Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

जीवन दर्शन
कायोत्सर्ग

आजकालचं जीवन म्हणजे धावपळ, स्पर्धा, टेन्शन. विद्यार्थ्यांचं शिक्षण म्हणजे घोडय़ाची रेस, लवकर उठा, ट्रेन पकडा, अभ्यास करा, क्लासमध्ये जा, होमवर्क करा, उत्तम गुण मिळवा, चांगली नोकरी, भरपूर पैसा, स्पर्धेत टिकायचं तर हे सगळं करा. नोकरदारांचंसुद्धा धावपळीचं जीवन, मुलांची महागडी शिक्षणं, खर्चाची ओढाताण, वाढलेल्या गरजा, चंगळवादी वृत्ती, गर्दीतला प्रवास, अनेक ताणतणाव. या ताणतणावांमुळे मनाचा समतोलही निघून जातो. अनेक आजार

 

त्यातून उद्भवतात. प्राचीन ऋषिमुनींनी ‘टेन्शन’वर मात करण्यासाठी साधे उपाय शोधले. ज्याला त्यांनी कायोत्सर्ग म्हटले. शारीरिक, मानसिक, भावनिक ताणतणाव दूर करण्यासाठी कायोत्सर्ग एक अद्भुत प्रयोग आहे. महावीरांनी याला कायगुप्ती असंही म्हटलं. विज्ञानाच्या कसोटीवरही हा प्रयोग जगभर लोकप्रिय झाला आहे. कायोत्सर्ग म्हणजे कायेचा उत्सर्ग. शरीराचा तात्पुरता त्याग म्हणजे त्यावरील ममत्व सोडून शरीर शिथिल करून ताणतणावांचं विसर्जन करणे. कायोत्सर्ग तीन मुद्रेत करता येतो. उभे राहून, बसून आणि झोपून. भगवान महावीरांना त्यांच्या शिष्याने विचारले, ‘प्रभो, कायोत्सर्गाचा माणसाला काय लाभ होतो?’ महावीर म्हणाले, कायोत्सर्ग म्हणजे निर्विकार राहून, शरीरावरील ममत्व सोडून अंतर्लीन होणं, कायगुप्तीमुळे संयम होतो. शरीराची चंचलता कमी होते. ‘संवर’ होतो म्हणजे मनात वाईट विचार येणं थांबतं. पाच प्रकारची चंचलता माणसाला दु:खी करते. चुकीचा दृष्टिकोन त्यामुळे ध्येयापर्यंत पोहोचणं कठीण होतं. लालसा, लोभ, निषेधात्मक भाव म्हणजे हास्य, कौतुक, झोप, आळस यात रमणे, मोहात बुडून जाणे व मन वचन कायेची चंचलता-अस्थिरता त्यामुळे एकाग्रता न होणे ही कारणं नाहीशी करण्याचे काम कायोत्सर्ग करतो. शरीर स्थिर होणं, एकाग्रता साधणे, प्राणिमात्रांचा विचार करणं, मनात समताभाव जागणं या गोष्टी कायोत्सर्गामुळे साधतात. कायोत्सर्गाचे तीन लाभ- शरीराची शिथिलता, सहनशीलता, निर्भयता यामुळे ताणतणावावर सहज विजय मिळवता येईल. कायोत्सर्ग एक तास केला तरी चार तास झोप मिळण्याइतकी विश्रांती मिळते.या धावपळीच्या जगात तरुण वयात हार्ट अ‍ॅटक आल्याचे आपण वाचतो. कायोत्सर्गामुळे काही प्रमाणात तो रोखता येईल.
लीला शहा

कुतूहल
अवरक्त किरणे
अवरक्त किरणांचा वेध का व कसा घेतला जातो?

