Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईकरांसाठी आता समुद्राचे पाणी गोडे करणार
मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी

 

पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तालावांच्या क्षेत्राकडे गेले २० दिवस पूर्ण पाठ फिरविल्याने मुंबईकरांच्या तोंडचे अक्षरश पाणी पळाले आहे. या अवाढव्य शहराला आता रिकामे करण्याची वेळ येऊ शकते, असे अनेक ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे. या पाश्र्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आयत्यावेळचा विषय म्हणून मुंबईसाठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. असा समुद्राच्या पाण्याचा पुरवठा सध्या चेन्नई शहराला करण्यात येतो. त्याचा खर्च प्रत्येक लिटरमागे ४.५ पैसे येत असल्याची माहिती मुंबईचे पालक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबई शहराला असा पाणी पुरवठा करायचा झाल्यास नक्की किती खर्च येईल, त्यात कोणती यंत्रणा बसवावी लागेल, वगैरे वगैरे बाबींचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या मुंबई शहराला पाण्यासाठी नाशिक-इगतपुरी भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. शिवाय, या महानगराला पाणी पुरवठादेखील १४० किलोमीटर अंतरावरून करावा लागतो. मुंबई तसेच राज्यातील इतर भागांनीही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता पाण्याचे निक्षारीकरण करून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अग्रक्रमाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. असा प्रकल्प राबविण्याचे नक्की झाले व तो अस्तित्वात आला तर मुंबईच्या तलाव क्षेत्रातील पाण्याचा बहुतांश भाग तलाव क्षेत्राच्या जवळच्या शेतीसाठीही उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे या बाबत सरकार अत्यंत गांभीर्याने विचार करीत असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.