Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

खंडपीठाने स्थगिती नाकारल्याने स्थायी सभापती निवडीचा मार्ग मोकळा
सत्ताधाऱ्यांतर्फे गाडे, पवार तर सेनेतर्फे पंजाबी
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
महापालिका स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीस न्यायालयाने स्थगिती न दिल्याने उद्या (गुरुवारी) निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला. सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीतून बाळासाहेब पवार व संजय गाडे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी गाडे यांची उमेदवारीच अंतिम होण्याची चिन्हे आहेत.

गुरुपौर्णिमा उत्सवाची शिर्डीत उत्साहात सांगता
राहाता, ८ जुलै/वार्ताहर

श्रीसाईबाबा संस्थानच्या गुरूपौर्णिमा उत्सवाची आज माधव आजेगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व गोपाळकाला दहिहंडी कार्यक्रमाने सांगता झाली. सकाळी बाबांच्या मंगलस्नानानंतर गुरूस्थान मंदिरात संस्थानचे विश्वस्त कृष्णचंद्र पांडेय, अशोक खांबेकर व सुरेश वाबळे यांनी रूद्राभिषेक केला. लाखो भाविकांनी हजेरी लावून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

तूरडाळ क्विंटलमागे हजाराने महागली
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी

मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. नवीन उत्पादन बाजारात येईपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. तूरडाळीचे दर क्विंटलमागे तब्बल १ हजार रुपयांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने डाळींच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच परदेशातून, विशेषत ब्रह्मदेशमधून डाळींची आयातही कमी झाली आहे.

आरोग्यसेवक भरती परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडिओ चित्रण
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक भरतीसाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी व्हिडिओग्राफर व फिरती पथके तैनात केली जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही भरती होत आहे. जिल्हा परिषदेतील २३ आरोग्यसेवक पदांसाठी ही भरती आहे.

नांदणीच्या पुरात एकजण वाहून गेला
जामखेड, ८ जुलै/वार्ताहर

तालुक्यातील जवळे येथील नांदणी नदीस आलेल्या पुरात एकजण वाहून गेल्याची घटना काल सायंकाळी घडली. भारत नामदेव वाळुंजकर (वय ४५) असे या व्यक्तीचे नाव आहे. तालुक्यातील जवळे गावासह नान्नज, बोर्ले परिसरात काल दिवसभर पाऊस झाल्याने नांदणी नदीस पूर आला होता.

कर्जतच्या सरपंच, उपसरपंचांना नोटिसा; आज सुनावणी
कर्जत, ८ जुलै/वार्ताहर

मासिक सभा न घेताही कागदपत्रे रंगवून त्या घेतल्याचे दाखविल्याप्रकरणी कर्जतच्या सरपंच सुनंदा पिसाळ व उपसरपंच दादासाहेब सोनमाळी यांना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्याची सुनावणी उद्या (गुरुवारी) दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होईल.

आण्विक करार हे भारताचे तिसरे स्वातंत्र्य..
महेंद्र कुलकर्णी
नगर, ८ जुलै

१९४७ला मिळाले ते पहिले स्वातंत्र्य. जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेच्या जोडीने देशात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणा हे दुसरे स्वातंत्र्य आणि मागच्या वर्षी झालेला ऐतिहासिक आण्विक करार हे भारताचे तिसरे स्वातंत्र्य आहे..! आण्विक कराराच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर नुकतेच नगरला येऊन गेले. नगरच्या भंडारे कुटुंबीयांचे त्यांच्याशी जवळचे नातेसंबंध आहेत.

दुधात भेसळ करताना रंगेहाथ पकडले
तांदुळवाडीतील स्वामी समर्थ केंद्रावर छापा
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
माल्टोडेक्स्टीन पावडर वापरून दुधात भेसळ करणाऱ्या स्वामी समर्थ दूधसंकलन केंद्राच्या (तांदुळवाडी, राहुरी) संचालकाला अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा रंगेहाथ पकडले. भेसळीसाठी वापरली जाणारी ६० किलो पावडर व ३५० लिटर भेसळीचे दूध जप्त करण्यात आले.

