Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

प्रादेशिक

अखेर ‘मुंबई स्टाइल’ पावसाची सलामी!
मुंबई, ८ जुलै /प्रतिनिधी

मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळीही दमदार बरसणे सुरुच ठेवल्याने मुंबईच्या विविध भागात पाणीही साचले. त्यामुळे मुंबईची रेल्वे, रस्ता वाहतूक विस्कळीत झाली. मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. दुपारी एकच्या सुमारास मोठी भरती असल्याने पुन्हा एकदा ‘२६ जुलै २००५’ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र सुदैवाने सकाळी साडेदहानंतर पावसाचा जोर ओसरला आणि साचलेल्या पाण्याबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनातील भीतीचाही निचरा झाला. मात्र या पावसाने मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले.

तलाव क्षेत्रात पाऊस रुसलेलाच!
बुधवारी रात्रीपासून आणि आज सकाळी शहर व उपनगर परिसरात जोरदार पाऊस कोसळला असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांत मात्र अद्यापही पाऊस रुसलेला आहे. दरम्यान तलावांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठय़ावर महापालिकेने काही र्निबध लादले आहेत. तसेच समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते उपयोगात आणण्याची तयारीही दाखवली आहे.

भारतीय विद्यार्थ्यांवर वंशद्वेषी हल्ले नव्हे, त्यांची लूटमार झाली!
ऑस्ट्रेलियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची सारवासारव

मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियामध्ये नजिकच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांवर वंशद्वेषी वृत्तीतून हल्ले चढविण्यात आल्याचा आरोपाचा ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी कॉलिन वॉल्टर्स यांनी आज इन्कार केला. भारतीय विद्यार्थ्यांची लुटमार करण्याऱ्या चोरटय़ांनी त्यांना मारहाण केल्याचे बहुतांश प्रकरणात सिध्द आले आहे असेही वॉल्टर्स यांनी सांगितले.

ऊर्जा विभागाचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पडून; महावितरण’ ६०० कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत!
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत जादा दराने वीज खरेदी करण्यासाठी ‘महावितरण’ कंपनीने खर्च केलेल्या ६०० कोटी रुपयांची परतफेड राज्य सरकार कोणत्या पद्धतीने करू शकते त्याबाबतचा प्रस्ताव ऊर्जा खात्याने दहा दिवसांपूर्वी पाठविलेला असतानाही त्या प्रस्तावावर अर्थखात्याने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने ‘महावितरण’ला हा भरुदड सोसावा लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

..आणि न्यायालय परिसरही जलमय झाला
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी

रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आज आर्थर रोड येथील विशेष न्यायालय परिसर जलमय झाला होता. त्यामुळे खटल्याची सुनावणीही उशिरा सुरू होऊन लवकर संपविण्यात आली. पावसामुळे आजच्या सुनावणीवर परिणाम झालेला असतानाही मुंबईतील
पाण्याची समस्या पाहता पाऊस पडणे खूप गरजेचे आहे व यापुढेही असाच पाऊस पडत राहावा, असे सांगत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी नागरी समस्यांबाबतची आपली संवेदनशीलता व्यक्त केली.

‘मी मराठी’वर स्वामी समर्थावरील मालिका
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी

श्री स्वामी समर्थ हे दत्तमहाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार मानले जातात. त्यांच्या भक्तांपैकी कोणाला ते विठ्ठलाच्या रूपात दिसले तर कोणाला विष्णूच्या रूपात त्यांचे दर्शन घडले. महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. अक्कलकोट स्वामींच्या या अगाध लीलांचे महात्म्य दाखविणारी ‘कृपासिंधू, भिऊ नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे’ ही नवीन मालिका ‘मी मराठी’ वाहिनीवर सुरू होत आहे. भक्तांना आलेल्या अनुभवांवर आधारित या मलिकेचे प्रस्तुतीतकरण ‘अश्वगंधा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे असून निर्मिती सुनील राणे यांची आहे तर दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन तळपदे यांनी सांभाळली आहे. या मालिकेची पटकथा आणि संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. ‘मी मराठी’ वाहिनीवर दर गुरुवारी ९ वाजता ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे.

राणेंच्या माजी सचिवाच्या घरी चोरी करणारा नोकर गजाआड
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी

राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे माजी स्वीय सचिव रवी कामत (४१) यांच्या घरातून ९६ लाख रुपयांची चोरी करून पोबारा करणारा त्यांचा नोकर सचिन बीडये याला चेंबूर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली. सचिनने एका साथीदाराच्या मदतीने सोमवारी कामत यांच्या घरातून चोरी केली होती. कामत चेंबूर येथील ‘साई सिद्धी’ इमारतीतील घरी एकटे राहतात. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी ९६ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग कपाटात ठेवली होती. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या सचिनला ही बाब माहीत होती. कामत कपाटाच्या चाव्या उशीखाली ठेवून झोपतात हे माहीत असल्याने त्याचा फायदा उठवत सचिनने कामत यांच्या घरातून रोख ९६ लाख रुपये लुटून नेले होते. घटना घडल्यापासून सचिन बेपत्ता झाल्याने तसेच सचिनने आपल्या एका साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याचे इमारतीच्या पहारेकऱ्यानेही चौकशीत सांगितल्याने सचिनवर पोलिसांना पहिल्यापासून संशय होता. त्या दृष्टीने तपास करून पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारासह कोल्हापूर येथून अटक केली. त्या दोघांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