अवरक्त व अतिनील या तरंगलहरी दृश्य प्रकाशलहरींच्या लगतच्या तरंगलहरी आहेत. यापैकी अवरक्त किरणांची तरंगलांबी दृश्य प्रकाशलहरींपेक्षा अधिक असते. या अवरक्त किरणांपैकी कमी तरंगलांबीचे किरण हे पृथ्वीच्या वातावरणातून पार होऊ शकत असल्यामुळे त्यांचे निरीक्षण पृथ्वीवरील दुर्बिणींद्वारे करता येते. मात्र हवेतील बाष्प आणि कार्बन डाय ऑक्साईड काही प्रमाणात हे किरण शोषून घेतात. त्यामुळे ही निरीक्षणे उंच पर्वतांवर उभारलेल्या दुर्बिणीद्वारे केली जातात. अधिक तरंगलांबीचे अवरक्त किरण मात्र पृथ्वीच्या वातावरणात पूर्णपणे शोषले जातात. या किरणांचा अभ्यास फुगे किंवा उपग्रहांद्वारे शोधक वातावरणाबाहेर पाठवून केला जातो. इरास, स्पिट्झर इत्यादी अंतराळ दुर्बिणींनी अवरक्त किरणांच्या हजारो स्रोतांचा शोध लावला आहे. अवरक्त किरण हे दृश्य प्रकाशलहरींपेक्षा सहजपणे अंतराळातील धुळीचे ढग भेदू शकतात. आकाशगंगेच्या केंद्राभोवती असलेल्या धुळीमुळे तेथून येणाऱ्या दृश्य प्रकाशलहरींचे निरीक्षण शक्य नसले, तरी तेथे निर्माण होणाऱ्या अवरक्त किरणांचा वेध मात्र आपल्याला घेता येतो. याखेरीज लाल रंगाच्या (राक्षसी तसेच इतर) ताऱ्यांचे उत्सर्जनही प्रामुख्याने अवरक्त तरंगपट्टय़ात होते. ताऱ्यांना जन्म देणारे प्रचंड आकाराचे रेण्वीय मेघ, दीर्घिकांची केंद्रके, दीर्घिका, ग्रह, लघुग्रह इत्यादींची माहिती या निरीक्षणाद्वारे मिळते. सूर्यमालेतील आणि विविध दीर्घिकांमधील पाण्याचे रेणू, सेंद्रिय रेणू, आंतरतारकीय पोकळीतील तसेच ताऱ्यांच्या सभोवती असलेल्या धुळीतील सिलिकेट्स इत्यादींचा शोध अवरक्त वर्णपटांतूनच लागला. याशिवाय अवरक्त खगोलशास्त्राचा विश्वरचनेशी संबंधित एक पैलूही आहे. अतिशय दूर असलेल्या स्रोतांकडून येणाऱ्या दृश्य व अतिनील प्रकाशलहरी या ताम्रसृतीमुळे अवरक्त तरंगपट्टय़ामध्ये सरकतात. त्यामुळे अवरक्त तरंगपट्टय़ातील निरीक्षणातून दूरवरच्या कमी वयाच्या दीर्घिकांविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते. म्हणजेच अवरक्त खगोलशास्त्र हे बाल्यावस्थेतील विश्वाच्या अभ्यासाचेही महत्त्वाचे साधन आहे.
वर्षां चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
गुरुदत्त

