Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

स्टेट बँकेच्या नऱ्हे आंबेगाव शाखेवर भरदिवसा पावणेचार लाखांचा दरोडा
पुणे, ८ जुलै / प्रतिनिधी

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ च्या (एसबीआय) नऱ्हे-आंबेगाव (बुद्रूक) येथील शाखेवर पाचजणांच्या टोळीने भरदिवसा पावणेचार लाखांचा सशस्त्र दरोडा टाकला. दत्तनगरजवळ आज दुपारी दीड ते पावणेदोन या वेळेत ही घटना घडली. मोटारीतून आलेले दरोडेखोर बाह्य़वळण महामार्गावरून पसार झाले.

कंत्राटाचे गौडबंगाल
मुकुंद संगोराम

नगर रस्त्याच्या कामाचे कंत्राट सध्या चांगलेच गाजते आहे. महापालिकेच्या एका पदाधिकाऱ्याच्या नातलगाला हे कंत्राट मिळावे यासाठी सारे नियम धाब्यावर बसवून पालिकेला नुकसान सोसायला लावून यासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला. पुणेकरांच्या करातून मिळणाऱ्या पैशांवर कसा डल्ला मारला जात आहे, याचे हे एक जागते उदाहरण आहे. तीस कोटी रुपयांचे हे काम पूर्वीच्याच कंत्राटदाराला द्यावे, असा अभिप्राय असतानाही पालिकेचे नियम इतरांसाठी असतात, असा आव आणून पदाधिकारी मनमानी करत असतील, तर त्यांना जाब कोणी विचारायचा? त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना याबाबत मूग गिळून गप्प बसता येणार नाही.

वादग्रस्त निविदेवरून पक्षनेत्यांमध्ये घमासान
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी

नगर रस्त्याची कोटय़वधी रुपयांची निविदा ‘हातोहात’ मंजूर झाल्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे आणि या नुकसानीला प्रशासनाइतकीच स्थायी समितीही जबाबदार आहे. जनतेचे पैसे वाचवायचे का उधळायचे.. अशा तिखट शब्दांत पक्षनेत्यांच्या बैठकीत आज प्रशासनाला आणि स्थायी समितीलाही जाब विचारण्यात आला त्यावरून उपस्थितांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगीही झाली.

पुण्यासाठी २५ दिवसांचे पाणी शिल्लक
धरणांच्या क्षेत्रातील पाऊस ओसरला
पुणे, ८ जुलै / खास प्रतिनिधी
धरणांच्या क्षेत्रात गेले दोन दिवस पाऊस पडल्यानंतर आज ओसरला. पुण्यासाठी पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या धरणांमध्ये आता १.०४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी शिल्लक असून, ते पुणे शहराला २५ दिवस पुरेल, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टँकर दरात वाढ न केल्यास आजपासून ‘बंद’चा इशारा
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी

महापालिकेने जाहीर केलेला टँकरचा सहाशे रुपये हा दर परवडत नसल्यामुळे दरात तातडीने भरीव वाढ न केल्यास उद्या (गुरुवार) दुपारी चारपासून टँकर बंद करण्याचा इशारा टँकर व्यावसायिकांनी दिला आहे. शहरातील नागरिक पाण्यासाठी ओरड करत असताना अशा टंचाईच्या काळात टँकरचालकांनी केलेली ही मागणी पुणेकरांना वेठीला धरणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मोबाईल किंवा कागदपत्रे चोरीला गेल्यास पोलिसांना प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही
पुणे, ८ जुलै / प्रतिनिधी

मोबाईल, बॅग किंवा कागदपत्रे चोरीला गेल्यावर तक्रार घेण्यापूर्वी पोलिसांनी ‘प्रतिज्ञापत्र’ मागितल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. याबाबतच्या तक्रारींमध्येही गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. मात्र अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र मागण्याचा अधिकार पोलिसांना नसून त्यांनी तत्काळ तक्रार दाखल करून घेणे आवश्यक आहे.

