विरोधात तक्रार करते, न्यायालयात जाते, असे म्हणत प्रकाशने त्यांच्या डोक्यात दगड घातला तसेच तुझे डोळेच फोडतो, असे म्हणत गालावर स्क्रू ड्रावरने गालावर वार केले. शोभाने लाथाबुक्क्य़ाने मारहाण केली. पोलिसांनी गायकवाड बहीण-भावंडाविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद केली आहे.

विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकारीपदी संजय शिंदे
औरंगाबाद, ८ जुलै/खास प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून संजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपला कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. संजय शिंदे यांनी लोकमत, सकाळ आणि दै. लोकाशा या वर्तमानपत्रात काम केले आहे. बीडच्या वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी डॉ. सरदारसिंग बैनाडे यांच्याकडून संजय शिंदे यांनी पदभार स्वीकारला. कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कुलसचिव डॉ. दीपक मुळे, सुवर्णमहोत्सवी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. भाऊसाहेब राजळे, वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी संजय शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

‘तुळजापूर लोहमार्गानी जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा’
तुळजापूर, ८ जुलै/वार्ताहर
वर्धा-नांदेड, बीड-परळी या सारख्या मराठवाडय़ातील लोहमार्गाबरोबरच तुळजामातेचे क्षेत्र तुळजापूर लोहमार्गानी जोडण्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे शिफारस करावी व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी तुळजापूर, सोलापूरवासीयांकडून होत आहे. जिल्ह्य़ाचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ाचे ठिकाण लोहमार्गाने जोडण्यासाठी प्रारंभी तुळजापूर लोहमार्गाची मागणी लावून धरली. उस्मानाबादला लोहमार्ग आणण्यात पाटील यशस्वी झाले पण त्यांना तुळजामातेच्या क्षेत्राचा विसर पडला. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत फक्त लातूरवरच लक्ष केंद्रित केले आणि तुळजापूरकरांना वटाण्याच्या अक्षदा दिल्याचे स्पष्ट झाले.

रागाच्या भरात शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
औरंगाबाद, ८ जुलै/प्रतिनिधी
वडील रागावल्यामुळे १६ वर्षांच्या शालेय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. शमा अब्दुल रऊफ (रा. शहाबाजार) असे या मुलीचे नाव आहे. मंगळवारी रात्री तिचे वडील तिच्यावर रागावले होते. त्यानंतर ती झोपण्यासाठी गेली. रागाच्या भरात तिने विष घेतल्याचे रात्री ११ वाजता लक्षात आले. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

डॉ. यु. म. पठाण यांना कुसुमताई चव्हाण पुरस्कार
औरंगाबाद, ८ जुलै/खास प्रतिनिधी

पहिल्या विश्व संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांना मराठी साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल कुसुमताई चव्हाण स्मृतिजीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात १४ जुलै रोजी होणार आहे. डॉ. पठाण हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.

धान्य घोटाळ्यातील आणखी एका आरोपीस अटक
जिंतूर, ८ जुलै/वार्ताहर
शासकीय गोदामातून सहा हजार क्विंटल धान्याचा अपहार केल्याप्रकरणी पांडुरंग ढगे या आरोपीला पोलिसांनी आज अटक केली. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली असून या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फराऱी आहे. या प्रकरणातील फरारी असलेल्या बाबाराव खापरे या आरोपीचे जिल्हा सत्रन्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यावर औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्वसाठी धाव घेतली आहे. याशिवाय तौफीख पहेलवान व लोखंडे हेही आरोपी फरारी आहे.

परभणीत आज औषधनिर्मात्यांचे धरणे
परभणी, ८ जुलै/वार्ताहर

आरोग्य सेवेतील ‘क’ गटाच्या औषधनिर्मात्यांना शासनाने सहाव्या वेतन आयोगात अन्यायकारक वेतनश्रेणी दिल्याच्या निषेधार्थ सर्व शासकीय औषधनिर्माते गुरुवारी सामूहिक रजेवर जाणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाच्या आरोग्य सेवेतील औषध निर्माता हे पद महत्त्वाचे असून औषध निर्मात्यांना निम्न स्वरूपाची वेतनश्रेणी देऊन त्यांच्यावर मोठय़ा प्रमाणावर अन्याय करण्यात आला आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने उद्या सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परभणी जिल्हा बँकेत चोरीचा प्रयत्न
गंगाखेड, ८ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील राणीसावरगाव येथील परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत काल रात्री इमारतीचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली. राणीसावरगाव बँकेचे शाखा व्यवस्थापक अशोक पवार यांनी पिंपळदरी पोलीस ठाण्यात आज दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ७ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी बँकेचे शटर तोडून आतामध्ये प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला. मात्र तिजोरी मजबूत असल्याने ती चोरटय़ांना फोडता आली नाही. शेवटी चोरांनी पोबारा केला.