हिंदी चित्रपट जगतात शोकांतिकेला ग्लॅमरची झळाळी प्राप्त करून देणाऱ्या दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका वठवणाऱ्या गुरुदत्तचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी बंगलोरजवळ झाला. गुरुदत्त पदुकोण हे त्यांचे मूळ नाव. उदय शंकर यांच्या अ‍ॅकॅडमीतून नृत्याचे धडे गिरवणाऱ्या गुरुदत्तला चित्रपटाची झगमगती दुनिया स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर देव आनंदच्या ‘बाजी’ या चित्रपटात दिग्दर्शक म्हणून बाजी मारल्यावर गुरुदत्त यांनी स्वत:च्या गुरुदत्त फिल्मस्मार्फत ‘आरपार’ या चित्रपटात निर्माता-दिग्दर्शक व नायक अशी तिहेरी भूमिका वठवली. ‘प्यासा’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘मिस्टर अँड मिसेस ५५’ असे एकापेक्षा एक सरस चित्रपट गुरुदत्त यांनी दिले. ‘कागज के फूल’ हा त्यांचा असाच एक महत्त्वाकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळल्यावर मात्र त्यांना नैराश्याने गाठले. यानंतर ‘चौदहवी का चाँद’ सारखा चित्रपट काढून गुरुदत्तला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. परंतु ‘कागज के फूल’ चे अपयश मात्र तो पचवू शकला नाही. या चित्रपटातून तो स्वत:चे प्रतिबिंब पाहात होता की काय असेच वाटले. कारण यानंतर वैयक्तिक ताणतणाव, अपयश यातून सतत अस्वस्थ राहणाऱ्या या कलाकाराने १० ऑक्टोबर १९६४ रोजी आत्महत्या केली. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे ३९ वर्षे.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
राघवेंद्रचा डबा
अकरावीत गेलेल्या राघवेंद्रची आई त्याच्यासाठी सकाळी उठून डबा करायची. घडीच्या पोळय़ा, फळभाजी, कोशिंबीर आणि संत्रे किंवा चिकूसारखे एखादे फळ. त्याला न्यायला चौकोनी सुंदर डबाही तिने विकत आणला होता. त्याला आवडणारी भाजी करायची म्हणून रोज संध्याकाळी ती जवळच्या भाजी मंडईत जाऊन त्याच्या आवडीची आणि ताजी भाजी आणायची. फ्रीजमध्ये ठेवून मलूल झालेली भाजी ते राघवेंद्रच्या डब्यात कधीच द्यायची नाही. राघवेंद्रला मात्र रोजची डब्यातली भाजी-पोळी पाहून फारच वैताग यायचा. त्याच्याबरोबर डबा खाणाऱ्या राममोहन भटच्या डब्यात कधी उत्तप्पा तर कधी आप्पे असायचे. जयेश सँडविच, पिझ्झा असे काहीबाही आणायचा. हळूहळू त्याने स्वत:चा डबा खाणे सोडून दिले. कॅन्टीनमध्ये इतर मित्रांबरोबर जाऊन तो खाऊ लागला. आई ओरडेल म्हणून तो डबा न विसरता मोकळा करून घरी न्यायचा. दोन-तीन महिने त्याचा हाच दिनक्रम चालू होता. रोज तो निघाला, की घाईघाईने आई त्याचा तयार केलेला डबा त्याला द्यायची. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठून राघवेंद्र ज्युनिअर कॉलेजला निघायची तयारी करत होता. त्याचा डबा वेळेत तयार करून देण्यासाठी आईची गडबड चालू होती. बाबा चहा मागत होते, पण आई त्यांना बजावत होती, की ‘रघूचा डबा करतेय. त्याला वेळ नको व्हायला. जरा वेळाने चहा देते तुम्हाला.’ एवढय़ात रडवेल्या आवाजात राघवेंद्र म्हणाला, ‘आई, माझ्या पोटात फार दुखतंय.’ तो कळवळून रडायला लागला. थोडय़ा वेळानं त्याला उलटय़ा होऊ लागल्या. बाबांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरकाका थोडय़ाच वेळात आले. राघवेंद्रला त्यांनी तपासले. ते म्हणाले. ‘याला अजीर्ण झाले आहे. अ‍ॅसिडिटीही झाली आहे. अरे रघू, बाहेरचं सतत खातोस वाटतं.’ आई म्हणाली, ‘छे हो, तो रोज डबा नेतो. व्यवस्थित देते त्याला डबा मी.’ डॉक्टर म्हणाले, ‘बाहेरचं खाल्ल्यानेच तो आजारी पडलाय.’ उलटय़ा, पोटदुखीने हैराण झालेला राघवेंद्र फार शरमला. तो खाली मान घालून म्हणाला, ‘मला पोळी-भाजी आवडत नाही म्हणून मी कँटीनमध्ये खातो. आपण इतक्या प्रेमाने आणि धावपळ करून दिलेला डबा रघू खातच नव्हता. याचे आईला फार वाईट वाटले. डॉक्टर म्हणाले, ‘मंदिर बांधायचे झाले तर डोसा, भजी, चॉकलेट वापरता येते का? तू जे अन्न खातोस ते शरीराच्या बांधकामाच्या दगडविटांसारखेच असते. चुकीचे अन्न खाणे शरीराला अपायकारक असते. मी औषध देतो, पण तुझं खरं औषध व्यवस्थित पोळी-भाजी, कोशिंबीर, वरण-भात हेच आहे. जेव्हा शरीराची वाढ होत असते तेव्हा व्यवस्थित पोषणाची गरज असते. समतोल आहार असेल तर तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्ही सशक्त व्हाल. बुद्धीही तल्लख राहील.’ आजचा संकल्प- मी खाताना योग्य अन्नाची निवड करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com