Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला शिवसैनिकांनी दिले ‘पुलं’चे नाव!
पनवेल, ८ जुलै/प्रतिनिधी

 

वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या नामकरणावरून उद्भवलेला वाद शमला नसतानाच बुधवारी अचानक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या नामकरणावरून धुमश्चक्री उडाली. या द्रुतगती महामार्गाला माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केल्यानंतर शिवसैनिकांचा भडका उडाला. शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी साडेचार वाजता जमलेल्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी या महामार्गाला पु. ल. देशपांडे यांचे नाव दिले. कळंबोली येथे मॅकडोनल्डसमोर सुरू होणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूला पु.लं.च्या नावाचे फलक लावण्यात शिवसैनिक यशस्वी ठरले. त्यानंतर शिवसैनिकांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन ठराविक अंतरावर पु.लं.च्या नावाचे फलक लावण्यास सुरुवात केली; परंतु तोपर्यंत दाखल झालेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली या महामार्गाचे भूमिपूजन केले होते. मुंबई-पुणे शहरांना आपल्या साहित्याद्वारे जोडणाऱ्या पु.लं.चे नाव या महामार्गाला देण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती, असे पाटील यांनी सांगितले. आम्हालाही यशवंतरावांबद्दल आदर आहे; परंतु सरकारने या महामार्गाला पु.लं.चेच नाव द्यावे आणि पुणे-कोल्हापूर महामार्गाला यशवंतराव चव्हाणांचे नाव द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नामकरणातील या पक्षीय मतभेदांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.