Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

४२ हजार विद्यार्थी पाठय़-पुस्तकांपासून वंचित
दिलीप शिंदे, ठाणे,८ जुलै

 

शहर विकासाच्या नावाखाली कोटय़ावधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीला पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४२ हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना साधे गणवेश देण्यासाठी निधी नसावा!. एवढेच नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाटी-पुस्तकाशिवायच शिक्षण घ्यावे लागत आहे.
ठाणे शिक्षण मंडळाच्या नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभारामुळे शिक्षणाचा दर्जा सातत्याने खालावत चालला आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या पटामध्ये १० हजाराच्या संख्येने घट झालेली आहे. तरी सुद्धा सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीचा कारभारात सुधारणा घडत नसून खिचडी, पोषण आहार सारख्या योजनांमध्ये गैरव्यवहार होत आहेत. महापालिकेच्या १२७ शाळांमध्ये ४२ हजार गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,यासाठी विविध योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, गणवेश, दफ्तर, बुट, शालेय पोषण आहार आणि राज्य शासनातर्फे खिचडीचे वाटप केले जाते. या सुविधा दरवर्षी दिल्या जातात. शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाले. नवीन पुस्तके, वह्या आणि गणवेश परिधान करून विद्यार्थी शाळेत गेले. मात्र पालिका शाळांमधील ४२ हजार विद्यार्थ्यांना हे भाग्य लाभलेच नाही. शाळा सुरू होऊन तीन आठवडे लोटले तरी या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेले नाहीत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे गोरगरिब विद्यार्थ्यांना पाठय़-पुस्तकांशिवाय शाळेत दिवस काढावे लागत आहेत. पोषण आहाराच्या नावाखाली देण्यात येणारी बिस्कटे निविदा न काढताच जुन्या ठेकेदाराकडून वाटण्याचे काम प्रशासनाकडून चोख बजावण्यात येत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण मंडळातील भ्रष्ट्र कारभार सर्वज्ञात आहे, याचे उदाहरण म्हणचे रेनकोट योजना. अर्थसंकल्पात तरतूद नसताना कोटी रूपयांची नवीन रेनकोट योजनेची निविदा काढण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी वाटप करण्यात येणाऱ्या वह्या, गणवेश आणि पोषण आहार योजनेच्या निविदा काढण्यास प्रशासनाला सुचले नाही. शहर विकासावर कोटय़ावधी रूपयांची उधळपट्टी करून शहरवाशीयांच्या राहणीमानाचा विचार करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी वेळ नाही.