Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९


धुळे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने पांझरा नदीला पूर आला असून वरखेडी गावाजवळील बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. छाया : मनेश मासोळे

पालिका कर्मचारी चार महिन्यांपासून पगारापासून वंचित
वार्ताहर / अमळनेर

गेल्या चार महिन्यापासून पगार रखडल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पालिकेचे निवृत्त वेतनधारक व कर्मचाऱ्यांना देय असलेले तब्बल दोन कोटी ६० लाख रुपये चार महिन्यांपासून थकीत आहेत. एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम माजी नगराध्यक्ष सुरेश ललवाणी यांनी नगरविकास संचालकांच्या मान्यतेने नव संजीवनी योजनेत भरले होते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्ग करण्यात आली होती. नवसंजीवनी योजनेचा फायदाही मिळाला नाही.

काँग्रेसमधील दुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधक सज्ज
वार्ताहर / धुळे

जिल्ह्य़ातील काँग्रेसमधील दुफळी सर्वश्रूत असल्याने आणि काही केल्या हे दोन्ही गट एकत्र येणारच नाहीत अशी खात्री झाल्याने जिल्ह्य़ात राजकीय पाया अधिकाधिक भक्कम करण्यासाठी काँग्रेस विरोधक सरसावले आहेत. काँग्रेस नेते आ. अमरिभाई पटेल आणि आ. रोहिदास पाटील यांचे अनुक्रमे ‘अँकर’ आणि ‘जवाहर’ हे दोन्ही गट खरे तर त्यांच्याच म्हणजे शिरपूर व

धरणगाव तहसील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा वादात
वार्ताहर / जळगाव

राजकीय वर्चस्वाच्या चढाओढीत धरणगाव येथील तहसीलदार कार्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परस्पर सोहळा आयोजित करून निमंत्रणपत्रिका वितरित करणाऱ्या पालिका मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांनी नोटीस बजावली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची बनावट ओळखपत्रे; तिघांना अटक
नांदगाव / वार्ताहर

तहसीलदारांच्या नावाचा बनावट सही, शिक्का तयार करून ज्येष्ठ नागरिकांचे बनावट ओळखपत्र तयार करणाऱ्या टोळीला येथील तहसीलदार सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयीन पथकाने रंगेहात पकडले. तीन जणांना अटक करून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिसवळ व सोयगाव येथील कार्यकर्त्यांनी तहसीलदार गाढे यांना बनावट ओळखपत्र प्रकरणाबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाच्या आधारावर तहसीलदार गाढे, लिपीक यु. बी. शिंदे, एस. व्ही. भोई यांच्यासह दोन पोलिसांनी सोमवारी सायंकाळी येवला तालुक्यातील राजापूर येथील रहिवासी चिंधा पुंजा जाधव यास ताब्यात घेतले असता त्यांनी आपल्यासह आणखी दोघे मिळून ही ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे पैठणच्या तहसीलदारांच्या नावाने सही शिक्के मारून सदर व्यक्ती कडून पैसे घेवून त्यांना देतो असे सांगितले. जाधव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील पोपट कारभारी ठुबे, पैठण तालुक्यातील कोठीराम एकनाथ ऐरडे यांना अटक करण्यात आली.

नाभिकसमाजाचे आंदोलन
लासलगाव / वार्ताहर

नाभिक समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ जुलै रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हाध्यक्ष संजय वाघ व जिल्हा सरचिटणीस मोहन मगर यांनी दिली. नाभिक महामंडळाचे संस्थापक हनुमंत साळुंखे, महामंडळाचे अध्यक्ष भगवान बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी शिबिरात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नाभिक समाजाची ताकद राज्य शासनाला दिसावी म्हणून जुलै महिन्यात धरणे तर ऑगस्टमध्ये आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात हनुमंत साळुंखे, भगवान बिडवे, विभागीय अध्यक्ष नारायण यादव, विभागीय संपर्कप्रमुख सुभाष बिडवई, दिलीप जाधव, अरविंद देसाई, चंद्रशेखर सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष संजय वाघ, जिल्हा सरचिटणीस मोहन मगर यांनी केले आहे.