Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव
* नामकरणांमध्ये काका-पुतण्यांचा पुढाकार!
* शिवसेनेचा पुन्हा विरोध
मुंबई, ८ जुलै / खास प्रतिनिधी

 

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूस राजीव गांधी यांचे नाव देण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केल्याने त्याची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटली असतानाच पवारांचे पुतणे अजितदादा पवार यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मांडला. अर्थात नामकरणासाठी पवार काका-पुतण्याने मांडलेले दोन्ही प्रस्ताव लगेचच मंजूरही झाले.
सुमारे दहा वर्षांंपूर्वी वाहतुकीला खुल्या झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजितदादा पवार यांनी ऐनवेळचा विषय म्हणून मांडला व सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. या नामकरणाचा विषय कार्यक्रम पत्रिकेत नव्हता. मात्र अजित पवार यांनी नामकरणाचा प्रस्ताव मांडताच सर्वांनी त्याला पाठिंबा दिला. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पु. ल. देशपांडे यांचे नाव द्यावे, अशी सूचना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेली दहा वर्षे या मार्गाचे नामकरण करण्यात आले नव्हते.
‘राजीव गांधी सागरी सेतू’, असे नामकरण करण्याचा आदेश आजच जारी करण्यात आला. योगायोग म्हणजे आजच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे नामकरण पवार काका-पुतण्यांच्या पुढाकाराने झाले असले तरी त्यामुळे नवीन वादास तोंड फुटले आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी करून शिवसेना-भाजपने राजीव गांधी यांचे नाव देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. पु. ल. देशपांडे यांच्याऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गास यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिल्याबद्दलही शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईतील कोणत्याही पुलांना नाव देऊ नये, अशी भूमिका तत्कालीन बांधकाममंत्री नितीन गडकरी व राज्य रस्ते विकास मंडळाने सुरुवातीला घेतली होती. यामुळे प्रारंभी कोणत्याच पुलांचे नामकरण करण्यात आले नव्हते. नंतर मात्र धोरणात बदल करण्यात आला. युतीची सत्ता असताना प्रियदर्शनी पुलाला जैन स्वामींचे नाव देण्यात आले. त्यानंतर पवई येथील पुलासाठी लार्सन अॅंण्ड टुब्रो कंपनीने जागा दिल्याने या पुलाला कंपनीचे नाव देण्यात आले. जे. जे. उड्डाण पुलाचे सुफी संत मकदूम अली माहिमी, असे नामकरण करण्यात आले आहे. आता वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांचे नामकरण करण्यात आले आहे.