Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९


सखल भाग जलमय (छाया : प्रदीप कोचरेकर)

सेव्ह राणी बाग
भाग-२
झाडे न तोडता आधुनिकीकरण कसे करणार?

प्रसाद रावकर / रेश्मा जठार
एकूण ५३ एकरांचा विस्तार, त्यावर पसरलेली जवळपास २२६ प्रकारची तीन हजारांहून अधिक झाडे, आणि या हिरवाईत उत्क्रांत झालेले लहान-लहान अधिवास असा १४८ वर्षांचा वैभवशाली वारसा लाभलेल्या ‘राणीच्या बागे’तील ‘बोटॅनिकल गार्डन’चे भवितव्य टांगणीला लागले आहे. ४३३ कोटी रुपयांच्या आधुनिक प्राणीसंग्रहालयाचा आराखडा पाहता या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेली तीन हजारांहून अधिक झाडे वाचणार कशी, असा सवाल ‘सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन अ‍ॅक्शन कमिटी’ने केला आहे.

एक्स्प्रेस वे
गरज नव्या हट्टांची!

लोकसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेला केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मागील आठवडय़ात संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबईच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा सार्वत्रिक सूर उमटला. रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला डावलण्याचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला शिरस्ता ममता बॅनर्जी यांनीही पाळला, अशी टीका अनेकांनी केली.

मुसळधार पावसाने रेल्वे मंदावली
प्रतिनिधी

येत्या दोन दिवसांत मुंबईत पाऊस होण्याची शक्यता नाही, हा कुलाबा वेधशाळेचा अंदाज पार चुकवित मध्यरात्रीपासून मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहराला तसेच ठाणे व जवळपासच्या परिसराला झोडपून काढणाऱ्या पावसाचा उपनगरात मात्र फारसा जोर नव्हता.

पाऊस वृत्तवाहिन्यांवरचा..
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागात भरलेले पाणी, त्यात अडकलेली वाहने, जलमय भागातील नागरिकांची उडालेली तारांबळ अशी दृश्ये वारंवार वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात येत होती. यावरून मुंबईमध्ये मोठा पूर आला आहे की काय असे वाटत होते. परंतु परिस्थिती तशी नव्हती. सकाळी नऊच्या आसपास पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हळूहळू जलमय झालेल्या भागांतील पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली होती. तसेच रस्त्यांवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत होती. परंतु तरीही वृत्तवाहिन्यांवर मात्र जलमय झालेला परिसर दाखविण्यात येत होता.

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राची जागा लालफितीत
तुषार खरात

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कल्याण येथे सुरू करण्याबाबतचा निर्णय होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप हे उपकेंद्र सुरू झालेले नाही. उपकेंद्राच्या प्रस्तावित जागेवरील उद्यानाचे आरक्षण हटविण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून चालढकल केली जात असल्याने उपकेंद्र लालफितीत अडकले असून आरक्षण हटविले नाही तर राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ‘स्टुंडट्स अ‍ॅक्शन फ्रंट’ने दिला आहे.

ठाणे उपकेंद्र यंदापासून सुरू होणार
ठाणे महानगरपालिकेने उपकेंद्राची जागा विद्यापीठाकडे सोपविली आहे. त्यानुसार आता या जागेवर बांधकाम सुरू करण्यात येईल. परंतु, बांधकाम पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात एखाद्या इमारतीत उपकेंद्राचे कामकाज सुरू करण्याचा विचारविनिमय सुरू असल्याचे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अ. दा. सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे अर्ज घेणे, गुणपत्रिका देणे, चौकशी खिडकी सुरू करणे, दूरस्थ अभ्यासक्रम राबविणे, काही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम यंदापासून सुरू होतील, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, बदलापूरमध्ये मार्गदर्शन
प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा अहमदाबाद येथे २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भरविली जाणार असून ‘पृथ्वी ग्रह-आपल्या घराचा शोध आणि बोध' हा विषय देण्यात आला आहे. रविवार १२ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत टॅलेंट फाऊंडेशन, नेहा सागर अपार्टमेंट, रेल्वे स्थानकाजवळ, बदलापूर (पूर्व) येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. संपर्क- कार्यकारी विश्वस्त, जिज्ञासा, २ जयानंद सोसायटी, एम. जी. रोड, नौपाडा, ठाणे (प) २५४०३८५७.

कॉ. गोविंदराव पानसरे अमृत महोत्सवी समिती व लोकवाङ्मय प्रकाशन गृहातर्फे विविध पुस्तकांचे प्रकाशन
प्रतिनिधी

कॉ. गोविंदराव पानसरे अमृत महोत्सवी समिती व लोकवाङ्मय प्रकाशन गृहातर्फे ‘कॉ. गुलाबराव गणाचार्य -गिरणगावच्या बुरुजावरील बुलंद तोफ’, ‘कॉ. पी.पी. पाटील- विमा चळवळीतील माझा ॠणानुबंध’ व ‘आधुनिक शाहिरी आणि कामगार रंगभूमी’ या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर कुंटे, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. रवी बापट, आयटकचे सरचिटणीस कॉ. सुकुमार दामले व प्राध्यापक तानाजी ठोंबरे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. हा कार्यक्रम ११ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मिनी थिएटर, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमी, रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार आहे. पुस्तक प्रकाशनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन भाऊ मराठे करणार आहेत, तर सूत्रसंचालन सुनील गणाचार्य करणार आहेत.

दोहामध्ये हास्यदरबार’चे द्विसहस्रक
प्रतिनिधी

दोहा- कतारमध्ये एकपात्री कलावंत दिलीप खन्ना यांच्या ‘हास्यदरबार’चा दोन हजारावा महोत्सवी प्रयोग नुकताच सादर झाला. कार्यक्रमानिमित्ताने त्यांचा हा नववा परदेश दौरा होता. कतार महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बालवाडीपासून अध्यात्मातील विनोदांपर्यंत अनेक किस्से सांगून खन्ना यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.