Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

कोपरी स्थानकासाठी नाईकांची ममतांकडे धाव
ठाण्याचे ओझे कमी करा

नवी मुंबई/ प्रतिनिधी - ठाणे रेल्वे स्थानकावर दिवसागणिक वाढणारे प्रवाशांचे ओझे लक्षात घेऊन ठाणे, तसेच मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान नवे कोपरी रेल्वे स्थानक सुरू करावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे. घोडबंदर, वागळे इस्टेट, किसननगर, लोकमान्यनगर यासारख्या भागांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी नाहूर, कोपर स्थानकांच्या धर्तीवर नवे रेल्वे स्थानक उभारले गेल्यास ठाण्यातील गर्दी कमी होऊ शकणार आहे. या संदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर चर्चाही सुरू झाल्या आहेत.

अतिवृष्टी झाल्यास ३६ गावांना धोका
आपत्कालीन यंत्रणा सज्ज

पनवेल/प्रतिनिधी - पनवेल परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यास नदीलगतच्या एकूण ३६ गावांना पुराचा धोका निर्माण होईल, अशी माहिती पनवेलचे तहसीलदार डॉ. संदीप माने यांनी दिली आहे. मात्र या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.२६ जुलै २००५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. गाढी, कासाडी, श्रीमलंग, काळुंद्रे, पाताळगंगा आदी नद्यांच्या काठावरील या गावांना आजही पुराचा धोका संभवतो. यंदा अतिवृष्टी झाल्यास त्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तहसीलदारांनी नुकताच तालुक्याचा अभ्यास दौरा पूर्ण केला.

नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बेलापूर/वार्ताहर - नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने नवी मुंबईतील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते गुरुपौर्णिमेनिमित्त करण्यात आला. याप्रसंगी दहावी व बारावीत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या १२७ विद्यार्थ्यांना सहा लाखांची पारितोषिके देण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी नवी मुंबई शिक्षण संकुलातर्फे सराव परीक्षा घेण्यात आली होती.भविष्यातही उपरोक्त संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रश्नेत्साहनपर उपक्रम राबविण्यात येतील, असे संस्थेचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले. यावेळी प्रश्न. विनायक मांजरेकर यांचे ‘वेलकम टू इंजिनीअरिंग’ या विषयावर मार्गदर्शन झाले. व्यक्तीचे शिक्षणमूल्य त्याच्या संस्कारावर ठरत असल्याचे गणेश नाईक मार्गदर्शनात म्हणाले.व्यक्तीने गुणवत्तेने मोठे होऊन या गुणवत्तेचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.याप्रसंगी व्यासपीठावर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, महापौर अंजनी भोईर, उपमहापौर शशिकांत बिराजदार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘व्यक्तीला गुरूंमुळेच खऱ्या ज्ञानाची ओळख होते’
बेलापूर/वार्ताहर - भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरू असून प्रत्येक व्यक्तीला जीवनातील खऱ्या ज्ञानाची ओळख ही गुरूंमुळेच होत असते, असे प्रतिपादन केरळी क्षेत्रीय परिपालन समितीचे अध्यक्ष रवींद्रन् मन्ननूर यांनी नेरुळ येथे केले. सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. रवींद्रन् म्हणाले, गुरू हे अध्यात्माचा पर्यायाने योग्य धर्माचरणाचा मार्ग दाखवून शिष्याची प्रगती करवून घेतात. जी गोष्ट स्वयंभू आहे, ती कधी नष्ट होत नसते. तशाच प्रकारे सनातन हिंदू धर्म हा अनादी अनंत आहे, तो कधी नष्ट होऊ शकत नाही. गेली १४०० वर्षे या धर्मावर अनेक आघात होऊनही तो अबाधित आहे. महंमद गझनी, तुघलक, घौरी, इंग्रज, पोर्तुगीज आदी परकीय आक्रमण होऊन सनातन हिंदू धर्म टिकून आहे. धर्मातरण व अन्य धर्मियांशी मिश्र व्यवहार हे सध्याच्या काळातील हिंदू धर्मावरील मोठे आघात आहेत. याला तोंड देण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. शांती आणि चर्चेच्या फैरी झडत बसणे हे आतंकवादाला उत्तर नसल्याचे मत हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक डॉ. उदय धुरी यांनी व्यक्त केले. हिंदू जाती व्यवस्थेत विभागले गेल्याने त्यांना धर्माबाबत अभिमान राहिला नाही. आरक्षणवाद बाजूला सारून धर्मासाठी सर्वानी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महागाईविरोधात रास्ता रोको
उरण/वार्ताहर - जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून सामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या निष्क्रिय काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात उरण शिवसेनेने आज चारफाटा येथे ‘रास्ता रोको’ केले. सेनेच्या या रास्ता रोकोमुळे उरण शहर व आसपासची वाहतूक सुमारे अर्धा-एक तास खोळंबली होती. केंद्र व राज्यातील काँग्रेस आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा आगडोंब उठला आहे. पेट्रोल, डिझेल, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या भाववाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाढलेल्या महागाईचा व काँग्रेस आघाडीचा निषेध करण्यासाठी बुधवारी उरण शिवसेनेने चारफाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख दिनेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनामुळे उरण शहराकडे येणारी व जाणारी वाहतूक सुमारे एक तास ठप्प होती. महागाई कमी करा, निष्क्रिय आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचा, अशा घोषणा देऊन सेनेने सरकारची निंदा करून निषेध व्यक्त केला. रास्ता रोको करणाऱ्या नरेश रहाळकर, दिनेश पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर, शहरप्रमुख महेश पाटील आदींसह १५ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

नेरुळ येथे रहिवाशाचा संशयास्पद मृत्यू
बेलापूर/वार्ताहर - नेरुळ येथे एका ५० वर्षीय रहिवाशाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. रजिंदर सेठी (५०, राहणार त्रिमूर्ती सोसायटी, सेक्टर-८) असे या व्यक्तीचे नाव आहे. सेठी यांच्या घरातून सकाळी दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना सेठी यांचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तसेच जवळील खाटेवर सेठी यांचा मतिमंद मुलगा गौरव सेठी (१६) हा निपचित पडला होता. सेठी यांची पत्नी एका आठवडय़ापूर्वी दिल्लीला गेली होती. पोलिसांनी सेठी यांचा मृत्यू अकस्मात झाल्याची नोंद केली आहे.