विधी सभापतिपदासाठी रहाटणी-काळेवाडीची ‘हॅट्रीक’
क्रीडा सभापतिपदी खेडकर यांची फेरनिवड
पिंपरी, ८ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विधी समितीचे अध्यक्षपद खंडूशेठ कोकणे यांच्या माध्यमातून सलग तिसऱ्या वर्षी रहाटणी-काळेवाडी भागाकडे सोपविण्यात आले आहे. क्रीडा समितीच्या सभापतिपदावर घनश्याम खेडकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना पीएमपीचे मोफत पास
अडीच कोटीच्या खर्चास मान्यता
पिंपरी, ८ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘पीएमपीएमएल’मार्फत मोफत पास देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी जवळपास अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा विषय स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे हद्दीतील पालिकेच्या तसेच खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळू शकणार आहे.

उपसूचनांऐवजी स्वतंत्र विषयपत्र ठेवण्याचा पर्याय
आठ दिवसात घूमजाव?
पिंपरी, ८ जुलै / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर करताना उपसूचना न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाराज झालेल्या नगरसेवकांची मर्जी राखण्यासाठी अवघ्या आठच दिवसांत घूमजाव करीत त्या उपसूचना आडमार्गाने पुन्हा मांडण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, उपसूचनांऐवजी त्यास स्वतंत्र प्रस्तावाचे स्वरूप देऊन तो स्थायी समितीत मंजूर करण्याचा पर्याय काढण्यात आला आहे.

नादुरुस्त यंत्राने कामगारास अपघात ;चार बोटे गमवण्याची वेळ
पिंपरी, ८ जुलै / प्रतिनिधी

चाकण औद्योगिक वसाहतीमधील ‘कल्याणी लेमर्झ’ या कंपनीतील एका कंत्राटी कामगाराची डाव्या हाताची चार बोटे प्रेस मशिनमध्ये सापडून कायमचे निकामी झाली. आज सकाळी हा अपघात झाला. त्या कामगारास तातडीने चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी त्याच्या सहकाऱ्यांनी दाखल केले.शंकर जाधव (वय २६ वर्षे, रा. राजगुरुनगर) असे अपघात झालेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीमध्ये ‘स्क्रु प्रेस मार्किंग’ या यंत्रावर रात्रपाळीत तो काम करत असताना आज सकाळी हा अपघात झाला. हे यंत्र नादुरुस्त असल्याची तक्रार काही कामगारांनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली होती; परंतु त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या यंत्रावर एका ठेकेदारामार्फत उत्पादन काढले जाते, अशी माहिती कामगारांनी दिली.अपघात झाला त्या वेळेस जाधव याच्या हाताची तीन बोटे मशिनवर तुटून पडली होती, तर एक बोट लोंबकळत होते. या घटनेमुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोषाची भावना पसरली आहे.

ससूनमधील डॉक्टर आज संपात सहभागी होणार
पुणे, ८ जुलै / प्रतिनिधी
राज्यातील सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने पुकारलेला संप काल रात्रीपासून सुरू झाला. संपाबाबत विचार करण्यासाठी मार्डच्या प्रतिनिधींची आज रात्री बैठक झाली. ससूनच्या सहा विभागांमधील १३५ डॉक्टर संपात सहभागी झालेले नाहीत, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला. मात्र हे डॉक्टर उद्या, गुरुवारी संपात सहभागी होतील, असे मार्डच्या प्रतिनिधींनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने निवासी डॉक्टरांना कोणत्या सुविधा द्याव्यात, याविषयी आदेश दिले आहेत. मात्र त्याची राज्यात अंमलबजावणी होत नाही.

‘द्रुतगती महामार्गाचे पु. ल. देशपांडे नामकरण’
लोणावळा, ८ जुलै / वार्ताहर
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचे पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने थोर साहित्यिक पु. ल. देशपांडे असे नामकरण करण्यात आले. पुणे जिल्हा शिवसेनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र खराडे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा व रायगड जिल्हा या सीमारेषेवरील अमृतांजन या ऐतिहासिक पुलाखाली नामकरण विधी व फलक लावण्यात आला.या वेळी विभागप्रमुख संजय घोंगे, संजय भोईर, दीपक हुंडारे, जितेंद्र राऊत, विजय आखाडे, सचिन वाळके, संतोष साबळे, सुनील इंगुळकर आदी उपस्थित होते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते व पु. ल. देशपांडे हे पुणे व मुंबई या दोन्ही शहरातील व्यक्तिमत्त्व असल्याने हे नाव राजकीय हेतूने नव्हे भावनिक हेतूने देण्यात आल्याचे खराडे यांनी सांगितले.

योगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी
योगेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत दोन दिवसात समाधानकारक तोडगा न निघाल्यास येत्या १३ जुलैपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शाळेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. शाळेला शंभर टक्के अनुदान असतानाही नियुक्ती झाल्यापासून आजतागायत कर्मचाऱ्यांना संस्थेने एकदाही वेतन दिलेले नाही, असा आरोप शाळेचे कर्मचारी अनिल घनवट आणि बालाजी भेंडापुरे यांनी केला आहे.

वाहतूक समस्येवर आज परिसंवाद
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व ‘लोकसंवाद’ यांच्या वतीने पुणे शहरातील वाहतूक समस्येवर आधारित ‘वाहतूक एक गंभीर समस्या’ या परिसंवादाचे आयोजन येत्या ९ जुलै रोजी सायं. ५.३० वा. एस. एम. जोशी सभागृह नवी पेठ येथे करण्यात आले आहे.अंकुश काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी विजय काळे उपस्थित होते.परिसंवादामध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उमाकांत दांगट, पीएमपीएलचे अध्यक्ष नितीन खाडे, वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील, डॉ. बाबा आढाव, दै. सकाळचे संपादक सुरेशचंद्र पाध्ये, दै. पुढारीचे संपादक अनिल टाकळकर, नीलेश निकम, प्रशांत इनामदार सहभागी होणार आहेत.

‘स्वरराज म्युझिक’ कंपनीची स्थापना
पुणे, ८ जुलै / प्रतिनिधी
मराठी संगीत क्षेत्रास योगदान देण्यासाठी ‘स्वरराज म्युझिक’ या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर सचिव बाबा चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कंपनीने तयार केलेला ‘यारी तुझी’ हा मराठी गीतांचा अल्बम लवकरच प्रकाशित होणार आहे. या अल्बममध्ये हिंदूी गायक शान याने गीते गायली आहेत. त्याच बरोबर स्वप्नील बांदोडकर, प्रसाद ओक, मधुरा दातार यांचीही गाणी ऐकायला मिळणार आहेत. असे कंपनीचे म्युझिक संचालक अजय नाईक यांनी सांगितले.

जयंत बेंद्रे यांना जयवंत दळवी पुरस्कार
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी
मुंबईतील साहित्य दरवळ मंचतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. जयवंत दळवी स्मृती पुरस्कारासाठी पुण्यातील लेखक व अभिनेते जयंत बेंद्रे यांच्या ‘माणसं आणि माणसं’ या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. येत्या १२ जुलै रोजी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. सायन येथील भगिनी समाज हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास सिनेनाटय़कलावंत मोहन जोशी आणि प्रसिद्ध लेखिका डॉ. सुमन नवलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. या व इतर काही पुरस्कारांसाठी साहित्य दरवळ मंचने साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये एकूण ८७ साहित्यकृती मंचकडे आल्या होत्या. निवड समितीने त्यातून २१ साहित्यकृतींची पुरस्कारांसाठी निवड केली होती.

द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रस्ता यांच्या वतीने येत्या १० जुलै रोजी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.क्लबच्या सचिव सुनेत्रा मंकणी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रोटरी क्लबतर्फे ससून रुग्णालयास नवजात अर्भकांसाठी ‘ट्रान्शिशन युनिट’ दिले जाणार असून यासाठी पंचवीस लाख रुपये खर्च येणार आहे. निधी संकलनाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मिरासदार यांचा कथाकथनाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री ९ ते ११.३० या वेळेत होणार आहे. त्यासाठी १५० रुपये, १०० रुपये आणि ५० रुपये असे प्रवेशशुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती मंकणी यांनी दिली.

दत्तोबा माळवदकर यांचे निधन
पुणे, ८ जुलै/प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते दत्तोबा माळवदकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन चिरंजीव आणि तीन कन्या असा परिवार आहे. शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष रवींद्र माळवदकर यांचे ते वडील होत.