९०:१० कोटा : सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ मंगळवारी ‘शाळा बंद!’
शिक्षक संघटनांचा संपही त्याच दिवशी
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी
अकरावी प्रवेशामध्ये ९०:१० कोटा लागू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यास नकार देणाऱ्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भूमिकेविरोधात शिक्षक व पालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या १४ जुलै रोजी शाळा बंद करण्याचा निर्णय या विविध संघटनांनी घेतला आहे. मात्र, यापूर्वीच १४ जुलै रोजी शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी संप पुकारला असताना त्याच दिवशी शाळा बंद आंदोलन करण्याचा उद्देश काय, असे विचारले असता आंदोलनकर्त्यां संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. शिक्षक भारतीच्या परळ येथील कार्यालयात काल आमदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे नेते प. म. राऊत, अविनाश तांबे, पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा अरूंधती चव्हाण, पालक विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते. ९०:१० कोटा रद्द झाला असला तरी एसएससीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’चे सूत्र लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मालाडच्या ‘सासू-सून हत्याकांडा’ची उकल
नोकरासह तिघांना अटक
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी
मे महिन्यात मालाड येथे सासू-सुनेच्या झालेल्या निर्घृण हत्येची उकल करण्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-११च्या अधिकाऱ्यांना यश आले असून याप्रकरणी नोकरासह तिघांना अटक करण्यात आली आहे. निरंजन राजभर (३१), ओमप्रकाश राजभर (३०) आणि दिलीपकुमार राजभर अशी आरोपींची नावे आहेत. २९ मे रोजी मालाड (प.) येथील लिबर्टी गार्डनजवळ असलेल्या कुंज इमारतीत रेवा संघवी (७९) आणि त्यांच्या सुनेचा गळा चिरून तसेच डोक्यात खलबत्त्याने घाव घालून हत्या करण्यात आली होती. तसेच घरातील सव्वा लाख रुपयांचे दागिने लुटल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्याकडे पाच वर्षे काम करणारा नोकर निरंजन राजभर त्याचदरम्यान बेपत्ता झाल्याचेही पुढे आले. त्यामुळे त्यानेच हत्याकांड घडविले असावे, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी निरंजनच्या घरी चौकशी केली असता तो ओमप्रकाश आणि दिलीप या नातेवाईकांसह बिहारला गेल्याचे कळले. तिघांनीच हे हत्याकांड घडवून आणल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करून मुंबईला आणले.

अमिताभ बच्चनला पुन्हा पोटदुखीचा त्रास
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी

अमिताभ बच्चनला पुन्हा एकदा पोटदुखीने सतावले आहे. गेल्या वर्षी त्याच्या वाढदिवशी त्याला या वेदनेने ग्रासले होते. अमिताभ बच्चन लंडनहून मंगळवारी परत आला. तो तिथून निघतानाच त्याला हा त्रास जाणवला होता. त्याने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, रात्री उशीरा भारतात परत आल्यावर लगेचच डॉक्टरकडे गेलो. त्यावेळी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. आज सकाळी सीटी स्कॅनही केले. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. असे असले तरी पोटदुखी मात्र थांबलेली नाही. अमिताभला कामानिमित्त मुंबईबाहेर जायचे होते. परंतु प्रकृती पूर्णपणे बरी होत नाही, योग्य वैद्यकीय उपचार सुरू होत नाही, तोपर्यंत त्याने मुंबईबाहेर जाणे पुढे ढकलले आहे. अमिताभला अजूनही काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पार्ले-टिळकच्या मैदानात इमारत बांधण्यास पालकांचा विरोध
मुंबई, ८ जुलै / प्रतिनिधी
पार्ले-टिळक मराठी शाळेच्या मैदानात इमारत बांधण्यास पालकांनी कडाडून विरोध केला आहे. आज सायंकाळी शाळेमध्ये पालकांनी बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे दीड हजार पालक यावेळी उपस्थित होते. शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व आहे. त्यामुळे क्रीडांगणाची आवश्यकता आहे. सध्या असलेल्या क्रीडांगणाची जागा मुळातच अपुरी आहे. असे असतानाही या क्रीडांगणात बांधकाम करण्याची संस्थेची भूमिका योग्य नसल्याचे सांगत संस्थेचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आयसीएसईची शाळा सुरू करून इंग्रजी माध्यमासाठी क्रीडांगणात नवी इमारत उभारण्याचा संस्थेचा प्रस्ताव आहे.

अभियांत्रिकी सेवा महासंघाची शुक्रवारी परिषद
मुंबई, ८ जुलै/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागांतील सुमारे ३० हजार अभियंत्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाची राज्यस्तरीय परिषद शुक्रवार १० जुलै रोजी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आली आहे. वेतन सुधारणेचा विषय त्रुटी समितीकडे सोपवून विधानसभा निवडणुकांपर्यंत हा निर्णय टाळण्याचा विचार राज्य सरकारने करू नये ही प्रमुख मागणी यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.