धारूरच्या उपनगराध्यक्षपद निवडीचे घोंगडे भिजत
धारूर, ८ जुलै/वार्ताहर
नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले तरी अद्यापि उपनगराध्यक्षाची निवड करण्यात आलेली नाही. उपनगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच चालू असल्यामुळे निवडीचे घोंगडे भिजत पडले आहे. नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोदावरी सिरसट यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीला २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापि उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली नाही. उपाध्यक्षपदा-साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यशवंत गायके व काँग्रेसचे नगरसेवक अवेज कुरेशी या दोघांची नावे चर्चेत आहेत. या दोघांमध्येच या पदासाठी रस्सीखेच चालू आहे. काँग्रेसचे अवेज कुरेशी यांच्याकडे पूर्वी अडीच वर्षे उपाध्यक्षपद होते. पुन्ही त्यांनी उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे.

‘जपानी नागरिकांची उत्कट देशभक्ती अनुकरणीय’
परभणी, ८ जुलै/वार्ताहर
जेनेसिस जपान इस्ट एशिया नेटवर्क ऑफ एक्स्चेंज फॉर स्टुडंट्स अ‍ॅण्ड युथ्स या कार्यक्रमात देवेन गोपाळ पहिनकर याने जपानचा दौरा केला. नवी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या जपानी भाषेतील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय ठरल्यामुळे देवेनला जपान सरकार व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन सेंटर यांच्याकडून या दौऱ्यासाठी बोलविण्यात आले होते. जपानी लोकांची कष्ट करण्याची वृत्ती, त्यांचे निसर्गप्रेम, आदर्श आदरातिथ्य आणि उत्कट देशभक्ती अनुकरणीय होती, अशी प्रतिक्रिया देवेन याने व्यक्त केली. परभणी येथील बालविद्यामंदिर येथे शालेय शिक्षण घेऊन देवेनने पुणे विद्यापीठातून इंग्रजी वाङ्मयाची पदव्युत्तर पदवी तर इंडो जपानोज् असोसिएशनची जपानी भाषेतील पदवी संपादन केली आहे.

दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पंचनामा
सोयगाव, ८ जुलै/वार्ताहर
शहरातील पंचायत समिती भूमी अभिलेख कृषी या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचारी दांडी मारून गैरहजर होते. तेव्हा तहसीलच्या दक्षता पथकांनी त्यांच्या कार्यालयात जावून पंचनामा केला. शहरातील अनेक शासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने नागरिक त्रस्त होते. लोकशाही दिनी अनेक नागरिकांनी ही तक्रार तहसीलदारांकडे केली. तहसीलदारांनी दक्षता पथकाला भूमी अमिलेख, कृषी व पंचायत समिती कार्यालयाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. या पथकाने या तीनही कार्यालयातील हजेरीपत्रकाची पाहणी केली असता नऊ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असल्याचे आढळले. या घटनेचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला.

आता संगणकीकृत सातबारा
कळंब, ८ जुलै/वार्ताहर
तालुक्याच्या ठिकाणी ज्या महसुली गावाच्या तलाठय़ांची कार्यालये आहेत अशा गावांचे हस्तलिखित सातबाराचे वितरण लवकरच बंद होणार आहे. अशा गावांमध्ये संगणकीकृत सातबाराचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील सर्व सुमारे २११ लाख सातबाराची नोंद करुन संगणकीकृत गाव नमुना क्र.,सातबाराची विक्री, वितरण करण्यात येत आहे. सर्व ३५८ तालुक्यांच्या ठिकाणाहून संगणकीकृत सातबाराचे वितरण होत आहे. अंमलबजावणीचा पहिला टप्पा म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ज्या महसुली गावाच्या तलाठय़ांची कार्यालये आहेत अशा गावांचे हस्तलिखित सातबाराचे वितरण लवकरच बंद होणार आहे. अशा गावांमध्ये संगणकीकृत सातबाराचा वापर अनिवार्य करण्यात आला आता आता लवकरच शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा मिळणार आहे.

