Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

राज्य

संयुक्त महाराष्ट्र चळवळीने दिलेली वैचारिक बैठक हरवली -केतकर
कराड, ८ जुलै/वार्ताहर

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या मुद्य्यांवर उभारली गेली ती वैचारिक बैठक आज राहिली नाही. आजच्या सर्वच चळवळी सवंग लोकप्रियतेसाठी वर-वरच्याच असल्याने एकेकाळचा प्रगत महाराष्ट्र आज नेमका कुठल्या दिशेने चाललाय हेच कळत नाही. गिरणी कामगारांपाठोपाठ आता ग्रामीण भागही देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली असून भविष्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होणार असल्याची भीती ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केली.

नानासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी हरितसृष्टीचा संकल्प
मुरुड-जंजिरा, ८ जुलै

बैठकीच्या माध्यमातून देश-विदेशात आपल्या निरुपणाने अंधश्रद्धा, अज्ञान, व्यसनाधीनता मिटविण्यासाठी अजरामर कार्य केलेले स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रथम स्मृतिदिनी श्री परिवाराने हरितसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प सुरू केला. नानासाहेबांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी आप्पासाहेब व सचिनदादा धर्माधिकारी यांनी आज सकाळी स्वत: वृक्षारोपण करून या चळवळीचा शुभारंभ केला.

नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरमध्ये बंड
नाशिक, ८ जुलै / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मुंबईमधील सहाही मतदारसंघात भिन्नभिन्न विचारसरणींच्या पक्षांना पाठिंबा देण्याची भूमिका घेवून एका अर्थाने धंदेवाईक दृष्टीकोन बाळगणे तसेच सबंध दलित पँथर सचिवालयाच्या आवारात बंदिस्त करणे या बाबी प्रामाणिक कार्यकर्त्यांना मनस्ताप देणाऱ्या ठरल्या.

४२ हजार विद्यार्थी पाठय़-पुस्तकांपासून वंचित
दिलीप शिंदे, ठाणे,८ जुलै

शहर विकासाच्या नावाखाली कोटय़ावधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीला पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ४२ हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना साधे गणवेश देण्यासाठी निधी नसावा!. एवढेच नव्हे तर शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरवडा लोटल्यानंतरही विद्यार्थ्यांना पाटी-पुस्तकाशिवायच शिक्षण घ्यावे लागत आहे.

वसई-विरार महापालिकेत जाण्यास ग्रामस्थांचा विरोध!
ठाणे, ८ जुलै/प्रतिनिधी

वसई-विरार महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध करणाऱ्या ग्रामीण भागातील लाखो रहिवाशांची फसवणूक करण्याबरोबरच भारतीय राज्यघटनेतील कलम २४३ चेही उल्लंघन करून सरकारने महापालिका स्थापण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी केला असून, सरकारविरुद्ध जनमत एकवटण्यासाठी काँग्रेस, जनतादल व श्रमजीवी

दलित पँथरमध्ये फूट
नाशिक, ८ जुलै / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत मुंबईमधील सहाही मतदारसंघात भिन्नभिन्न विचारसरणींच्या पक्षांना पाठिंबा देऊन तत्त्वांना मूठमाती दिल्याच्या भावनेतून पँथरच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी नामदेव ढसाळ यांचे नेतृत्व झुगारून नवा आक्रमक मार्ग अंगीकारण्याचा निर्णय येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. या कार्यकर्त्यांनी ढसाळांपासून वेगळे होत ‘राष्ट्रीय दलित पँथर’ या नावे वेगळी चूल मांडण्याच्या दिलेल्या हाळीमुळे पँथरमध्ये उभी फूट पडली आहे. दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक आज नाशिक मुक्कामी पार पडली. पँथरचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून पक्षार्तगत पातळीवर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. लोकसभा निवडणुकीत तर ढसाळांनी ज्या रितीने भिन्न विचारसरणीच्या सहा पक्षांना पाठिंबा दिला तेव्हापासून पक्षातील बव्हंशी मंडळींमधील असंतोष वाढीस लागला होता.