शिर्डीत गर्दीमध्ये अडीच लाखांचे दागिने लुटले
राहाता, ८ जुलै/वार्ताहर

शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तांच्या झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी दोन घटनांमध्ये सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविले. मंगळवारी ही चोरी झाली. फिर्यादी साईबाबू वृद्धेचा (कोतापल्ली, आंध्र प्रदेश) कुटुंबीयांसमवेत दर्शनाला आले होते.

आरटीओ कार्यालयांसाठी हवेत १२ कोटी!
महसूल विकास पॅकेजमधून निधीची मागणी
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
नाशिक महसूल विभाग विकास कार्यक्रम पॅकेज अंतर्गत जिल्ह्य़ातील नगर व श्रीरामपूर आरटीओ कार्यालयासाठी १२ कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. प्रस्ताव संमत झाल्यास नगरच्या बहुप्रतिक्षीत आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम लगेच सुरू होईल.

अग्रवाल प्रसूतिगृहाचे उद्या उद्घाटन
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
सावेडी रस्त्यावरील हॉटेल ओबेरॉयसमोरील अग्रवाल चिल्ड्रेन्स हॉस्पिटलच्या इमारतीत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अग्रवाल प्रसूतिगृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ७ वाजता होणार आहे, अशी माहिती संचालिका डॉ. आचल अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या मॅटर्निटी होममध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, स्त्रीरोग चिकित्सा, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, सरकारमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण चिकित्सा, स्त्रियांमधील कर्करोग निदान व उपचार, मोनोपॉज क्लिनिक अशा अत्याधुनिक सेवा २४ तास उपलब्ध असतील.डॉ. आचल एम. डी. असून, मराठवाडा विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. सुमारे दीड वर्ष त्यांनी आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहिले.

सनातन धर्मसभेच्या वेद पाठशाळेचे उद्घाटन
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून येथील महाजनगल्लीतील सनातन धर्मसभेच्या वेद पाठशाळेचे उद्घाटन आमदार अनिल राठोड यांच्या हस्ते झाले.ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास ब्रह्मवृंद मोठय़ा संख्येने उपस्थित होता. धर्म जाणणारे अनेकजण असतात, पण त्याचे महत्त्व सांगणारे थोडेच असतात. वेदाचा अर्थ सांगण्याचे काम ब्रह्मवृंद करतात, असे या वेळी सांगण्यात आले. सनातन धर्मसभेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक, शेखरगुरू वांबोरीकर, सतीश रेखी, अनिल पुणतांबेकर, बाळकृष्ण पंढरपूरकर, अजित रेखी, विजय बोरुडे, राजाभाऊ पोतदार, वाल्मिक कुलकर्णी, रमेश देशपांडे, जयंत देशपांडे आदी कार्यक्रमास उपस्थित होते. पाठक गुरुजींनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. आभार नीलेश धर्माधिकारी यांनी मानले.

डॉ. ललिता अलसटवार यांना लोकगंगा पुरस्कार
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीनिमित्त पद्मगंगा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकगंगा पुरस्कारासाठी प्रा. डॉ. ललिता अलसटवार (नांदेड) यांच्या ‘पद्मशाली लोकजीवन व लोकसाहित्य’ या ग्रंथाची निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. धोंडिराम वाडकर यांनी ही माहिती दिली.प्रतिष्ठानच्या प्रथम वर्धापनदिनी उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ वाजता श्री. मधुकर नेराळे (मुंबई) यांच्या हस्ते व हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले यांच्या अध्यक्षतेखाली, प्रशांत गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत हमाल पंचायत भवनमध्ये पुरस्कार वितरण होईल. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, प्राचार्य डॉ. वसंत बर्वे, पुणे विद्यापीठाचे डॉ. अशोक शिंदे, नांदेड विद्यापीठाचे डॉ. वसंत बिरादर, साहित्यिक अप्पा कोरपे यावेळी उपस्थित असतील.

