Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तलाव अद्याप तहानलेलेच!
मुंबई, ८ जुलै /प्रतिनिधी

 

मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळीही दमदार बरसणे सुरुच ठेवल्याने मुंबईच्या विविध भागात पाणीही साचले. त्यामुळे मुंबईची रेल्वे, रस्ता वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. दुपारी एकच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुन्हा एकदा ‘२६ जुलै २००५’ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुदैवाने सकाळी साडेदहानंतर पावसाचा जोर ओसरला आणि साचलेल्या पाण्याबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातील भीतीचाही निचरा झाला. मात्र या पावसाने मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले.
मुसळधार पावसामुळे मुंबईत दोन ठिकाणी घराचे छत पडल्याच्या घटना घडल्या, मात्र त्यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. येत्या २४ तासांत शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळने व्यक्त केली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांत मात्र अद्यापही पाऊस रुसलेला आहे. दरम्यान तलावांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठय़ावर महापालिकेने काही र्निबध लादले आहेत.
गेल्या २४ तासात तलावांच्या क्षेत्रात तुरळक पाऊस कोसळला. मोडकसागर क्षेत्रात १७, तानसा येथे १० तुलसी २१, अप्पर वैतरणा ६, भातसा ३ तर विहारच्या क्षेत्रात २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी भातसा २९.३८ टक्के, मोडकसागर २२.०९ टक्के, तानसा ३.८७ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.
दररोज किमान १०० दशलक्ष लिटर पाणी वापरणाऱ्यांवर र्निबध आणण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. प्रत्येक विभागातील हॉटेल्स, जलतरण तलावांचे पाणी कमी करण्याचे आदेश आज सर्व विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले. याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणारआहे. दरम्यान, गरज पडल्यास समुद्राच्या पाण्यावर प्रक्रीया करण्याची आमची तयारी आहे, असे आज स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी सांगितले. पालिकेने पाणी जपून वापरण्यासाठी अनेक उपाय सुरू केले आहेत.