धुळे ग्रामीण शिवसेनेचा उद्या मेळावा
धुळे, ८ जुलै / वार्ताहर

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या शुक्रवारी दुपारी एक वाजता नगांवबारी येथील केशरानंद गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास आ. सुरेश जैन, आ. गुलाब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार असून धुळे जिल्हा संपर्क नेते विलास अवचट हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मेळाव्यास आ. दादा भुसे, आ. आर. ओ. पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, आ. कैलास पाटील, अल्ताफ खान हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात अतुल सोनवणे, डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुधीर जाधव, महानगरप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख बापू शार्दुल आदी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास तालुक्यातील शिवसैनिक, शेतकरी, शेतमजुरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका नेते प्रा. शरद पाटील यांनी केले आहे.

ठाण्यात अनधिकृत बांधकामांच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र न्यायालय व पोलीस ठाण्याला मंजुरी
ठाणे, ८ जुलै/प्रतिनिधी

अनधिकृत बांधकामे नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे तसेच शीघ्रगती वरिष्ठस्तर व अपील न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय आज ठाणे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून उच्च न्यायालयानेही अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याबाबत पालिका गंभीर नसल्याचे ताशेरे वारंवार ओढले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाबाबत शहरात व्यापक कारवाई सुरू करतानाच नव्याने होणाऱ्या बांधकामांना लगाम बसावा व ते करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सहाय्यक आयुक्तांसह दीडशे पोलिसांचे स्वतंत्र पोलीस ठाणे आणि यासंदर्भातील खटल्यांचा त्वरित निपटारा व्हावा यासाठी शीघ्रगती वरिष्ठस्तर न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र अभियांत्रिकी महासंघातर्फे राज्यस्तरीय अभियंता परिषद
नाशिक, ८ जुलै / प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सेवेतील सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील अभियंत्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघातर्फे येत्या शुक्रवारी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता राज्यस्तरीय अभियंता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. जलसंपदा मंत्री अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. विमल मुंदडा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत अभियंत्यांचे राज्याच्या विकास कामातील योगदान, तसेच अभियंत्याच्या सेवाविषयक प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची माहिती जिल्हा सचिव उ. नि. निर्मळ यांनी दिली.

कंपनीवर संतप्त ग्रामस्थांचा हल्ला
खोपोली, ८ जुलै/वार्ताहर

खालापूर तालुक्यात वाशिवली येथे केळकर कंपनीवर संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात कंपनीचे नुकसान झाले आहे. कंपनीचे सुरक्षा कर्मचारी शांताराम साळवी, कामगार प्रशांत ढेरे, पांडुरंग पाटील, विजय सावंत तसेच रसायनीचे पोलीस नाईक होली हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रसायनी पोलिसांनी १४ हल्लेखोर ग्रामस्थांना अटक केली असून, अन्य २० ते २५ फरारी हल्लेखोर ग्रामस्थांचा वेगाने तपास करण्यात येत आहे. केळकर कंपनीसाठी स्थानिक शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी विकल्या होत्या. त्या शेतकरी बांधवांच्या वारसांना व्यवस्थापनाने नोकऱ्या द्याव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांनी २७ मेपासून आंदोलन छेडले होते. व्यवस्थापनाकडून मागण्यांसंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी २ जुलैपासून आमरण उपोषणही सुरू केले होते. उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळू लागल्यामुळे त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी (६ जुलै) स्थानिक पुढाऱ्यांनी कंपनीच्या विरोधात प्रभोक्षक भाषणे केली, त्यामुळे आंदोलक ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. बेफाम झालेल्या ग्रामस्थांनी हातात लाठय़ा-काठय़ा व दगड घेऊन कंपनीवर हल्ला केला.

राष्ट्रवादीचा आज रत्नागिरीत विभागीय मेळावा; आर.आर. पाटील येणार
रत्नागिरी, ८ जुलै/ खास प्रतिनिधी

राष्ट्रवादीचा कोकण विभागीय मेळावा उद्या (९ जुलै) येथे आयोजित करण्यात आला असून, प्रदेशाध्यक्ष आर.आर. पाटील यांची याप्रसंगी मुख्य उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री सुनील तटकरे आणि पक्षनिरीक्षक प्रकाश भन्साळी हेही याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.

गणित परीक्षेत झेनिथ स्कूलचे सुयश
खोपोली, ८ जुलै/वार्ताहर

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेतर्फे फेब्रुवारी ०९ मध्ये घेण्यात आलेल्या गणित विषयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील इंग्रजी माध्यमाच्या झेनिथ स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. देवेश तिवारी (९४), सिमरंजित कलशी (८२), प्रियबंदा पांडे (८१) व कविता सिंग (८१) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.