Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

ठाणे टर्मिनसचे स्वप्न अधुरेच!
अजून नाही सरल्या आशा..
प्रशांत मोरे
भारतात दीडशे वर्षांपूर्वी रेल्वेचे पर्व जिथून सुरू झाले, त्या मुंबई-ठाणे रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणाबाबत स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या अक्षम्य दुर्लक्षाचा त्रास या मार्गावरील उपनगरी रेल्वेच्या लाखो प्रवाशांना दररोज सहन करावा लागत असून, ठोस उपायांअभावी हा प्रवास अधिकाधिक जिकिरीचा होत आहे. ठाण्याला टर्मिनस उभारून येथून कसारा आणि कर्जत मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी ठराविक अंतराने शटल सेवा सुरू करणे, हा या समस्येवरील प्रभावी उपाय ठरेल.

डोंबिवली-मुंब्रा नियोजित मार्गासाठी एमएमआरडीए पुढाकार घेणार
विकास महाडिक

सागरी नियंत्रण कायद्याच्या कचाटय़ातसापडलेल्या डोंबिवली-मुंब्रा नियोजित मार्गातील अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी एमएमआरडीए पुढे सरसावली असून, ‘सीआरझेड-३’ व पर्यावरणविषयक परवानगी मिळविण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी तीन कंपन्या इच्छुक असून एमएमआरडीएचे आयुक्त रत्नाकर गायकवाड अमेरिकेहून परतल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

देशभरात महिलांचा सन्मान,ठाणे महापालिकेत मात्र अवमान
ठाणे/प्रतिनिधी - देशभरात सन्मानाची पदे देऊन महिलांचा सन्मान करण्याचा प्रघात असताना ठाणे महापालिकेत मात्र महिलांची गळचेपी व अवमान करण्याचा प्रकार सुरू आहे. आज सर्वसाधारण सभेत असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जाब विचारूनही महापौरांनी प्रशासनास पाठीशी घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कडोंमपा; रघुवीरनगरमधील पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरणार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या तीन प्रभागांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मोठागाव ठाकुर्ली आणि रघुवीरनगरमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रभाग क्र. ९ टिटवाळामधील नगरसेवक संतोष तरे यांचे पद जात प्रमाणपत्रावरून धोक्यात आले. प्र.क्र. ६९ मोठागाव ठाकुर्ली प्रभागात पुंडलिक म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता.

कल्याणला मिळणार आयपीएस दर्जाचा पोलीस अधिकारी
कल्याण/वर्ताहर : कल्याण शहर संवेदनशील शहर म्हणून मानले जाते. या शहराला आय.पी. एस. दर्जाचा पोलीस उपायुक्त नेमावा, असे शासनाचे निर्देश असताना या शहराला त्या दर्जाचा पोलीस अधिकारी न दिल्याने शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. आता मात्र नॉन आय. पी. एस. अधिकाऱ्यांना बदलून त्यांच्या जागी आय.पी.एस. अधिकारी नेमले जातील, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दिल्याने कल्याण-डोंबिवलीमधील वाढत्या गुन्हेगारीने धास्तावलेल्या नागरिक व असुरक्षित महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठाण्यातील बेकायदा होर्डिंग्जबाबत आज निर्णय
प्रतिनिधी

ठाणे शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या वाढत्या बेकायदा होर्डिंग्जवर थातूरमातूर कारवाई करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेविरोधात येथील एका जागरूक नागरिकाने मुंबईच्या धर्तीवर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या ९ जुलै रोजी सुनावणी होणार असून न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे शहर, तलावाचे शहर म्हणून एकेकाळी ओळखले जात होते.

शहापुरातील चिल्लारवाडीत ६० ग्रामस्थांना मलेरियाची लागण
कल्याण/प्रतिनिधी

शहापूर तालुक्यातील डोळखांब गावाजवळील चिल्लारवाडी या आदिवासी गावामध्ये ५० ते ६० ग्रामस्थांना मलेरिया तर १६ मुलांना डायरिया(हगवण) झाला आहे. अतिशय दुर्गम भागात ही वाडी असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेचे या गावाकडे आतापर्यंत लक्षच गेले नाही. एखादा जीव गेल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणा जागी होणार आहे का, असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे.