पाण्याची काटकसर करा; मनपाचे नागरिकांना आवाहन
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी
पुण्या-मुंबईप्रमाणेच नगरच्या पिण्याच्या पाण्यावरही संक्रांत आली आहे. मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अजूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस नसल्याने नगरकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपाने केले आहे.शहरातील पाणीपुरवठय़ात अद्याप कपात करण्यात आलेली नाही. मात्र, मुळा धरणातील मर्यादित पाणीसाठय़ामुळे पाण्याचा उपसा हव्या त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागत आहे.धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस होईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहणार असून, धरणात पाण्याची आवक होऊ लागताच पाणीपुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

जगभरातील मेहेरप्रेमी उद्या मौन पाळणार
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी

अवतार मेहेरबाबांनी १० जुलै १९२५पासून महानिर्वाणापर्यंत (१९६९) मौन पाळले. त्याची स्मृती म्हणून जगभरातील मेहेरप्रेमी शुक्रवारी (१० जुलै) मौन पाळणार आहेत. दि. ९ रोजी मध्यरात्रीपासून दि. १०च्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे २४ तास हे मौन असेल. या काळात नामस्मरण, आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन, मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन आदी कार्यक्रम होतील. ज्या झोपडीत बसून मेहेरबाबांनी मौनास सुरुवात केली, ती झोपडी या दिवशी सर्वासाठी खुली करण्यात येईल, अशी माहिती मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली.

महापालिकेतील ५१जणांना बढती
नगर, ८ जुलै/प्रतिनिधी

मनपाच्या विविध विभागांतील ५१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यांना पदोन्नतीचे पत्र देण्यात आले. उपमहापौर हाजी नजीर शेख, सहायक आयुक्त आर. ए. देशमुख, जनसंपर्क अधिकारी नीलिमा बंडेलू तसेच नगरसेवक विजय गव्हाणे, दशरथ शिंदे, शेख चाँद आदी यावेळी उपस्थित होते.

‘कर्जतला तालुका पुरवठा अधिकाऱ्याची नेमणूक करावी’
कर्जत, ८ जुलै/वार्ताहर
येथील तालुका पुरवठा अधिकारीपद रिक्त असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांबरोबरच नागरिकांचेही हाल होत आहेत. रॉकेल पुरवठय़ाचा बोजवारा उडाला असून, नवीन शिधापत्रिका देण्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तालुका पुरवठा अधिकारी झेंडे यांची मागील महिन्यात बदली झाली. एक महिना उलटल्यानंतरही नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तात्पुरता पदभार दिला आहे. मात्र, तहसील कार्यालयातील सर्वच विभागांत कर्मचारी कमी असल्याने अनेकांना त्यांच्या विभागाबरोबर इतर विभागांची कामेही करावी लागतात. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची नवीन शिधापत्रिका तयार करणे, संजय गांधी व अन्य योजनांची प्रकरणे मार्गी लागण्यासाठी कायमस्वरूपी चांगल्या पुरवठा अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी प्रांताधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.

साईबाबा पालखीरस्ता कामाच्या पूर्णत्वासाठी काळेंचे आंदोलन
कोपरगाव, ८ जुलै/वार्ताहर
साईबाबा चौफुली ते शहरातून मोहनीराजनगर भागातून जाणाऱ्या साईबाबा पालखीरस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मुख्याधिकारी मुकुंद गुजर यांना पालखीची प्रतिकृती देत निवेदन दिले. येत्या आठ दिवसांत पालखीरस्त्याचे कामाबाबत निर्णय न घेतल्यास लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.ते म्हणाले की, गावाच्या विकासासाठी पालखीरस्ता व्हावा म्हणून श्रीसाईंचे झोळीतून १ कोटी २० लाखांचा निधी पालिकेकडे वर्ग केला. वेळोवेळी अपूर्ण रस्त्यासाठी आंदोलने केली. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. गोदावरी नदीपासून मोहनीराजनगरमार्गे जाणारा भक्त अनवाणी जातो. उघडय़ा खडीचा त्यांना त्रास होतो. त्यामुळे या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी श्री. काळे यांनी केली आहे.

युवक काँग्रेसचा आज कर्जतला मेळावा
कर्जत, ८ जुलै/वार्ताहर
युवक काँग्रेस तालुका शाखेचा मेळावा उद्या (गुरुवारी) येथे आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता मेळावा होईल. तालुकाध्यक्ष प्रवीण घुले मार्गदर्शन करतील. विधानसभा निवडणुकीबाबत रणनिती आखणे, कार्यकर्त्यांत समन्वय, संघटन मजबूत करणे या बाबींवर चर्चा होणार असल्याची माहिती विजय मोरे यांनी दिली.