Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

निवासी डॉक्टरांच्या मनमानी संपाने रुग्ण त्रस्त!
मुंबई, ८ जुलै/खास प्रतिनिधी

 

निवासी डॉक्टरांनी ऐन पावसाळ्यात पुकारलेल्या बेमुदत संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या केईएम, नायर, शीव तसेच जे.जे.सह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून नवीन रुग्णांना भरती करणे बंद करावे लागत आहे. दिल्लीच्या एम्स तसेच टाटा रुग्णालयात मिळणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे ३५ ते ४० हजार रुपये वेतन मिळण्याची मागणी ही निव्वळ ‘दादागिरी’ असल्याचे मत वैद्यकीय वर्तुळातच व्यक्त करण्यात येत आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थी डॉक्टरांना त्यांच्या मागणीप्रमाणे वेतन द्यावयाचे झाल्यास त्यांना शिकविणाऱ्या अध्यापकांना मिळणाऱ्या वेतनापेक्षा ते जास्त होईल, असे वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
रुग्णांना वेठीस धरून मार्डच्या निवासी डॉक्टरांनी सुरू केलेला संप हा बेकायदा असून तो मोडून काढण्यासाठी उद्या मंत्रालयात अर्थमंत्री, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील पदव्युत्तर जागांपैकी ५० टक्के जागा या केंद्रीय पातळीवर भरण्यात येत असून मार्डची मागणी मान्य करायची झाल्यास ६० कोटी रुपयांचा बोजा शासनावर पडणार आहे. आठ तास काम करण्याची मागणीही अयोग्य असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले. राज्यातील निवासी डॉक्टरांना सध्या १५,७७१ रुपये ते १८,८३७ रुपये पाठय़वेतन मिळते. दोन वर्षांपूर्वीच निवासी डॉक्टरांना ही वाढ देण्यात आली होती. सीईटी देऊन स्वेच्छेने पदव्युत्तर शिक्षणासाठी निवासी डॉक्टर म्हणून दाखल होताना कोणताही संप करता येणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही या डॉक्टरांना द्यावे लागत असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
दिल्ली, पॉँडिचेरी, हरयाणा तसेच टाटा रुग्णालयातील पाठय़वेतनाप्रमाणे वेतन मिळावे असे निवेदन प्रसारमाध्यमांकडे देताना जाणीवपूर्वक या ठिकाणी पदव्युत्तर जागा किती आहेत तसेच अन्य राज्यांमध्ये किती पाठय़वेतन मिळते याची माहिती देण्याचे टाळले आहे. मध्य प्रदेश, बंगाल, पंजाब, केरळ, आंध्र प्रदेश तसेच गुजरातसह देशातील १५ हून अधिक राज्यांमध्ये १२ हजार ते २४ हजार रुपये पाठय़वेतन मिळते. या निवासी डॉक्टरांना जास्त पाठय़वेतन हवे होते तर त्यांनी दिल्ली, दिल्लीतील एम्स अथवा टाटा रुग्णालयात प्रवेश का घेतला नाही, देशातील कोणत्याही राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांपेक्षा महाराष्ट्रात मिळणारा रुग्णसेवेचा अनुभव व शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळेच येथे प्राधान्याने प्रवेश घेतला जातो, असे केईएममधील एका ज्येष्ठ प्राध्यापकाने सांगितले. या डॉक्टरांना महाराष्ट्रातील त्यातही मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जो अनुभव मिळतो त्या जोरावर ते जगात कोठेही यशस्वीपणे उभे राहू शकतात. मात्र एकदा प्रवेश घेतला की हेच निवासी डॉक्टर रुग्णांना वेठीस धरून संप करतात. या निवासी डॉक्टरांना दोन ते तीन हजार रुपये वाढ देण्याची तयारी शासनाची आहे मात्र संप मागे घेईपर्यंत त्यांच्याशी बोलणी करू नये, अशी भूमिका अधिष्ठाते तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आहे.