Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य
(सविस्तर वृत्त)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने दिलेली वैचारिक बैठक हरवली -केतकर
कराड, ८ जुलै/वार्ताहर

 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या मुद्य्यांवर उभारली गेली ती वैचारिक बैठक आज राहिली नाही. आजच्या सर्वच चळवळी सवंग लोकप्रियतेसाठी वर-वरच्याच असल्याने एकेकाळचा प्रगत महाराष्ट्र आज नेमका कुठल्या दिशेने चाललाय हेच कळत नाही.
गिरणी कामगारांपाठोपाठ आता ग्रामीण भागही देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असून भविष्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होणार असल्याची भीती ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केली.
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री डी. आर. ऊर्फ आनंदराव चव्हाण व त्यांच्या पत्नी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्ह्य़ातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. किसन वीर साखर
कारखान्याचे अध्यक्ष आमदार मदन भोसले अध्यक्षस्थानी होते, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, भाई
पंजाबराव चव्हाण, मदनराव मोहिते, सुनंदा कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी मिळविणे आणि निवडून येणे एवढेच उद्दिष्ट ७५ टक्के राजकारण्यांचे राहिले आहे. केवळ समर्थ माणसानेच इथे राहायचे आणि ज्याला कायदा राबवता येईल
त्याचाच कायदा हे सूत्र झाले आहे. भविष्यातील महाराष्ट्राचा विचार करता अंगावर शहारे उभारतात, असे सांगताना केतकर म्हणाले, आजचा महाराष्ट्र कष्टकरी, शेतकरी, औद्योगिक मालक, व्यावसायिकांच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या जमिनी काडीमोल
किमतीत विकत घेऊन त्या बिगरशेती करून अमाप पैसा करणाऱ्यांच्या हाती गेला आहे. या प्रक्रियेला शासनाचा आशीर्वाद नव्हे तर शासनच त्यात गुंतले आहे. या व्यवहारांचा सर्वच पक्षांना लाभ मिळत असल्याने याची कधी विधिमंडळात चर्चा झाली
नाही. उद्ध्वस्त झालेल्या गोरगरिब, सामान्य माणसाचे जीवन कोणीही समोर आणायला तयार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी एका पक्षाविरुद्ध जाऊन चालणार नाही तर संघर्षांची दिशा बदलावी लागेल, त्यासाठी उद्ध्वस्त झालेल्या लोकांची संघटना बांधावी लागेल, अशी सूचना त्यांनी केली.