रिपब्लिकन पक्षाची निदर्शने
बीड,८ जुलै/वार्ताहर
फुले पिंपळगाव येथील सदाशिव साळवे खूनप्रकरणी रिपब्लिकन पक्षाने मराठवाडय़ात तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे दलित-सवर्ण वादातून सदाशिव साळवे यांचा खून झाला. या प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या सूचनेवरून संपूर्ण मराठवाडय़ात या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. माजलगाव येथे तालुकाध्यक्ष विजय साळवे, आष्टी येथे राजू निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली तर परळीत जिल्हा उपाध्यक्ष माधव ताटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

होमिओपॅथीच्या प्रबंधावर कार्यशाळा
बीड, ८ जुलै/वार्ताहर
राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा पसरविण्याचे काम होमिओपॅथी डॉक्टर करीत असल्याने या पॅथीला राजाश्रय मिळावा अशी मागणी करून (कै) केशरबाई क्षीरसागर यांनी करुन राज्यात होमिओपॅथीला मोठी मदत केली असे मत परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. रामजी सिंग यांनी व्यक्त केले.सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी महाविद्याल-याच्या वतीने विद्यार्थ्यांनी प्रबंध कसा लिहावा या विषयावर कार्यशाळा नुकतीच झाली. या वेळी होमिओपॅथी परिषदेचे डॉ. के. के. कार, डॉ. रामजी सिंग व डॉ. महेंद्रसिंग यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, प्राचार्य डॉ. अरुण भस्मे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. अरुण भस्मे यांनी केले

तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मान्यता
उदगीर, ८ जुलै/वार्ताहर
गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाला नव्यानेच राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची मान्यता मिळाली आहे. उदगीरचे श्यामलाल अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद पडले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बापुराव राठोड यांनी गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून राजीव गांधी तंत्रनिकेतनची मान्यता मिळवली. या तंत्रनिकेतन महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग (६० जागा), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (६० जागा), इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन (६० जागा), सिव्हील इंजिनीयरिंग (६० जागा) व मेकॅनिकल इंजिनीयरिंग (६० जागा) उपलब्ध राहणार आहेत. या शैक्षणिक वर्षांपासून राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याचे श्री. राठोड यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

नोटरीपदी उत्तम कांगठीकर
बिलोली, ८ जुलै/वार्ताहर
तालुक्यातील कांगठी येथील रहिवासी व बिलोली न्यायालयातील सरकारी वकील उत्तम कांगठीकर यांची नायगाव येथील न्यायालयात नोटरीपदी राज्य सरकारतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल कांगठीकर यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांचे आभार मानले आहेत.

बेंडके व सातपुते सेवानिवृत्त
वसमत, ८ जुलै/वार्ताहर
हु. बहिर्जी स्मारक विद्यालयातील क्रीडा शिक्षक व्ही. डी. बेंडके व कला शिक्षक एल. एम. सातपुते नुकतेच सेवानिवृत्त झाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व सवरेदयी नेते गंगाप्रसाद अग्रवाल, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल. एम. टेकाळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. एन. जाधव आदींच्या हस्ते चांदीचा रथ, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

गुणवंतांचा रविवारी सत्कार
लातूर, ८ जुलै/वार्ताहर
जिल्हा ब्राह्मण सेवा संघातर्फे दहावीत ९० टक्के व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात रविवारी (१२ जुलै) सकाळी १० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

शिक्षकांचा १४ जुलैला संप
लोहा, ८ जुलै/वार्ताहर
सहाव्या वेतन आयोग शिक्षकांना केंद्राप्रमाणे जशाच्या तसा लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्य माध्यमिक महामंडळाच्या वतीने १२ शिक्षक संघटनेने १४ जुलैला एक दिवसीय संपाची हाक दिली आहे. या संपात तालुक्यातील सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघटनेचे रंगनाथ भुजबळ, बी. डी. जाधव, दामोदर वडजे, ऋषिकेश जोगदंड यांनी केले आहे.

प्रभारी तहसीलदारपदी सारूक
धारूर, ८ जुलै/वार्ताहर

पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार ए. बी. सारूक यांच्याकडे काल प्रभारी तहसीलदारपदाचा सूत्रे देण्यात आली. येथील तहसीलदार अनिता भालेराव १५ जूनपासून रजेवर गेल्यामुळे हे पद ोल्या वीस दिवसांपासून रिक्त होते.