Leading International Marathi News Daily

गुरुवार, ९ जुलै २००९

व्यक्तिवेध

कानावर आवाज पडला की तो सहसा परिचयाचा न वाटणारा असा. जरासा जाड , पण भारदस्त , सुरेल , पण पातळ आणि मुलायम नाही. भारतीयांच्या कानाला पाश्चात्य वाटावा असा हा आवाज देव आनंदच्या ‘ हरे राम हरे कृष्ण ’ या चित्रपटातील याच ओळींच्या गाण्यात जेव्हा भारतीय रसिकांनी ऐकला , तेव्हा त्यांना तो नुसता वेगळा वाटला नाही , तर त्यात एक प्रकारचा ताजेपणा आणि ताकदीचा अनुभव त्यांनी घेतला. उषा उथुप नावाच्या या गायिकेचे हिंदी चित्रपटातील हे पदार्पण चित्रपट संगीताला जसे उपकारक ठरले तसे रसिकांनाही ते आनंदाचे ठरले. आपल्या गायन कारकीर्दीची चाळीस वर्षे पूर्ण करणाऱ्या उषा उथुप यांचे गाणे फक्त वेगळे म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवले नाही , तर त्यातील नवेपणा त्यांना अधिक भावला. भारतीयांच्या कानाला सुरेल आणि गोड आवाजाची सवय आहे. लता मंगेशकर , आशा भोसले यांच्यासारख्या गायिकांनी जवळजवळ पन्नास वर्षे

 

अधिराज्य गाजवले. त्यांच्याआधी सुरैया , नूरजहाँ यांची गाणी रसिक मनावर कोरली गेली होती. संगीतात नव्याने येणाऱ्याला सहन करावी लागणारी मानहानी आणि अवहेलना उषा उथुप यांना तेवढय़ा प्रमाणात सहन करावी लागली नाही. तरीही क्लबसिंगर ते पाश्र्वगायिका हा त्यांचा प्रवास जागतिक संगीतात त्यांचे स्वत:चे स्थान निर्माण करणारा आहे , यात वाद नाही. केवळे आवाजाचे वेगळेपण हे त्यांच्या गळ्याचे वैशिष्टय़ नाही. पाश्चात्य धाटणीची म्हणजे त्या स्वररचनांची गाणी त्यांच्या गळ्याला शोभतात , असा समज त्यांच्या पदार्पणातल्याच गाण्याच्या लोकप्रियतेमुळे संगीतकारांचा होणे स्वाभाविक होते. पण उथुप यांनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन आपले वेगळेपण सिद्ध केले. ‘ रम्बा हो.. सांबा हो.. ’ किंवा ‘ हरी ओम् हरी ’ ही दोन गाणी लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झाली असली , तरी खरे तर त्यांनी गायलेली अनेक गाणी रसिकांच्या स्मरणात राहणारी ठरली आहेत. वयाच्या नवव्या वर्षी गायिका म्हणून काम सुरू केले तरीही संगीत क्षेत्रात त्यांचे खरे पदार्पण १९६९ मध्ये झाले. आवाज सुरेल नाही म्हणून संगीताच्या वर्गातून बाहेर घालवण्यात आलेल्या उषाला शाळेतील संगीतशिक्षिकेने बरोबर ओळखले. कपाळावर भली मोठी बिंदी आणि केसात गजरा अशा वेगळ्याच पण लक्ष वेधून घेणाऱ्या वेषभूषेत उषा उथुप जेव्हा नाइट क्लबमध्ये गाणे गायला हजर झाल्या तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या. पण बिंदी आणि गजरा हेच या लोकप्रिय पॉपसिंगरचे ट्रेडमार्क ठरले. पंधरा भारतीय भाषा आणि डच , फ्रेंच , इटालियन , रशियन , नेपाळी अशा अनेक परकीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. या भाषांमधील त्यांचे अल्बम खूपच नावाजले. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कार्यक्रमांना आजही अफाट गर्दी असते. पॉप सिंगरबद्दलची जनमानसातील बुरसट कल्पना पुसून टाकणाऱ्या या गायिकेने ‘ पोथन पावा ’ या मल्याळी चित्रपटात भूमिकाही केली. कोलकात्यातील कॅन्सर रिसर्च सेंटरच्या कार्यक्रमात गाण्याचे निमंत्रण उषा उथुप यांना होते , पण त्या वेळचे सार्वजनिक बांधकाममंत्री जतीन चक्रवर्ती यांनी त्यांच्या गाण्यावर बंदी आणली. आपल्या शालीनतेवर झालेल्या या आघाताने व्यथित झालेल्या उथुप यांनी चक्रवर्ती यांच्यासह त्या वेळचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्यावरही न्यायालयात फिर्याद ठोकली. बंगालच्या सांस्कृतिकतेवर झालेला हा आघात न्यायालयानेच मिटवला आणि उथुप यांचा विजय झाला. भारतीयांच्या मनात असलेल्या पॉपसिंगरबद्दलच्या कल्पनांना उथुप यांनी छेद दिला आणि कलावंत म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केली. सध्या कोलकात्यात निवास करत असलेल्या उषा उथुप यांनी आपल्या कर्तृत्वाने भारतीय संगीतात नवेपणा आणला. माध्यमांनी या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही पण रसिकांनी त्यांना मनापासून दाद दिली. समाजासाठीचे दायित्वही त्या तितक्याच उत्कटपणे पार पाडतात. अनेक सामाजिक उपक्रमांच्या आर्थिक मदतीसाठी त्या कार्यक्रम करतात. सत्तरच्या दशकात पाश्चिमात्य संगीत ऐकणे हे केवळ फॅड होते आणि त्याचा भारतात फारसा प्रचार आणि प्रसारही झाला नव्हता , तेव्हा उषा उथुप यांनी प्रवाहाविरुद्ध पोहून आपली कला सिद्ध केली , हे त्यांच्या कारकीर्दीला चाळीस वर्षे पूर्ण होत असताना ध्यानात घ्यायला हवे.