गणेशसागर तलावात यंदा मूर्ती विसर्जनाला बंदी
ठाणे/ प्रतिनिधी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टिकूजीनी वाडी मानपाडा येथील जंगतालील तलावात गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी घालण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. मानपाडा येथे वनखात्याचे रेस्ट हाऊस तसेच चौकी आहे. या चौकीच्या समोर गणेशसागर नावाचा तलाव असून दरवर्षी परिसरातील लोक या तलावात गणेश विसर्जन करतात. मूर्त्यांच्या विसर्जनामुळे या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणाच सदोष
ठाणे/प्रतिनिधी - आपत्ती नियंत्रणाबाबत जिल्ह्यातील इतर सरकारी यंत्रणांना धारेवर धरणारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन यंत्रणाच सदोष आहे. आग विझविण्यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा निकामी झाली असून, ४३ फायर एस्टिंग्युशरची कालमर्यादा संपलेली आहे. त्यामुळे दुदैवाने आग लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील हानी कोणीही रोखू शकणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन मतदार याद्यांसह महसूल विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. अशा ठिकाणी अचानक आग लागल्यास अशा यंत्रणेचा काहीही उपयोग होणार नाही. या फायर एस्टिंग्युशरची मुदत २००६ मध्ये संपलेली असून ती बदलण्यात आलेली नाही. वर्षानंतर ते बदलणे अपेक्षित असताना दोन-दोन वर्षे बदलण्यात न आल्याने, जिल्हा आपत्कालीन यंत्रणा किती सतर्क असते हे दिसून येते. ही त्रुटी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर फायर एस्टिंग्युशर बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, बदलापूरमध्ये मार्गदर्शन
ठाणे / प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद यंदा अहमदाबाद येथे २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान भरविली जाणार असून ‘पृथ्वी ग्रह-आपल्या घराचा शोध आणि बोधह्ण हा विषय देण्यात आला आहे. रविवार १२ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत टॅलेंट फाऊंडेशन, नेहा सागर अपार्टमेंट, रेल्वे स्थानकाजवळ, बदलापूर (पूर्व) येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. संपर्क- कार्यकारी विश्वस्त, जिज्ञासा, २ जयानंद सोसायटी, एम. जी. रोड, नौपाडा, ठाणे (प) २५४०३८५७.

अग्यार समितीसाठी ६२ लाख खर्च
कल्याण/प्रतिनिधी - अनधिकृत बांधकामांची चौकशी करणाऱ्या अग्यार समितीसाठी एकूण ६२ लाख २३ हजार रुपये खर्च झाला आहे. या खर्चात मानधन, वकील फी, वेतन, कार्यालयीन खर्चाचा अंतर्भाव आहे. उर्वरित २ लाख २६ हजाराचा सिटी सव्‍‌र्हे खर्च, एक लाखाचे नकाशे हा सर्व खर्च उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिकेच्या नगररचना विभागाने केला आहे. हा खर्च स्वतंत्र आहे. त्याचा कमिटीशी संबंध नाही, असे पालिकेने कळविले आहे. पालिका आणि अग्यार समितीसाठी झालेल्या एकूण खर्चाची बातमी ठाणे ‘वृत्तांत’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे पालिकेकडून हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

श्रमजीवीतर्फे वृक्षदिंडी आणि जेट्रोफा रोपांचे वितरण
वाडा/वार्ताहर
आदिवासींच्या बेरोजगार हातांना काम मिळून त्यांची उपासमार आणि कुपोषण दूर व्हावे, या हेतूने श्रमजीवी संघटना जेट्रोफा लागवडीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असून, सोमवारी विक्रमगड येथे संघटनेच्या वतीने वृक्षदिंडी व जेट्रोफा रोप वितरण समारंभ पार पडला. या समारंभासाठी उपविभागीय कृषी अधिकारी सी.बी. कानवडे, संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उपकार्याध्यक्ष जगदीश धोडी, जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, संघटक किसन चौरे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि सत्याग्रही मागणीमुळे महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या धोरणात बदल केला आणि तीन वर्षांपूर्वी रोहयोमध्ये ‘जेट्रोफा’ या बायोडिझल मिळणाऱ्या झाडाचा समावेश केला. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ठाणे जिल्ह्यातील १० हजार श्रमजीवी शेतकऱ्यांनी आजतागायत त्यांच्या १२ हजार एकर वन खात्याच्या जमिनीवर सुमारे ६० लाख जेट्रोफाची लागवड केली आहे. या उपक्रमातून आजवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जेट्रोफा लागवडीसाठी सुमारे पाच कोटींहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होऊ शकला आहे. येथील आदिवासींना रोजगार, तसेच पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य संघटनेच्या माध्यमातून झाले आहे.

अग्यार समितीला ३० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश
कल्याण/प्रतिनिधी - न्या. जी. ए. अग्यार समितीने आपला चौकशी अहवाल येत्या ३० जुलैपर्यंत दाखल करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. स्वतंत्र कुमार, न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने दिला आहे. समितीला जी मुदतवाढ पाहिजे तीही देण्यात येत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील ६७ हजार अनधिकृत बांधकामांच्या चौकशीचे काम अग्यार समिती करीत आहे. या समितीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. पालिकेचे सात प्रभाग अधिकारी, अभियंत्यांच्या साक्षी, कागदपत्र सादरीकरणाचे काम समितीसमोर सुरू आहे. समितीला सप्टेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेचे अधिकारी मात्र अजून पालिका हद्दीत किती मालमत्ता आहेत, याचा अचूक आकडा काढण्याच्या फेऱ्यात अडकले आहेत. प्रभाग अधिकारी, आयुक्त आणि याचिकादार कौस्तुभ गोखले यांनी न्यायालयाला दिलेली माहिती यांचा मेळ जमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अधिकारी अधिकच गोंधळात आहेत. अशा परिस्थितीत अग्यार समितीला ३० जुलैपर्यंत अहवाल द्यावा लागणार असल्याने पालिका अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

चंद्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्पावर व्याख्यान
ठाणे/प्रतिनिधी
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्राच्या वतीने गुरुवार, ९ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मराठी ग्रंथसंग्रहालय सभागृह, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिशिर शिंदे आणि अशोक जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून ज्या नागरिकांना प्रश्न विचारायचे असतील, त्यांनी अर्धा तास आधी विद्याधर ठाणेकर यांच्याकडे कार्यक्रमस्थळी आणून द्यावेत, असे संस्थेने कळविले आहे .