Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

गांगुलीला वेध बोर्डाच्या ‘नेतृत्वा’चे
मुंबई, ८ जुलै / क्री. प्र.

 

सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या सौरव गांगुलीला आता क्रिकेट प्रशासकाच्या नवीन भूमिकेत शिरण्याची इच्छा आहे. पाच वर्षांनंतर म्हणजे २०१४ मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद पूर्व विभागाला मिळणार असून, त्या वेळी या पदावर गांगुली विराजमान झाल्यास आश्चर्य वाटू नये. आज ३७ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गांगुलीने आपण क्रिकेटमधून निवृत्त झालो असलो तरी प्रशासकाची नवी इनिंग सुरू करून त्याच खेळाशी निगडित राहण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
बंगालमध्ये क्रिकेटविषयक गुणवत्ता विपुल असून, त्याची काळजी घेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे, असे देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या गांगुलीने म्हटले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनमधील जगमोहन दालमियांची सद्दी संपविण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी त्या दृष्टिकोनातून आतापासूनच मोर्चेबांधणी करायला प्रारंभ केला आहे. बोर्डाचा अध्यक्ष होण्यासाठी गांगुलीला बोर्डाच्या किमान दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे आवश्यक असेल. मात्र बोर्डाचा अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहण्यासाठी गांगुलीसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशन हेच प्रवेशद्वार ठरणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद ही त्याच्यासाठी पहिली पायरी ठरणार असून, त्यासाठी या संघटनेत पॉवरफूल असणाऱ्या जगमोहन दालमिया यांना त्यांच्याच खेळीने पराभूत करण्याची किमया त्याला करावी लागेल. यासाठी दालमियांच्या विरोधी गटाने या महिन्याअखेर होणाऱ्या बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी गांगुलीचे मन वळविण्यासही प्रारंभ केला आहे. गांगुली मात्र सध्या घाई करण्यास तयार नाही. त्याच्या मते तो लहान असल्यापासून या संघटनेतील लोक त्याला पाहात आहेत. त्यांच्याविषयी त्याला आदर असून, बंगाल क्रिकेटसाठी त्याची तळमळ व त्याच्या संघटनेत येण्याने किती फरक पडू शकतो हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच कधी ना कधी या संघटनेत मी येईनच. मला काहीही घाई नाही.